You are currently viewing मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार…

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाचे अखेर 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.

संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. या विमानतळाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

पूर्वी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे वाद संपूर्ण राज्याला माहिती आहेत. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतात. तर शिवसेनेचे नेतेदेखील राणेंना प्रत्युत्तर देतात. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिपी विमानतळाची प्रतिक्षा आहे. मात्र, तब्बल 20 वर्षांपासून या विमानतळाचे काम रखडले होते. आता या विमानतळाचे उद्घाटन होणार असून हे विमानतळ सुरु होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांची विमानतळाची प्रतीक्षा आता संपणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =