You are currently viewing आर्तता

आर्तता

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*आर्तता*

 

याचना करताना शब्दातुन, स्वरातुन, कृतीतुन… आर्तता समोरच्यापर्यंत पोचल्यावर देव सुद्धा प्रतिसाद देतो तर इतरांचे काय?

पशूपक्षांना बोलता येत नाही पण त्यांचे स्वर केविलवाणे होतात व आर्तता समोरच्याला कळते.

बाळ आजारी झाल्यावर तिच्या श्रद्धास्थानी ती आर्ततेने विनवते. मातेची ही आर्तता प्रभुचरणी पोंचते व देवाची कृपा तिच्या बाळावर होते.

संकटी पडता भक्त आपल्या पुर्या ताकदीनिशी आर्तता एकवटून देवाला हांक मारतात आणि देव विरघळतो व त्या संकटाच्या वादळातुन भक्ताला नक्कीच वाचवतो.

आपले थोर संत ज्ञानोबा, सोपान मुक्ताबाई, जनाई, गोरोबा चोखोबा कबीर नामदेव कान्होपात्रा एकनाथ, तुकाराम यांच्या साहित्यात जर बघितलं तर हे महान संत विभुती इतके श्री. विठ्ठलाच्या चरणी तल्लीन होत कि, बाकी जगाचे भानच विसरत. समाज त्यांना हेटाळणी करत आरोप करत राही पण हे किंचितही विचलित न होता विठूरायाची भक्ती सोडत नसत.

त्यांची श्रद्धा… त्यातुन भक्ती.. त्यातली आर्तता विठूमाऊलीच्या काळजालाच जाऊन भिडत असे . अशावेळी ते स्वत:त्यांची कामे एखाद्या सेवकाप्रमाणे ऊरकून टाकत असत व त्यांना वाचवत. या भक्तांची संकटे न सांगता… हांक न मारता विठूरायाला समजय

त , इतकी भक्ती आळवण्यात आर्तता होती.

जनाईचे दळण, कांडण , कबिराचे शेले विणणे, गोराबांची मडकी, चोखोबाची गुरे राखणे, तुकोबारायांचे अभंग वाचवणे, एकनाथांकडे स्वत: विठूराया पाणक्या झाला होता. ज्ञानोबांच्या आर्ततेतुनच. “पसायदान”लिहिलं गेलं. त्या आधी मुक्ताईने आर्ततेने ताटीचे अभंग म्हणुन ज्ञानोबांना भानावर आणलं होतं.

देवाने त्या चार भावांसाठी रेड्याकडुन वेद म्हणुन घेतले.. भिंत चालवून दाखवली व पाखंडी चांगदेवाची चांगलीच जिरवून आपल्या भक्तांना वाचवले.या अशा श्रद्धेला देव सुद्धा जागतो… मदत करतो.

महाभारतात द्रौपदीने आपला भाऊ मानलेल्या श्रीकृष्णालाच आर्ततेने आळवले.

अत्यंत आर्ततेने मारलेली ती हांक द्वारकाधीशाचे काळीज जाळत गेली.. आणि द्रौपदीची लाज राखली गेली .

पण श्रीरंगाला जेव्हा हाताला जखम झाली होती तेव्हा याच द्रौपदीने विचार न करता क्षणात आपल्या भरजरी शालूची चिंधी फाडुन बोटाला त्याच्या बांधली होती . ही होती श्रद्धा आणि भक्ती. मग देव जागणारच.

आता कली युग आहे . आता अपवाद सोडला तर श्रद्धा … भक्ती ही दिखाऊ झाली आहे. आपण देवाला किती महागडे नवस बोलतो… किती दानधर्म करतो… सोने हिरे अर्पण करतो… किती हार पेढे ठेवतो अशा स्पर्धेतुन भक्त देव जाणायचा प्रयत्न करतात. प्रभूचरणी तल्लीन होण्यासाठी एक पैसाही देव मागत नाही. एका पेढ्या पैसे सोने यावर प्रसन्न व्हायला देव तुमचा नोकर आहे का?

सार्या जगाचा कारभार चालवणारा जगजेठी आहे तो.

तरीही क्षणात तुमच्या पाठीशी कृपेची सावली धरणारा तुमच्या या संपत्तीवर खुश व्हायला भिकारी आहे का.?

पण भक्ती… श्रद्धा. ही संकटापुरेशीच आहे असं समजुन सोयीस्करपणे देवाला विसरणार्या भक्तांचा अंदाज देवाला आर्तता हीन हांकेवरून लगेच समजतो. कसा तो प्रसन्न होणार? मदतीला धाऊन येणार!

बरं संकटे तर या युगात वारंवार येतात. ठाई ठाई संकटे समोर ऊभी रहातात.

अनेक द्रौपदी श्रीकृष्णाचा आजही लाज वाचावी म्हणुन धावा करतात. रडतात .भेकतात पण त्या हाकेत श्रद्धा.. भक्ती.. आर्तता कणभरही नसते. मग देवाच्या कानावर ती कशी पडणार!

संकट येईपर्यंत देवाची कोणाला आठवणच नसते. मग देव आपोआप भक्ताचे संकट कसे समजणार?

काळजी इतकीच वाटते कि, … या श्रद्धाहीन भक्ती युगात दिखाऊ देव देव करणार्या जगात पानोपानी अबोल वाढल्याच नाहीत अशा हातभर वयाच्या कळ्या ऊमलायच्या आधीच त्यांच्यावर गिधाडांची, पशूंची नको ती नजर पडते त्या पानोपानी अजुन दडलेल्या कळ्यांची अब्रू वाचवायला कोणता व कुठुन श्रीकृष्ण येईल?

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा