सिंधुदुर्गनगरी रस्त्यांच्या पदपथाच्या कामात होतोय लाखोंचा भ्रष्टाचार.

सिंधुदुर्गनगरी रस्त्यांच्या पदपथाच्या कामात होतोय लाखोंचा भ्रष्टाचार.

सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि ठेकेदारात होतंय संगनमत

संपादकीय…

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग ओरोसच्या देखरेखीखाली सिंधुदुर्ग नगरी तिठा ते सिंधुदुर्ग नगरी जिल्हा रुग्णालय पर्यंतच्या रस्त्याच्या पदपथाचे काम सुरू आहे. ४२ लाख रुपये खर्चाच्या या सुधारणा कामात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी आणि ठेकेदार सदरचे काम सदोष पद्धतीचा अवलंब करून करत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी संगनमताने गिळंकृत करण्याचा ठेकेदार व अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पदपथावर घालण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉक्ससाठी अंदाजपत्रक नुसार सोलिंग पीसीसी करून त्यानंतर पेव्हर ब्लॉक्स बसविणे आवश्यक होते. परंतु अधिकाऱ्यांशी झालेल्या संगनमतानुसार मातीच्या पृष्ठभागावर खडीची भुकटी (ग्रीट) पसरून त्यावरच पेव्हर ब्लॉक्स बसविले जात आहेत.
सदोष पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे ठेकेदाराचे जवळपास १५ लाख रुपये बचत होणार असून अधिकारी आणि ठेकेदार मिळून जनतेच्या सोयीसाठी सरकारने आणलेल्या सुविधांचे तीन तेरा वाजवून लाखो रुपये आपल्या घशात घालणार आहेत. सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी आणि ठेकेदार अशाच पद्धतीची सदोष कामे करून स्वतःची घरे भरत आहेत, त्यामुळे *जिल्ह्याचा विकास हा तोंडाला पावडर लावल्यावर सुंदर दिसणाऱ्या पोरीसारखाच होताना दिसत आहे. एकदा का घाम फुटला की ही पावडर उतरणार आणि खरा चेहरा समोर येणार* तसंच सिंधुदुर्गनगरी येथील पदपथाचे येत्या काहीच दिवसात होणार याबाबत शंकाच नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय अगदी कुशीलाच असताना देखील बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सदोष पद्धतीने चाललेलं काम नजरेस का येत नाही? हा देखील संशोधनाचा विषय असून यात अजून कोनाकोणाचे हितसंबंध गुंतले आहेत याचीही पोलखोल होणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी जनतेच्या पैशातून केली जाणारी ही कामे नक्की किती दिवस टिकणार आहेत, याचाही नवनगर प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी विचार करणे आवश्यक आहे. शासनाच्या निधीवर अशाप्रकारे डाका घालून जनतेच्या पैशांची वाट लावून जनतेला दिल्या जाणाऱ्या सुविधा अशा बरबाद करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मनसे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदरचा सुरू असलेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी मांडणार असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील करणार आहेत. जिल्ह्यातील जनतेने देखील जागरूक राहून जिल्ह्यात शासनाच्या निधीचा वापर करून सुरू असलेल्या कामांबाबत जागरूक राहून शासनाच्या निधीतून योग्यप्रकारे कामं कशी होतील याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा