You are currently viewing शासकीय अधिकाऱ्यांमधील माणूस

शासकीय अधिकाऱ्यांमधील माणूस

 

सरकारी उच्चपदस्थ अधिकारी म्हटला की, त्यांची भेट घ्यायची तर अपॉइंटमेंट घ्यावी लागतेच. कितीतरी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असणाऱ्या शिपाई कडे चिठ्ठीवर आपले नाव, कुठून आलो सर्व डिटेल्स लिहून द्यावे लागते. त्यानंतर शिपाई कागद साहेबांकडे नेऊन देणार मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीनुसार आपल्याला केबिनमध्ये प्रवेश मिळणार हे ठरलेलच असतं. पाणी, चहा, कॉफी विचारणे तर फारच दूर.. अगदीच खास व्यक्ती असेल तरच चहा, पाणी दिले जाते. पण, याला अपवाद ठरले आहेत ते कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड..!

“कृपया आत येऊन बसावे, परवानगीची आवश्यकता नाही” अशी पाटी कुठल्याही प्रथम वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आपल्याला दिसणार नाही. परंतु, अजयकुमार सर्वगौड यांच्या केबिनच्या बाहेर ही पाटी पाहून नक्कीच त्यांची भेट घेण्यास आलेल्या प्रत्येकाला सुखद धक्का मिळतो. कोणी अधिकारी काम करेल की नाही हा दुय्यम प्रश्न असतो, पण प्रथम भेटीची सुरुवात सकारात्मक झाली की, आपले अर्धे काम झाले याचे समाधान चेहऱ्यावर दिसते. त्यामुळे समोरच्या अधिकाऱ्या बद्दल मनात भीती राहत नाही उलट आदर वाढतो. कार्य.अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी तशी पाटीच लावल्याने त्यांच्याकडे काम असणारी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा त्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश मिळवते. सर्वगौड साहेब सुद्धा आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधतात. चहा पाणी आदी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि योग्य असते त्याप्रमाणे काम मोकळे करतात. त्यामुळे अनेकांशी त्यांचे संबंध अत्यंत जवळचे झालेत. अधिकारी आणि सामान्य माणूस यामध्ये असलेली दरी सर्वगौड साहेब आणि सर्वसामान्य माणूस यामध्ये अजिबात दिसून येत नाही.

सरकारी अधिकारी म्हटले की त्यांच्यावर जनतेपेक्षा लोकप्रतिनिधींचा जास्त दबाव म्हणा किंवा प्रभाव असतो. त्यामुळे कामे करताना प्रत्येक अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु हेतू शुद्ध असला की कामे करताना अडचणी येत नाहीत. सर्वगौड साहेबांच्या बाबतीत देखील असाच अनुभव येत असून त्यांची काम करण्याची पद्धत त्यांना यशस्वी अन् कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख निर्माण करून देते. त्यामुळे असे लोकांमध्ये मिसळणारे अधिकारी जनतेचे टार्गेट बनत नसून कामाचे टार्गेट ठरवत असतात आणि जनतेच्या मनात जागा मिळवतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा