सावंतवाडी सर्वोदय नगर येथील रहिवासी रविवारी राबविणार स्वच्छता मोहीम
सावंतवाडी :
येथील सर्वोदय नगर येथील रहिवासी बांधवांनी उद्या रविवार, दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्याने व सर्व रहिवाशी यांच्या स्वच्छतेच्या सामाजिक जाणीवेतून सदर मोहीम आयोजित केली आहे. नुकतेच सर्वोदय नगर मधील रहिवासी यांनी एकत्र येत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे दृष्टीने एकच संघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा हा ‘स्वच्छता मोहीम’ असून याचा शुभारंभ उद्या होणार आहे.
स्वच्छता मोहिमेसाठी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे यांचे व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नगरपालिका कर्मचारी यांचाही सहभाग या स्वच्छता मोहिमेत राहणार आहे. उद्या रविवारी सकाळी ठीक सात वाजता सौ. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये रहिवाशांनी एकत्र येऊन तसेच स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित राहून आपला सहभाग दाखवायचा आहे. स्वच्छता मोहिमेची यावेळी प्रतिज्ञा देखील घेतली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ उद्या होणार असून स्वच्छता प्रेमी बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोदय नगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी केले आहे.