सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू…

तीन दिवसात ९०० पैकी ५०५ कर्मचाऱ्यांना लस

– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासून जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात ९०० कर्मचाऱ्यांपैकी ५०५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. तर ३९५ कर्मचारी अनुपस्थित राहिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली. कोरोना महामारीपासून नागरिकांची रक्षा करण्यासाठी राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील डॉकटर, कर्मचारी यांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. १६ जानेवारी पासून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणावरून लस दिली जात आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० या प्रमाणे तीन केंद्रावर ३०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात ही लस देण्यात सुरुवात झाली असून १६, १९, २० जानेवारी या तीन दिवसात ९०० कर्मचाऱ्यांना लस देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी १६५ जणांना, १९ जानेवारी रोजी १६१ जणांना तर २० जानेवारी रोजी १७९ जणांना अशी एकूण ५०५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ९०० पैकी ५०५ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली असून ३९५ कर्मचारी प्रत्यक्ष लसीकरण वेळी अनुपस्थित राहिले आहेत. लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला मात्र गंभीर स्वरूपाचा कोणालाही त्रास जाणवला नाही. तिन्ही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीम तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने लसीकरण करून घेण्यास घाबरु नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी केले आहे. दरम्यान लसीकरणाच्या वेळी लस वेस्टेज जाण्याचे प्रमाण नगण्य म्हणजेच ८ टक्के असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा