सांघिक कामामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत यश – नितेश राणे

सांघिक कामामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत यश – नितेश राणे

सांगुळवाडी येथील स्ट्रीटलाइट कामाचे उद्घाटन…

वैभववाडी

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या सांघिक कामामुळेच पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. गावातील विकासकामे मार्गी लावण्याची जबाबदारी ही आता आमची आहे. ग्रामपंचायत भाजपकडे देणाऱ्या सांगुळवाडी ग्रामस्थांनी विकास कामाची चिंचा यापुढे अजिबात करू नये. विविध विकासकामांच्या माध्यमातून सांगुळवाडी आदर्श गाव बनविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
सांगुळवाडी येथील राववाडी व पाटीलवाडी येथील स्ट्रीटलाइट कामाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी सभापती अरवींद रावराणे, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण रावराणे, महिला आघाडी अध्यक्ष भारती रावराणे, प्राची तावडे, विद्या पाटील, संदीप पाटील, अक्षय पाटील, पाटील गुरुजी, उदय पांचाळ आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, सेनेचे खासदार, पालकमंत्री व इतर नेते ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावात फिरत होते. वीस कोटी देतो, तीस कोटी विकास निधी देण्याच्या वल्गना करत होते. पण माझ्या कार्यकर्त्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी एकदाही गावात प्रचाराला गेलो नाही. परंतु दिवसरात्र मी मतदारसंघात असल्याने कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे आपल्याला ज्ञात होते. गावातील प्रलंबित साकव विषय हा आता माझ्यावर सोपवा. साकवासाठी निधी उभा करून देण्याची जबाबदारी आता माझी असल्याचे सांगितले. नासीर काझी, प्रकाश पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक विद्याधर सावंत यांनी मानले. यावेळी सांगुळवाडी ग्रामस्थ महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा