You are currently viewing PWD विभागाकडून केला जाणारा नक्षीदार खड्यांच्या रस्त्यांचा झोल गणपती उत्सव पूर्वी उघडकीस आणणार : आम्ही वेंगुर्लेकर

PWD विभागाकडून केला जाणारा नक्षीदार खड्यांच्या रस्त्यांचा झोल गणपती उत्सव पूर्वी उघडकीस आणणार : आम्ही वेंगुर्लेकर

वेंगुर्ला :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असताना जिल्ह्यातील ६०% पेक्षा जास्त रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा व वाट लागली असून याला PWD विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग- जिल्हा परिषद, नाबार्ड या कार्यालायमधील अधिकारी व सर्व रस्त्यांवर बोगस काम केलेले अकुशल ठेकेदार संपूर्णपणे जबाबदार आहेत.

वेंगुर्ला शहराची व सर्व ३० गावातील रस्त्यांची प्रचंड वाताहात व हानी या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी केली असून त्याला काही राजकीय लोकांची साथ असल्यामुळे आजपर्यंत कोणावरही कसलीच कारवाई झालेली दिसून येत नाही.

निवडक भ्रष्ट अधिकारी, अज्ञानी ठेकेदार व पैश्याच्या लालसेपोटी तोंड व डोळे बंद करून खोट्या विकासाचा अजेंडा डोक्यावर घेऊन मिरवणारे अपरिपक्व राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे कोणतंही काम उच्च दर्जाचे होत नाहीय हे आता सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आलंय. आणि यासाठीच वेंगुर्ल्यातील निवडक नागरिकांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या “आम्ही वेंगुर्लेकर” या अराजकीय संस्थेची रस्त्यांच्या गंभीर विषयासाठी निर्णायक आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दिनांक १४ रोजी सकाळी ११ वाजता स्वामिनी मंगल कार्यालय येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यासभेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड यांच्यामार्फत बनविण्यात येणारे रस्ते, त्यावर केली जाणारी देखभाल व दुरुस्ती, ठेकेदाराला वर्क ऑर्डर प्रमाणे दिला जाणारा कालावधी, काम पूर्ण झाल्यावर २४ किंवा ३६ महिन्याचा PWD नियमाप्रमाणे DLP कालावधी, ठेकेदाराने DLP कालावधी मध्ये सदर रस्त्याची देखभाल/दुरुस्ती न केल्यास त्याच्या विरुद्ध केली जाणारी कायदेशीर कारवाईची तरतूद, रस्त्यांसाठी दर महिन्यात शासकीय नियमाप्रमाणे आयोजित करावा लागणारा जनता दरबार यासारख्या अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

रस्त्यांवर खड्डे पडतात त्याला नेमका जबाबदार कोण याची शोध घेण्याची वेळ आली असून फक्त वेगवेगळी निवेदने देऊन हा प्रश्न लवकर सुटेल अस वाटत नाही आणि म्हणूनच यापुढे वेंगुर्ला तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील अन्यायग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आलीय..

अन्याय झाल्यावर लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामपंचायत या सर्व घटकांना वेगवेगळी, थातुरमातुर व उडवाउडवीची लेखी उत्तरे देणाऱ्या या रस्त्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व विभागांना झोपेतून जागे करण्याची गरज आता निर्माण झाली आहे..

प्रत्येक नागरिकांचा कररूपी गोळा झालेला पैसा हा काही निवडक बेजबाबदार लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासकीय निधीची विल्हेवाट लावण्याचा उद्योग गेली अनेक वर्षे करीत आहेत.

म्हणूनच उद्या होणाऱ्या रस्त्याच्या ज्वलंत विषयाच्या बैठकीसाठी जिल्ह्याच्या ८ ही तालुक्यातून निवडक सामाजिक कार्यकर्ते व अन्यायग्रस्त नागरिकांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन करावे असे आवाहन “आम्ही वेंगुर्लेकर” यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा