You are currently viewing “राजे, जमल्यास माफ करा

“राजे, जमल्यास माफ करा

“राजे, जमल्यास माफ करा”

…. अॅड. नकुल पार्सेकर

राजे, तुमचे कर्तुत्व अलौकिक आहे. तुम्ही भक्त या भारतवर्षाचे राजे नाहीत. तुम्ही अवघ्या विश्वाचे राजे आहात. जात, धर्म, पंथ या पलीकडे माणुसकीचा धर्म असतो ही फार मोठी शिकवण तुम्ही दिली. अनेक इतिहास संशोधकांनी तुमच्या शौर्याच्या ज्या यशोगाथा लिहिल्या त्या प्रत्येक सोनेरी पानावर कितीही संकटे आली तरी तुम्ही तुमचा महाराष्ट्र धर्म सोडला नाही. तुमच्यासाठी मराठी भाषेच्या शब्दकोशात असे एकही विशेषण शिल्लक नाही की जे तुम्हांला लागू नाही.
तुम्ही आजही या सृष्टीच्या चराचरात आहात, घराघरात आहात आणि पुढची हजारो वर्षे तुमचे अस्तित्व आणि पराक्रमाचे जागरण सुरूच राहिलं. पण आम्ही एवढे मतलबी, आत्मकेंद्रि आणि टोकाचे स्वार्थी आहोत की तुमच्या नावाचा फक्त आणि फक्त वापर हा दळभद्री राजकारणासाठी करत आहोत. तुम्हांला अपेक्षित असणारे सामाजिक सौहार्द आणि रयतेचे कल्याण हे शब्द आता वापरून गुळगुळीत झालेत. आपल्या नावाने राजकारण करून राजकीय पोळी भाजणारे आज गल्ली बोळात सापडतील. त्याला या देशातील कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. तुमचे स्मारक उभारायचे तरी राजकारण, अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखाने आपण फाडलात त्या वाघनखा वरुनही राजकारण… हा सगळाच अवकाश या गलिच्छ राजकारणाने व्यापलाय. जगावे तर वाघासारखे.. लढावे तर शिवबासारखे अशा स्फूर्तीदायक ओळी अनेक राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर दिसतात पण सत्तेसाठी ही मंडळी आपापसातच लढत असतात.
खरे खोटे माहित नाही.. पण एका वृत्तपत्रात ही सत्य घटना वाचल्याचे मला आठवते, काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये जी जातीय दंगल झाली तेव्हा एका धर्माची व्यक्ती ही एका मुस्लिम महिलेचा पाठलाग करत होती तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी ती महिला अशा एका घरात घुसली की त्या घराच्या भिंतीवर छञपतींचा आणि स्व. हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेबांचा फोटो होता.. अर्थात ते घर एका बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांचे होते. ती मुस्लिम महिला जेव्हा त्या घरात घुसली तेव्हा पाठलाग करणारे पळून गेले. आपला जीव वाचवण्यासाठी आलेल्या त्या महिलेला घरातल्या शिवसैनिकांनी प्रश्र्न विचारला, तू या घरात येण्याचे धाडस कसे केलेसं?तुला भिती नाही वाटली? त्या महिलेने उत्तर दिले, “बाहेर, तुमच्या घराच्या भिंतीवर शिवरायांचा फोटो बघितला आणि मला खात्री पटली की या घरात माझे रक्षण होवू शकते.. ही तीची भावना आणि महाराजांच्या विचारातील सामर्थ्य ओळखून त्या घरातील शिवसैनिकांनी तिला सुरक्षीतपणे तिच्या घरी सोडले. घटना तशी साधी पण इतिहासात महाराजांनी आपल्या राज्यात सर्वधर्मीय जनतेचे केलेले रक्षण आणि केलेला नि:पक्ष कारभार हे इतिहासातील दाखले आपल्याला खऱ्या धर्म रक्षणाचे दाखले देतात.
पण आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे जेव्हा आम्ही अवलोकन करतो तेव्हा लक्षात येते की महाराज तुमच्या पायाकडे सुध्दा रहायची आमची लायकी नाही. उद्या तुमची जयंती, मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरी होईल.. नाही ती झालीच पाहिजे.. तुमच्या देदीप्यमान इतिहासाचा उदघोष व जयजयकार झालाच पाहिजे. नव्या पिढीच्या कानात हा जागर केलाच पाहिजे.. पण त्याचबरोबर एक शिवभक्त म्हणून मला असे वाटते… नुसता जयजयकार नको.. तो तर वर्षानुवर्ष होतच राहणार… पण महाराजांनी जपलेली नितीमुल्ये आणि मानवी मुल्ये याचा कधीतरी आमच्या कृतीमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटणार की नाही.. की फक्त आम्ही तुमच्या नावाचा वर्षानुवर्षे राजकीय स्वार्थासाठी वापरच करणार?
महाराज, तुम्ही दिलेल्या आदर्शांचे पालन होत नाही हे वास्तव आहे.. यासाठी जमल्यास तुम्ही आम्हांला माफ करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा