कोकण मार्गावर यंदा १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी
रत्नागिरी :
कोकण मार्गावर दरवर्षी १० जून पासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होणार आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे. तसेच सहा एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यामध्ये कपातही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळ निश्चित केली आहे.
कोकणात पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसात डोंगराळ भागामुळे कोकणातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर काळजी घ्यावी लागते. गेल्या काही वर्षापासून रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर घडणाऱ्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब केला आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा सुरळीत सुरू आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांवर विपरित परिणाम होवून रेल्वेगाड्या विलंबाने धावतात. कोकण मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजनाची आखणी सुरु केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगांवर मर्यादा घालण्याची निश्चितीही केली आहे. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यत कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. रोहा ते ठोकूर दरम्यान रेल्वे गाडया ताशी १२० ऐवजी ७५ किमीच्या वेगाने धावतात. मुसळधार पावसानंतर गाड्यांचा ताशी वेग ४० किमी होतो. यंदा १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.