You are currently viewing संमेलन गुणीजनांचे….

संमेलन गुणीजनांचे….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांचे शेकोटी कवी संमेलनातील भाषण*

 

*संमेलन गुणीजनांचे….*

 

सन्माननीय व्यासपीठ व मायभूमीच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, गुलशनाबादच्या प्रेमात पडलेल्या माझ्या साहित्यप्रेमी सुहृदांनो,

……..

या जनस्थान नगरीत मी आपले सहर्ष स्वागत

करते नि तमाम नाशिककरांच्या वतीने आपणा

समोर नतमस्तक होते. माझ्या मागील व माझ्या समोरील ज्ञानवंत व गुणवंत जनसमुदाय पाहिल्या नंतर मी खरोखर संभ्रमात पडले आहे.

मी खरोखर लहान असल्याची प्रचिती मला येते

आहे तरी आपण समस्त नाशिककरांनी दाखवलेले प्रेम व माझ्यावरील विश्वास, केवळ या विश्वासापोटी मी नम्रपणे आपल्यासमोर उभी

आहे.

 

तशी मी लहानपणापासूनच वाचनवेडी आहे, त्यामुळे असेल कदाचित आपल्या समोर उभे

राहण्याचे धारिष्ट्य मी केले. शिवाय काही लोकांपुढे आपला इलाजच चालत नाही असे

मला मुलासमान असणारे व मला ज्यांच्यात नेहमीच विठोबा दिसतो अशा पवार सरांपुढे

माझा नाईलाज झाला. मी खूप वाचले व तीस वर्षे

विद्यार्थी घडवण्याचे काम मनापासून केले ही

कदाचित माझी जमापुंजी असावी जिने मला

व्यासपीठावर उभे केले. आपण मला ऐकून घ्याल हा मनी विश्वास आहेच.

 

या सलग अठ्ठेचाळीस तास चालणाऱ्या विक्रमी

शेकोटी साहित्य संमेलनाचा हिस्सा बनून मी अजरामर

झाल्याचा मला खूप आनंद आहे.या संमेलनाच्या

निमित्ताने का होईना मी चिरंजीव होणार आहे ही

केवढी महान गोष्ट आहे. हे नुसते साहित्य संमेलन नाही तर हे लोककला संमेलन आहे. आपल्या भारताच्या विविध प्रांतांत लोककलेचे

मोठे स्थान आहेच पण या लोककलांना जनमानसात मोठाच मानही आहे. या लोककलांचे, परंपरांचे पिढ्यान् पिढ्या जतनही

केले जाते आहे हे आपण बघतो आहोत. किंबहुना अशा परंपरांचा अभिमान आपल्या नसानसात मुरला आहे. त्या आपल्यापासून आपण वेगळ्या करूच शकत नाही इतक्या त्या

जनमानसात मुरल्या आहेत.आता दोन दिवस आपण त्यांचा मनसोक्त आस्वाद घेणार आहोत.

 

विनोबाजी भावे म्हणतात, आपण आनंद स्वरूप

आहोत, आपणच आनंद आहोत. हा आनंद शोधायला कुठे ही बाहेर जायची गरज नाही.अहो, ढोलकी नुसती घुमू लागताच अबालवृद्धांचे पाय थिरकू लागतात. आनंद तुमच्यात आहे म्हणून पाय थिरकतात. नाहीतर ढोलकी नुसतीच घुमत राहील, तसे होत नाही.

आपल्यातील चैतन्य ओसांडून बाहेर पडते व नाचू लागते ही अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे.

तसे न घडले तरच नवल. नाचणे ही अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे. त्यातून माणसाला प्रचंड

आनंद मिळतो. तो माणसाने अवश्य घ्यावा पण

सभ्यता व संस्कृतीच्या सर्व मर्यादा पाळूनच.

या बाबतीत आसामी व आपली आदिवासी नृत्ये

अतिशय सुंदर आहेत. दक्षिणेतील तर लाजवाब आहेतच. संगीताची तर फारच मोठी महान परंपरा भारतीय संगिताला आहे व आजही संगिताची अनेक घराणी संगितावर काम करत

नवनवे शिष्य घडवित आहेत.लावणी पोवाडे भारूडे गवळणी गणगवळण दशावतारी नाटके

ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. अनेक संत पंत व तंत कवींचे योगदान त्यात आहे.

 

आता दोन दिवस आपला साहित्य जागर आहे.

आपल्या विविध कलांचे प्रदर्शन आहे. अशी संमेलने म्हणजे अशा कलांचे तारक व जीवदान

देणारे व्यासपीठंच. होय ह्या कलांची उजळणी

झाली नाही तर त्या मरतील. म्हणून त्यांची उजळणी झालीच पाहिजे ती आपण करत आहोत. दोन दिवस कविता वाचन होईल व साहित्यिक आपली कला सादर करून खुष होतील, समाधानी होतील.

शेकोटी संमेलनात…

निर्मितीशील लेखकाला अनुकूल भूमी निर्माण

करून देणे,साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे,वरपांगी

सजावटीला महत्व प्राप्त न होऊ देणे,चैतन्य

न हरवता ती साहित्य चळवळ होण्यासाठी

प्रयत्न करणे हे साहित्य संमेलनातील मूळ बीज

होय.या लोककला जतन करून ठेवायला हव्यात.तेच कार्य शेकोटी संमेलनं करत आहे ही

फार चांगली गोष्ट आहे.

 

होय, माणसाला समाधान देते ते साहित्य. “स.. हित”.. येते ते साहित्य. माणसाचे हित साधते

ते साहित्य. माणसाला व समाजाला दिशा दाखवते ते साहित्य अशी माझी साहित्याची

सोपी व्याख्या आहे.माणसाच्या थेट हृदयात शिरते ते साहित्य. डोक्यावरून जाते ते नव्हे.

जाणकार विद्वानांनी साहित्याच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. साहित्याची निर्मिती ते

त्याच्या उपयोजना पर्यंत साहित्याचा खूप मोठा

प्रवास आहे. साहित्य ही उत्कृष्ट विचार,कल्पना

किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे.

ते इतिहास, भाषा,शैली,आणि विषयाभिमुख असले तरी जीवनाचे नि वास्तवाचे सौंदर्यात्मक

सार परिभाषित करते की नाही हे लेखनाचे साधक आणि मानदंड स्पष्ट करते. तसेच काल्पनिक लेखनात इतकी खोली आहे की,

त्याच्या अंमलबजावणीतील उत्कृष्टतेमुळे

कोणीही कथेत राहू शकेल.

 

साहित्य आणि कला या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना आहेत. साहित्य म्हणजे लिखित किंवा बोलल्या गेलेल्या कलाकृतीचा

संदर्भ आहे जे अर्थ भावना आणि कल्पना व्यक्त

करण्यासाठी भाषेचा वापर करतात.यात कविता,कादंबरी, निबंध, नाटके आणि सर्जनशील लेखनाचे इतर प्रकार समाविष्ट असू

शकतात.

 

साहित्याच्या व्याख्येमध्ये संस्कृती प्रसारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिखित कार्याचा समावेश होतो.तथापि, साहित्य नेहमीच

लिखित शब्दापुरते मर्यादित नसते.साहित्याच्या अर्थामध्ये मौखिक परंपरेत सांगितल्या गेलेल्या

कथा आणि दृश्य साहित्य उदा.प्रेक्षकांसमोर सादर करण्याच्या हेतूने केलेले नाटक यांचा समावेश असू शकतो. साहित्य हे संस्कृतीचा प्रसार करणारे कार्य आहे. बरेचसे साहित्य लिहिलेले आहे.परंतू काही दृश्य जसे नाटक

आणि मौखिक जसे लोककथा देखील आहेत.

गद्य, काल्पनिक गद्य कविता, नाटक आणि लोककथा हे साहित्याचे प्रमुख प्रकार आहेत.

प्रत्येक साहित्यिक प्रकार लहान श्रेणी मध्ये

विभागला जाऊ शकतो ज्यांना शैली म्हणून

ओळखले जाते.साहित्याचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. लहानपणी ऐकलेल्या परीकथा दंतकथा काल्पनिक शैलीचे प्रतिनिधित्व करतात. लघुकथा,कादंबरी,कविता,

महाकाव्य,खंडकाव्य,नाटक,शोकात्मिका,सुखात्मिका,प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गिकरण केले जाते.

 

साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. काल्पनिक लेखनात इतकी खोली आहे की

त्याच्या अंमलबजावणीच्या उत्कृष्टतेमुळे कोणीही रमून जाईल.साहित्य हे लोकांचे मुख्य

राष्ट्रीय वैशिष्ट्य प्रतिबिंबित करते.साहित्य हे भाषिक,सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर

प्रकाश टाकते.साहित्य हे समाजात अनेक भूमिका बजावते.साहित्य हे सामाजिक बदल घडवू शकते. साहित्य हे असे साधन आहे ज्या

मुळे लोकांना अनुभवाची देवाण घेवाण करता येते. संस्कृती व परंपरा जोपासण्या बरोबरच

सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याची ताकद

साहित्यात आहे.

 

साहित्यातील आपले सर्वाधिक आवडते प्रकार

म्हणजे, एकनाथांनी रूढ केलेले भारूड, पेशवाईत धुमाकूळ घालणारी लावणी, पराक्रमी

राजांविषयी गायले गेलेले जोशपूर्ण पोवाडे. एके

काळी या प्रकारांनी लोकांचे खूप रंजन केले. पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्यामुळे या कलांना

फार मान होता. लावणी तेव्हा चार भिंतीच्या आत असली तरी नंतर खूप फोफावली व तिचे

जोरदार पिक आले म्हटले तरी चालेल. आणि

आजकाल तर तिला चांगलीच प्रतिष्ठा प्राप्त

होऊन ती थिएटरची धनी झाली आहे. लोक मान्यता मिळवून आहे.

 

लावणी गाणे आणि नृत्य यांचे मनमोहक मिश्रण

आहे.जे ढोलकीच्या तालावर पारंपारिक व मनमोहकपणे दाखवले जाते.लावणी या शब्दाचा उगम लावण्यपासून झालेला असून ते

मराठी सौंदर्य दर्शविते. नऊवार साडी नेसून महाराष्ट्र व दक्षिण मध्यप्रदेशात महिलांद्वारे

त्याचे प्रदर्शन केले जाते. त्याला एक आकर्षक

थीम असते. एके काळी मराठी सिनेमाला तर

लावणी शिवाय दुसरा विषयच सापडत नव्हता.

जोरदार सवालजवाब व जुगलबंदी ऐकणाऱ्यांना

खूप मजा आणत असे.खूप वर्षे हे प्रस्थ मराठी

सिनेमात ठाण मांडून होतेच व काही प्रतिष्ठित

गायकांनी व ग दी मां सारख्या व शांताबाई शेळके यांच्या दिग्गज साहित्यिकांकडूनही लावणीला प्रतिष्ठा बहाल झाली. सुरूवात तशी

होनाजी बाळा यांच्या काळापासूनच झाली होती.

 

दुसरा अत्यंत लोकप्रिय प्रकार

 

म्हणजे पोवाडा,

तो ही पेशवाईत खूप बहरला होता. अनेक नामवंतांनी पोवाडे लिहिले. लावण्या लिहिल्या

व ते इतिहासात अजरामर झाले. आणखी काही

लोकरंजनाचे प्रकार म्हणजे भारूडे, बहुरूपी, वासुदेव, टिंगरीवाले पिंगळा जे भल्या पहाटे

गुडगुडीचा गुडगुड आवाज करत कंदिल सोबतीला घेऊन गल्ली बोळातून गावोगाव फिरत असत. ह्या साऱ्या लोककलाच होत्या

व लोकांचे उत्तम प्रकारे मनोरंजन करत होत्या.

 

माझ्या लहानपणी “वासुदेव” मोरपिसाची टोपी

घालून दारात येताच आम्हाला प्रचंड आनंद होत

असे. त्याच्या हातातील त्या चिपळ्या, त्यांचे गाणे म्हणत गिरक्या घेऊन नाचणे,गांवकुसातल्या लोकांचे विरंगुळ्याचे मोठेच साधन होते. आमच्या गोलाकृती वाड्यात

त्याने प्रवेश करताच आम्हा धावतच ओट्यावर येत असू. एकेका घरासमोर त्याचे नाचणे मनभरून पहात असू. पूर्वी व्यवहार पैशात होत नसत. आमच्या दारासमोर येताच नऊवारीतील

माझी आई सुपात दाणे घेऊन ते सूप त्याच्या

हातात देत असे. सुप हातात येताच.. दाण्यांसहित तो अशी काही गिरकी मारायचा की एक दाणा खाली पडत नसेच वरून..

माझे आजोबा त्यांचे नाव घेऊन तो म्हणत असे…

 

“ तुळशीराम बाबाच्या नावाने..

दान दिले सुंदरा बाईने…

म्हणत खुशीने सुप आपल्या खांद्याला लावलेल्या झोळीत रीते करत असे. त्या झोळीला दोन-तीन कप्पे असत. गहू, बाजरी,

ज्वारी असे. बरोबर त्या कप्प्यात तो धान्य ओतत

असे. वाड्यातल्या सातआठ घरासमोर नाचे पर्यंत आमचा मुक्काम त्या त्या ओट्यावर. मग,

म्हणून तर आंखोदेखा हाल लिहिते आहे ना?

लोककलांनी परिपूर्ण असे सुंदर जीवन होते ते.

कसलीही चणचण कधी जाणवली नाही की वेळ जात नाही हा प्रश्नही निर्माण झाला नाही.

 

मग यायचे गळ्यात भरपूर माळा व देवीचा

फोटो अडकवून न मांडीवर छोटी दोन वाद्ये गोल

काठीने वाजवत दीड पायावर उभे रहात व सांकेतिक भाषेत पूर्वजांची नावे ओळखणारे

धान्य मागून पोटभरणारे असे हे लोक.ते ही घरोघर फिरत असत. सांकेतिक खुणांनी त्यांचे

नाव ओळखणे आम्हाला फारच भयंकर वाटत

असे कारण त्यातले गुपित तेव्हा माहित नव्हते

व कळतही नव्हते. मजा मात्र वाटायची. आताही

ते दृश्य तसेच्या तसे मला डोळ्यांसमोर दिसते आहे.

 

केवढा मोठा वाटा होता हो लोकरंजनात या लोकांचा, सांगून कुणाचा विश्वास बसणार नाही. अहो, भगत, भक्त, लोमडीवाले, मोतीवाले,

बैलवाले, जोतिष पाहणारे, वासुदेव,दारासमोर

खड्या आवाजात पोवाडा म्हणणारे, सुयाभिलावावाले, पोपटवाले, भाट जे पू्र्वजांची

माहिती त्यांची चोपडी उघडून आम्हाला दाखवत

असत.ही सारी मंडळी आपल्या सनातन संकृतीची ओळख होती. होळी झाली रे झाली की गावाबाहेर राहणारे व आमच्या शेतांची राखण करणारे भिल्ल आदिवासींचा गट पायात घुंगरू बांधून

छुन छुन करत आमच्या अंगणात अवतरले की

आमच्या हृदयाचे ठोके आनंदाने असे वाढत की

आम्ही तो नाच संपूच नये असे वाटत त्यांच्या मागे गावभर फिरत असू. काय नाचतात व ठुमकतात हो हे लोक, बघतच रहावे आपण.

ही त्यांची संस्कृती खेडोपाडी त्यांनी अजून टिकवून ठेवली आहे व पावसाळ्यात देखील पावसाने आखडता हात घेतल्यास डोक्यावर लिंबाच्या पानांच्या डहाळ्या घेत व कमरेलाही ती पाने बांधून ही आदिवासी मंडळी धोंडी धोंडी पाणी दे म्हणत थेट आपल्या अंगणात उतरतात. तेव्हाही त्यांचे नृत्य बघण्यासारखेच असते. हा सारा अनुभव मी लहानपणी घेतला आहे म्हणूनच तो इत्यंभूत मला येथे मांडता आला.आम्ही शहरवासी त्याला मुकल्यामुळे ह्या सर्व लोककलांचे प्रदर्शन ह्याच

देही ह्याची डोळा आपण दोन दिवस मनसोक्त

अनुभवणार आहोत हे आपले केवढे भाग्य आहे

नाही का?

 

सर्वच लोककलांचे प्रदर्शन येथे होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे लोककला संमेलन

आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावोगाव मोठ्या प्रमाणात किर्तन होत असे. गाडगेबाबांचे किर्तन आपण ऐकून आहोत पण मी माझ्या लहानपणी गावात

अशा कितीतरी किर्तनांना हजेरी लावलेली आहे.

गावाच्या विरंगुळ्याचा व प्रबोधनाचा किर्तन म्हणजे फार मोठा हिस्सा होता. आमच्या गावात

कापडण्यात “सीताबाईचे” किर्तन खूप गाजल्याचे मला आठवते. मी लहान होते, उत्साहाने जात असे, कळत काहीच नव्हते. गावच जातो मग मी पण जात होते, पण लवकरच

झोप मला घेरत असे हे चांगलेच आठवते. सांगायचा मुद्दा हाच की पोवाडे, किर्तन, वगनाट्य, तमाशा कलापथके ह्या सर्व प्रकारातून समाजाचे

मोठे प्रबोधन तर होत असेच पण त्यामुळे गावात

एकप्रकारचे चैतन्य पसरत असे.मी स्टेजवर खुर्चीत बसून कलापथकांना हजेरी लावली आहे.

५५/५६ साली मी अगदी लहान असतांना आमच्या घरी कलापथकात काम करणारी व देशसेवेने झपाटलेली मंडळी कमल पाध्ये, निळू फुले, शरद तात्या, कमल पाटील(बाकी नावे आठवत नाहीत)सारे आमच्याकडे मुक्कामाला

राहून कलापथकात “बिन बियाचे झाड” “गाढवांचे कान” अशी वगनाट्ये सादर करून

अडाणी समाजाचे प्रबोधन करत असत. मी लहान असल्यामुळे सतत त्यांच्या आसपास लुडबुड करत असे. त्यांच्या, घरात चाललेल्या

रिहर्सल बघत असे. हे आज मला कळते आहे.

पण तेव्हा कुठे कळत होते. माझे वडीलच देश

सेवेने झपाटलेले असल्यामुळे अगदी विनोबा

भावे, साने गुरूजी, शंकरराव देव, भारताचे पहिले

अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख व दुर्गाबाई देशमुख यां सारख्या महान विभुतींचे पाय आमच्या गावाला लागले.कमल ताई तर आमच्या ओट्यावर स्त्रियांना पाटी पेन्सिल देऊन

शिकवत असत.

 

कापडण्याला अमरशेखांचे पोवाड्याचे कार्यक्रम

मी स्टेजवर बसून ऐकले आहेत. त्या काळात

ध्वनीक्षेपक नव्हते पण एकहजाराच्या जनसमुदायापुढे त्यांचा खडा आवाज सहज पोहचत असे व लहानवय असल्यामुळे मी लवकरच स्टेजवर खुर्चितच झोपी गेले तरी हे प्रसंग माझ्या मनावर चांगलेच कोरले गेले आहेत

यात वादच नाही.

 

तीच गोष्ट तमाशाची. एकदा की जत्रा सुरू झाल्या की गावोगाव कुस्ती व तमाशाचे पेव फुटत असे. जत्रा म्हणजे तमाशा हवाच हे समिकरणच होते. माझे वडीलच गावचे पुढारी

असल्यामुळे सर्व गोष्टी आमच्याकडेच ठरत असत. कुस्ती तर हवीच पण तमाशाही हवाच.

रात्री अख्खा गाव तमाशाला लोटत असे. हा तमाशा पहाटेपर्यंत चालायचा. मग सकाळी

शेतावर जायची खोटी होत असे. तेवढे क्षम्य

समजले जायचे. हे तमाशातले नाचे आम्ही सकाळी शाळेत जातांना पहायचो तर केस वाढलेले व रात्री स्त्री पार्ट केलेले हे नाचे पाहून

आम्हाला फारच मजा वाटायची. ते ही आमच्या

कडे पाहून हसत असत.एकदा तर सर्व संकेत

मोडून..(हो, बायका तमाशाला जात नसत) मी

वडिलांकडे तमाशाला जाण्याचा हट्ट धरला व

वडीलही मोठ्या मनाने मला गावाबाहेर नदीच्या वाळूत रात्री तमाशा बघायला घेऊन गेले. मला

कळत काहीच नव्हते, (सातआठ वर्षांची असेन मी) लवकरच मी घरी परतले हे सांगायला नकोच.एकूणच तमाशा, सर्कस, कुस्त्या, जत्रा,

वीर, तगतराव, शिमग्याचा नाच, किर्तन अशा कित्ती तरी गोष्टी आहेत की ज्यांनी खेड्यात राहणाऱ्या आमचे मनोरंजन तर केलेच पण

आमच्यावर उत्तम संस्कारही केले. स्वातंत्र्यानंतर

उदयाला आलेल्या कलापथकांनी तर मनोरंजनाबरोबर लोक शिक्षणाचे प्रचंड कार्य

केले हे आमच्या पिढीने अनुभवलेले आहे जे आम्ही कधीच विसरलो नाही. थोडक्यात ही

तेव्हा लोकशिक्षणाची गंगाच होती असे म्हटले

तरी चालेल कारण निखळ विनोद सोडला तर

त्यात वावगे असे काही नव्हतेच. वडीलच मुखिया असल्यामुळे गावात त्यांचा प्रचंड दरारा

होता. ते माझे वडील होते थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी विष्णुभाऊ पाटील. त्यांच्या कार्याचा थोर वारसाच कदाचित मला तुमच्या

पर्यंत घेऊन आला असावा नाही का?

 

साहित्य लोकांच्या भाषेचे सर्वात दृश्यमान आणि टिकाऊ मूर्त स्वरूप म्हणून, एक बंधनकारक घटक म्हणून कार्य करते. राज्य व

राष्ट्राचे भावनिक ऐक्य वाढवण्यात

 

साहित्याचे

मोठे योगदान आहे म्हणून अशा संमेलनांचे विशेष महत्व आहे.अशा या साहित्याविषयी खूप

काही बोलता येईल पण वेळेची मर्यादा आहेच.

 

आता अशा या संमेलनांसाठी आयुष्य वेचणारे

आपले सुरेश पवार. मला वाटते ते आता एखाद्या

मोठ्या ग्रंथातही मावणार नाहीत. त्यांच्या कामासाठी अफाट शब्दही कमी पडावा असे

अफाट कार्य आहे त्यांचे.दिवसाचे चोविसतास त्यांना सतत नव्याचा ध्यास आहे. नुसता ध्यास

नाही तर प्रत्येक नवी गोष्ट कृतीत आणण्याचा

हव्यास देखील आहे. इतक्या नवनवीन कल्पना

त्यांना सुचतात कशा नि अशी ही कोणती उर्जा

आहे जी त्यांना सतत कार्यरत ठेवते? कसलाही लोभ नाही. काम हाच त्यांचा ध्यास व श्वासही

आहे. मी तर म्हणेन अशा चारित्र्याचे शेकडो सुरेश पवार निर्माण व्हायला हवेत म्हणजे हा

समाज नावाचा चैतन्य रथ अधिक वेगाने घोडदौड करेल.धन्य ती माऊली जीने समाजाला

हा परीस अर्पण केला ज्याच्या स्पर्शाने अनेकांचे सोने होते आहे. खरोखर त्या माऊलीने हा जीता जागता विठोबा आपल्याला अर्पण केला आहे.म्हणून खरेतर ती सत्कारास पात्र आहे.गुळा

कडे मुंग्यांनी धाव घ्यावी तशी माणसे त्यांच्याकडे धावत असतात.एक विलक्षण असे

आकर्षण त्यांच्या विषयी लोकांमध्ये आहे. विठ्ठलाकडे लोक का धाव घेतात त्याचे रहस्य

त्यांच्याकडे पाहून उलगडते असे म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यांनी हे जग शून्यातून व अपार

कष्टाने उभे केले आहे हे सांगणे न लगे. गेली

चाळीस वर्षे ते अथक परिश्रम करत आहेत त्यांचेच हे इतके रसरशीत फळ आहे. त्यांची स्मरण शक्ती अफाट आहे. ते उत्तम कवी आहेत तसे रसाळ वक्तेही आहेत. हातात कागद न घेता ते कितीही वेळ बोलू शकतात. त्यांची ही

उर्जा अशीच बरकरार रहावी व देवाने त्यांना

अशीच शक्ती सदैव प्रदान करावी व त्यासाठी

निरामय आरोग्यही प्रदान करावे अशी परमेश्वर

चरणी प्रार्थना करते व आपण सर्वांनी दिलदारपणे मला ऐकून घेतले म्हणून आपणा

सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबते.

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच, जबाबदारी

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा