You are currently viewing डॉ. अब्दूल कलाम यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारणे गरजेचे – सौ. श्रद्धा सावंत-राणे 

डॉ. अब्दूल कलाम यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारणे गरजेचे – सौ. श्रद्धा सावंत-राणे 

मळगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

सावंतवाडी

भारत देशाचे माजी व अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारले पाहिजेत,  ते गरजेचे आहे. शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष व त्यांचे विचार आजच्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थीनी व प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करायला हवा, असे मोलाचे प्रतिपादन मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा याच शाळेच्या माजी विद्यार्थीनी सौ.श्रद्धा सावंत-राणे  यांनी शनिवारी मळगाव येथे केले.

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने संपन्न झालेल्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वाचन मंदिरातील सहाव्या जयंती दिन व वाचन प्रेरणा दिन प्रसंगी उपस्थित वाचक व विद्यार्थी-विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना सावंत बोलत होत्या.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या व विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी शिक्षक बी. एन. सामंत सर, शुभांगी धर्मा, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, वाचनालयाचे संचालक माजी मुख्याद्यापक बाळकृष्ण मुळीक, स्नेहा खानोलकर, महेश पंतवालवलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, वाचनालयाचे ग्रंथपाल आनंद देवळी, पत्रकार सुखदेव राऊळ, मळगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव, माजी मळगाव ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर तसेच मळगाव इंग्लिश स्कूलचे आजी विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धा सावंत-राणे पुढे म्हणाल्या, कलाम यांनी आपल्या लहानपणातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन  व लहानपणी वृत्तपत्रे विकून आपले शिक्षण पूर्ण केले होते. यासाठी मळगाव येथे असलेल्या कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करावे. वाचनातून ज्ञान मिळते. ते ज्ञान मिळविण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यानी वाचन करा, असे सावंत म्हणाल्या. सावंत  म्हणाल्या, या वाचनमंदिरामुळे आपणांस सुद्धा खुप फायदा झाला होता व आजही होत आहै. या वाचन मंदिरातील जवळजवळ सर्वच पुस्तके आपण वाचली आहेत  व आजही वाचत आहे. तुम्हीही या वाचन मंदिराचे सभासद व्हा व जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करा. पुस्तकांमधूनच ज्ञान मिळते. ते ज्ञान मिळवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच त्यांनी या वाचन मंदिर कडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतूक केले.

यावेळी माजी शिक्षक तथा वाचन मंदिराचे नियमीत वाचक सामंत सर यांनी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनी वाचक यांना मार्गदर्शन करताना आजच्या पिढीतील विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना दुरदर्शन संच, मोबाईल यासारख्या आधुनीक साधनांद्वारे हवी ती माहिती मिळत आहे. काही वर्षांपुर्वी आम्हांला या वाचन मंदिरातील पुस्तके, वर्तमान पत्रे यामधून माहिती मिळत होती. आज मळगाव मध्ये सुरु असलेल्या या वाचन मंदिरामुळे मळगाव मधील वाचकांसहीत आजूबाजूच्या गावातील व मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.” अशा शब्दात वाचन मंदिराचे व वाचन मंदिर कार्यकारीणीचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाचन मंदिरामध्ये वर्षभर चांगले वाचन केलेल्या वाचक बी. एन. सामंत, शुभांगी धर्मा यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, एक पुस्तक व रोख रक्कम देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वाचन मंदिराचे विद्यमान अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाहक गुरुनाथ नार्वेकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हेमंत खानोलकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. या कार्यक्रमास मळगावमधील वाचकप्रेमी व सभासद यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा