मालवण / कट्टा :
क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा येथे घेण्यात आले. यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार नागेश शिंदे, मंडळ अधिकारी पेंडूर महादेव गवस, मंडळ अधिकारी पोइप संतोष गुरखे, मंडळ अधिकारी आंबेरी दीपक शिंग्रे, मंडळ अधिकारी कोळंब मिनल चव्हाण, मंडळ अधिकारी सुकळवाड स्वप्नाली जंगले, वराडकर हायस्कूल मुख्याध्यापिका देवयानी गावडे, प्राचार्य संतोष मिराशी, प्रवीण मिठबावकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, राजन माणगावकर महसूल मंडळाचे सर्व कर्मचारी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, महा इ सेवा केंद्राचे चालक मालक, कोतवाल उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार वर्षा झालटे म्हणाल्या की गोरगरीब जनतेला आणि वयोवृद्ध व्यक्तींना तसेच सर्वसामान्य जनतेला या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. आणि आज या कार्यक्रमात दाखल्यांचे वितरण करताना वयोवृद्ध आणि सर्वसामान्य लोकांना पाहून निश्चितच हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान वाटत आहे. विनामूल्य सेवा देताना लोकांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहताना खरोखरच समाधान वाटत आहे. जनतेची मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे. त्यासाठी आपण व आपली तालुक्याची सर्व महसुलाची टीम यापुढेही अशीच तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या शिबिरात उत्पन्न दाखला १८५, जात दाखले २८, वय अधिवास ५, राष्ट्रीयत्व १, नॉन क्रिमिलियर १, नवीन रेशन कार्ड ५, प्रतिज्ञापत्र २०, रेशन कार्ड नाव कमी ५, रेशन कार्ड नाव दाखल दाखले ६, नवीन रेशन कार्ड ५ असे एकूण २५६ जणांना सरकारी दाखल्यांचे लाभ देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.

