आजपासून जगातील सर्वात मोठे लसीकरण सुरू

आजपासून जगातील सर्वात मोठे लसीकरण सुरू

नवी दिल्ली

आजपासून (शनिवार १६ जानेवारी, २०२१) जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी भारतात ही लसीकरण मोहीम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या मोहिमेचा शुभारंभ करतील. भारतात सात महिन्यांत ३० कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे.

लसीकरण मोहिमेत डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. नंतर सैनिक आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी या फ्रंटलाइन वर्करना लस दिली जाईल.

मग ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना तसेच एक किंवा जास्त गंभीर आजार असलेल्या पन्नाशीच्या नागरिकांना लस दिली जाईल. यानंतर इतर नागरिकांचे लसीकरण होणार आहे. मोहिमेतील पहिल्या ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

देशात आजपासून ३ हजार ६ लसीकरण केंद्र कार्यरत होणार आहेत. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात किमान १०० जणांना लस दिली जाईल. आधी सरकारी सेवेतील नंतर खासगी सेवेतील डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना लस देण्यात येईल. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसचे १ कोटी १० लाख डोस आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसचे ५५ लाख डोस भारत सरकारने खरेदी केले असून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राज्यांना पुरवले आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस पुरवण्याची व्यवस्था झाली आहे.

कोविशिल्ड लस २०० रुपये दराने तर कोवॅक्सिन ही लस २०६ रुपये दराने उपलब्ध आहे. भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी कोवॅक्सिन ही लस ९०० ते एक हजार रुपये या दराने मार्च २०२१ पासून उपलब्ध होणार आहे. तसेच कोविशिल्ड लस ऑगस्ट २०२१ पासून एक हजार रुपये दराने बाजारात उपलब्ध होणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकाला लस खरेदी करुन डॉक्टरांच्या मदतीने लसीकरण करुन घेता येईल.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस दोन ते आठ अंश से. तापमानात दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. भारतातून कोविशिल्ड अनेक देशांना निर्यात होणार आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांच्या सरकारकडून कोविशिल्ड लसला मागणी आहे. पण जगभर डॉक्टर, मेडिकल स्टाफ, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने कोविशिल्ड दिली जाणार आहे. अठरा वर्षे झालेले ते पन्नाशीच्या आतले अशा मोठ्या समुदायाची मागणी सरकारी लसीकरणातून लवकर पूर्ण होणे कठीण आहे. याच कारणामुळे मार्चपासून भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन आणि ऑगस्ट महिन्यापासून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसची भारतीय बाजारात खुली विक्री सुरू होणार आहे. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे.

भारत सरकारने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली. यानंतर एका कंपनीने सरकारी मागणीला तर दुसऱ्या कंपनीने खासगी मागणीला प्राधान्य द्यायचे अशा स्वरुपाचे नियोजन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटींपेक्षा जास्त आहे. यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे नियोजन करुन लसीकरण सुरू आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.

भारत बायोटेक कंपनी अठरा वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांसाठी एक लस विकसित करत आहे. या लसच्या पहिल्या टप्प्यातील प्रयोगाला परवानगी मिळाली आहे. तसेच नाकातून थेंब टाकून लस देण्यासाठीही भारत बायोटेक कंपनी प्रयोग करत आहे. हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले तर कोरोना संकटावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीला फोटो आणि निवासाचा पत्ता असलेले ओळखपत्र (उदाहरण – आधारकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट इ.) सादर करुन कोविन या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. अद्याप कोविन अॅप सामान्यांच्या वापरासाठी कोणत्याही अॅपच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आलेले नाही. सध्या प्रत्येक केंद्रावर निवडक कर्मचाऱ्यांना थेट सरकारकडून अॅप दिले जात आहे आणि या अॅपवर नोंदणी होत आहे. सामान्यांसाठी अॅप रोलआऊट केल्यानंतर त्याबाबतची माहिती सरकारकडून जाहीर केली जाणार आहे.

गरोदर महिला आणि १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना सध्या लस देणार नाही. लसीकरण मोहिमेच्या माहितीचे विश्लेषण करुन काही महिन्यांनंतर गरोदर महिला आणि १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरणाबाबतचे निर्णय होतील. लसीकरण ऐच्छिक असले तरी पात्र व्यक्तींनी कोरोनावर मात करण्यासाठी लस घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. लसचे दोन डोस आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी कधी यायचे याची माहिती लसीकरण केंद्राकडून दिली जाईल. लसचा प्रभाव जाणवण्यासाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक लसीकरण केंद्रावर सुरक्षा रक्षकासह पाच सदस्यांची टीम कार्यरत असेल. लसीकरण कक्ष, प्रतिक्षालय आणि निरीक्षण कक्ष अशा तीन कक्षांची व्यवस्था असेल. लस घेतल्यानंतर किमान ३० मिनिटे निरीक्षण कक्षात थांबावे लागेल. कोणत्याही स्वरुपाचा त्रास झाला नाही तर ३० मिनिटांनंतर घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. त्रास झाल्यास अशा प्रश्नांना हाताळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांचे स्वतंत्र पथक प्रत्येक लसीकरण केंद्रावर कार्यरत असेल. कोणत्याही औषधाचे अनेकांना लाभ होतात तर काहींना त्याचा त्रास होतो याच पद्धतीने लस घेतल्यानंतर काही जणांना त्रास होण्याची शक्यता आहे. नागरिकांना लसचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क लावणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे या बंधनांचे पालन करायचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा