आधार योजना वैध ठरवण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

आधार योजना वैध ठरवण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली : आधार योजना वैध ठरवण्याच्या विरोधात २०१८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आधार योजना वैध ठरवताना काही तरतुदी रद्द केल्या होत्या. त्यात आधार क्रमांक, बँक खाते व मोबाइल फोन व शाळा प्रवेशाशी जोडण्याच्या कलमांचा समावेश होता. न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ४-१ अशा बहुमताने दिलेल्या निकालात २६ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालावर फेरविचार करणा-या याचिका फेटाळल्या आहेत.

न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बहुमताच्या विरोधात मत दिले असून त्यांनी म्हटले आहे, की आधार विधेयक हे अर्थ विधेयक म्हणून मंजूर करण्यात आल्याच्या प्रकरणात निकाल होईपर्यंत या याचिका प्रलंबित ठेवायला हव्या होत्या. आधार विधेयक हे अर्थ विधेयक म्हणून मांडून सरकारने ते राज्यसभेत मंजूर करून घेतले होते. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसतानाही ते मंजूर झाले होते.

बहुमताच्या आदेशात न्यायालयाने ११ जानेवारी रोजी असे म्हटले आहे, की ज्या फेरविचार याचिका २६ सप्टेंबर २०१८ रोजी देण्यात आलेल्या अंतिम निकालाबाबत दाखल केल्या होत्या त्या पुराव्याअभावी फेटाळण्यात येत असून या निकालाचा फेरविचार करण्याची गरज नाही. मोठ्या न्यायपीठापुढे हे प्रकरण असल्याकारणाने त्यावर फेरविचार करता येणार नाही. न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. बी.आर गवई यांनी बहुमताने हा निकाल दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा