You are currently viewing शंकरपार्वती आले माझ्या घरी..

शंकरपार्वती आले माझ्या घरी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित होळीनिमित्त खुसखुशीत कथा* (काल्पनिक )

 

*शंकरपार्वती आले माझ्या घरी.‌‌…* 

 

तर मैत्रीणोंनो कथेची सुरूवात अशी.‌‌.‌‌

नेमकेच जेवण करून पेपर वाचत पडले होते आणि दारावरची बेल वाजली.आता कोण .‌.या विचारातच दार उघडताच साक्षात शंकर पार्वती माझ्या दारात उभे! साशंक मनाने च नाव विचारताच ते म्हणाले,होय “आम्ही कैलासावरचेच शिवपार्वती!”

आज पार्वतीने हट्ट धरला ,चला पृथ्वी वर कोणाकडे तरी जाऊ या,तेवढाच बदल..

हे आश्चर्याने बघतच होते ,मी म्हणाले चला,आपण यांना घरात तरी बसवू या..

पार्वती प्रवासाने जरा थकलेली दिसली.शंकराच्या गळ्यात दहा आकडी नाग डोलत होता,मी घाबरताच “,काही करणार नाही तो,”म्हणत दिलासा मिळाला.

सोबत बालगणेशही होता,तो घरात सर्वत्र धावत खेळत होता.कशाने आलात म्हणताच,त्यांनी बाहेर कटाक्ष टाकला,तिथे नंदी हाश हुश्श करत उभा होता.एवढं झालं आणि हसून स्वागत करत त्यांना बैठकीत स्थानापन्न केलं.शंकर लगेच वर्तमान पत्रात डोकं घालून बसले.पार्वती माझ्या मागेच आत आली,”केवढं दूर गं कैलास,खूप थकले,पडते अंमळशी”, म्हणत आडवी झाली.

आता यांचं अगत्य कसं करावं हा मोठा प्रश्न पडला,फ्रिजचं पाणीही त्यांना गरमच वाटलं.कैलासावर बर्फच बर्फ ना!

तेवढ्यात जरा तरतरी येत पार्वती उठली,म्हणाली ह्यांच्या मागे सतत कामं ..मीच म्हटले चला जरा पृथ्वी वर फेरफटका मारू या‌..

आमचा नंदी आहे नं दारात? बघा बरं…तसा गरीब, शांत आहे हो तो! एकच वाहन आहे आमच्या जवळ.‌‌..,मी मनात म्हटले,”आमच्याकडचे नंदी…,थोडेही बोलले की डोळे काढतात आमच्यावर,जरा कुठे न्या म्हटलं की!”

त्यांच्या मुक्कामाचा आढावा घेत मी विचारले, काही कामं नसतील, ऑफीस,शाळा,तर रहा दोन दिवस,पण ते निघणार होते लवकरच.

जरा बैठकीत चक्कर टाकून आले तर दोघांच्याही राजकारणावर गप्पा स्वर्ग व पृथ्वी वरील सुरू होत्या.

फराळाचं काय करावं हा विचार करत असताना पार्वती म्हणाली,”अगं,गोडाचं नैवेद्यात भरपूर खातो..काहीतरी गरम, खमंग च कर‌ बाई.”चकलीची भाजणी भिजवायला घेताच पार्वतीनेही ओट्याजवळ खुर्ची ओढली,. सामान्य गृहिणी सारखं ती मन मोकळं करू लागली.

“तुम्हाला खूप वाटत असेल गं,कैलास म्हणजे मज्जाच पण काय…नुसता बर्फच बर्फ,ना बाग लावता येत ना कारने फिरता येत‌.

नुसतं वल्कलं नेसायची आणि कंदमुळं खायची.”

हे तर ध्यान,समाधी,योग, विश्वाच्या काळजीत निमग्न.”आणि अगं ती गंगा.‌‌.असतेच यांच्या डोक्यावर…

आताही येते की काय वाटलं पण ती आधीच भगीरथासोबत इकडे आलेली.”ती खूप ही आवडते सगळ्यांना, तिच्या नावाचे चित्रपट सुध्दा आलेत.एव्हाना मी चकली तिच्या नकळत चाखून बघितली.छान झाली,गुलाबजाम आणि अजून काही पदार्थांनी प्लेट भरून त्यांना दिले,आवडलं नक्की पार्वतीला,कारण लगेच तिने कृती विचारून घेतली. जराशाने शंकरांनी निघण्याची घाई सुरू केली…काय बाई प्रेझेंट द्यावं विचारात होते तेव्हा एक छानशी साडी व जरा मोठ्ठा टावेल शोधला.

गणपतीला हत्तीचं एक छानसं खेळणं दिलं,तो खूष होऊन खेळायला लागला.

आमच्याकडे येऊन त्यांना नक्कीच छान वाटलं…

निघताना पार्वतीचे डोळे भरून आल्यासारखे वाटले. “तुझ्या जवळ मन मोकळे बोलता आले,बदल वाटला.येत जाहो नेहमी मीही पुन्हा यायचं निमंत्रण दिलं.”तुम्हीही या कैलासावर” ..तिने म्हणताच,मी दचकून बोलले,”आताच कैलास नको,आमची बरीच हिलस्टेशन राहिली आहेत.”

शंकर नंदीवर स्वार झाले, गणेश पुढ्यात आणि पार्वती मागे बसताच,नंदीला किक मारत तिघेही कैलासाकडे रवाना झाले.

मी हात हलवत निरोप देताना

शेजा-यांना खरं वाटेल का,या संभ्रमात घरात आले..‌‌..”असेही स्वर्गातील पाहुणे आज घरी,.”.अजूनही माझा विश्वासच बसेना! आश्चर्य आणि आनंदाचच्या झुल्यावर मन कितीतरी वेळ झुलत राहिलं…!

 

००००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा