मुंबई :
सोमवार दि. १० /०३/२०२५ रोजी कोमसाप देवनार शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त, म्युनिसिपल कॉलनी स्वयंभू हनुमान मंदिर सभागृह, गोवंडी पश्चिम, मुंबई ४३ या ठिकाणी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली अभिव्यक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
माननीयांच्या हस्ते सरस्वतीपूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली.
पाहुण्यांची ओळख शाखेच्या कोषाध्यक्षा श्रीमती सुप्रिया मुळगांवकर यांनी करून दिली.
शाखाध्यक्षा श्रीम. पुष्पा कोल्हे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा सराफ आणि प्रमुख वक्त्त्या ज्येष्ठ लेखिका डॉ. विद्या जोशी, कोमसाप मुंबई जिल्ह्याचे आजी जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. मनोजजी वराडे
यांचे ग्रंथभेट व गुलाबपुष्प, शाल व लेखणी देऊन स्वागत व सन्मान केला.
मा. मनोजजी वराडे यांनी आपल्या भाषणातून कोमसाप ची वाटचाल, आगामी महिला संमेलन याविषयी माहितीपर भाष्य केले. देवनार शाखेचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या. याशिवाय प्रत्येक अभिव्यक्त महिलेला भगवद्गीतेची एकेक प्रत भेट म्हणून दिली. मनोजजींची उपस्थिती विशेष आनंददायी व उत्साहवर्धक ठरली.
सदर मेळाव्यास प्रमुख पाहुण्या आयुर्वेदाचार्या, ज्येष्ठ लेखिका डॉ. विद्याताई जोशी यांनी स्रियांनी मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी,आहार, विहार, निद्रा, योग, व्यायाम, वाचन, पठण,शिस्त, सवयी व संस्कार यांचे जीवनात महत्त्व यावर माहितीपूर्ण व समुचित भाषण केलं.
शाखेतील ज्येष्ठ महिला सदस्या गीताव्रती सुधाताई गोखले यांचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत, मा. प्रतिभाताई सराफ यांच्या हस्ते शाल पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत करून, गीताध्ययनाच्या परीक्षेत ६००पैकी ६०० गुण मिळवणाऱ्या, देवनार शाखेच्या ज्येष्ठ सदस्या गीताव्रती सुधाताई गोखले यांनी गीताव्रती म्हणजे काय तसेच विचक्षणा ..लेवल १,२,३, …on line गीता प्रशिक्षण याबद्दल उपयुक्त माहिती दिली आणि भगवद्गीता, कृष्णसखा यावरील स्वरचित कविता सुस्वरात गाऊन शुभेच्छा देत सत्काराला उत्तर दिले.
शाखा स्थापनेच्या वेळेपासून आजपावेतो पडद्यामागील कलाकाराप्रमाणे, श्री. दत्तात्रेयजी सैतवडेकरांची पाठराखण करत, त्यांची सावली बनून, सतत सहकार्य करणाऱ्या दुसऱ्या सत्कारमूर्ती म्हणजे देवनार शाखेच्या ज्येष्ठ सदस्या श्रीम. अनुराधाताई सैतवडेकर. पण सरांची तब्येत अचानक बिघडल्याने त्या येवू शकल्या नाहीत. त्यांना त्यांच्या घरी जाऊन सदर सत्कार करण्याचा मानस आहे.
या अभिव्यक्ती मेळाव्यात कोमसाप देवनार शाखेच्या महिला सदस्या प्रा. वंदना गायकवाड, सविता पाटील, अर्चना केळकर, इ. अठरा सदस्य भगिनींनी स्वरचित काव्य, स्वानुभव, विशेष आठवणी, प्रसंग, एकपात्री अभिनय इ. सदर केले.सर्व सादरकर्त्या महिलांना एक पुस्तक, लेखणी आणि गुलाबपुष्प भेट म्हणून देण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, गझलकारा प्रा.प्रतिभा सराफ यांनी साहित्य आणि सकारात्मकता या विषयावर स्वत:च्या साहित्यिक कार्याचा अनुभव तसेच इतर साहित्यिकांच्या साहित्यातील ओळी, वेचे दाखले यांनी युक्त, स्वानुभव कथन करत, सहज व ओघवत्या शैलीत आत्मविश्वासपूर्ण असे अध्यक्षीय भाषण केले.
“साहित्यातून सकारात्मकता घ्यावी” असा दृष्टीकोन देणारे त्यांचे भाषण निश्चितच जगण्याची उमेद वाढवणारं, सकारात्मक ऊर्जा व बळ पुरवणारे आहे.
सदर कार्यक्रमास कोमसापच्या दादर शाखेच्या शाखाध्यक्षा व मुंबई जिल्ह्याच्या सहकार्यवाह विद्याताई प्रभू , बांद्रा शाखेच्या कार्यकारिणी सदस्य सोनालीताई जगताप, चेंबूर शाखेच्या शोभाताई कुलकर्णी, माजी नगरसेविका राजश्री पालांडे, रजनीजी कुलकर्णी, विदुला प्रभू आवर्जून उपस्थित होत्या.
श्रीम. सुनीताजी पाटोळेंनी आयत्या वेळी आपल्या मोबाईल मधून क्षणचित्रे काढून आठवणींना अमर केले.
कोमसापच्या एकूण अठरा महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्या मुक्त मनाने व्यक्त झाल्या त्यांचा सन्मान आणि दोन ज्येष्ठ महिला सदस्यांचा विशेष सत्कारही झाला. तसेच मान्यवरांची भाषणे ऐकण्याचा लाभही मिळाला.
शाखा कार्यकारिणी कार्यवाह .श्री अशोकजी शेंडकर, कोषाध्यक्षा सुप्रियाजी मुळगांवकर, उपाध्यक्ष एकनाथजी तांबवेकर, कार्याध्यक्षा मृदुलाजी वाघमारे आणि इतर सदस्य मंडळीही विश्वास ठेवून कार्यक्रमाच्या आयोजनास सहकार्य देते. यावेळी जागेची उपलब्धता, टेबल खुर्च्या, अल्पोपाहार व चहाची व्यवस्था सुप्रियाजी मुळगावकर यांनी पाहिली.
सदर मेळाव्यासंदर्भात केंद्रीय अध्यक्षा मा. नमिताताई कीर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी, “अरे वा! चांगली कल्पना आहे! तुम्ही जरूर घ्या. मी तुमच्यासोबत आहे. ” असा आशीर्वादच दिला. त्यामुळे मेळावा आयोजनाला वेग आला.आणि आठवडाभरातच संपन्नही झाला.
मुंबई जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष व देवनार शाखेचे मूळ संस्थापक श्री. दत्तात्रेयजी सैतवडेकर यांचा आशीर्वाद व पाठिंबा असल्यामुळें शाखेच्या कार्याला बळ व प्रेरणा मिळते.असे शाखाध्यक्षा पुष्पा कोल्हे यांनी व्यक्त होताना सांगितले.