‘पिकलबॉल’ हा अतिशय सुंदर व अल्पावधीत लोकप्रिय झालेला खेळ…
*खेळाचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध ; युवराज लखमराजे भोंसले*
सावंतवाडी
साधारण दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पिकलबॉल असोसिएशनची स्थापना जिल्हाभरात करण्यात आली आहे. मात्र आचारसंहिता असल्यामुळे अधिकृत घोषणा केली गेली नाही. ‘पिकलबॉल’ हा अतिशय सुंदर व अल्पावधीत लोकप्रिय झालेला खेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खेळाचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. यावेळी पिकलबॉल कमिटीचे चेअरमन सुमित दत्त, सिंधुदुर्ग जिल्हा पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, उपाध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, सचिव संतोष राणे, सहसचिव देवेन ढोलम, खजिनदार अमित वळंजू, सहखजिनदार प्रमोद भोगटे व सदस्य डॉ. श्रीकृष्ण परब आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना युवराज लखमराजे भोंसले पुढे म्हणाले, पिकलबॉल हा एक रॅकेट किंवा पॅडल खेळ आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) एक गुळगुळीत पॅडल वापरून छिद्रित, पोकळ प्लास्टिकच्या चेंडूवर 34-इंच-उंची (0.86 मीटर) जाळी एक बाजू होईपर्यंत मारतात. चेंडू परत करण्यास अक्षम किंवा नियमांचे उल्लंघन करते. पिकलबॉल घरामध्ये आणि बाहेर खेळला जातो. आपण स्वत: आणि युवराज्ञी श्रद्धाराजे ह्या देखील या खेळात सहभागी असून त्यांना प्रचंड अभिरुची असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी उपस्थित पिकलबॉल कमिटीचे चेअरमन सुमित दत्त यांनीही माहिती दिली. ते म्हणाले . वॉशिंग्टन राज्यातील बेनब्रिज बेटावर, युनायटेड स्टेट्समध्ये मुलांचा घरामागील अंगण खेळ म्हणून 1965 मध्ये त्याचा शोध लावला गेला. 2022 मध्ये पिकलबॉलला वॉशिंग्टनचा अधिकृत राज्य खेळ म्हणून नाव देण्यात आले. सद्या भारतात या खेळाचा झपाट्याने विस्तार होत असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या खेळासाठी व्यक्तीगत स्तरावर प्रचंड सहकार्य केले आहे. खऱ्या अर्थाने कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा पिकलबॉल या खेळाचा विस्तार झपाट्याने झाला. संपूर्ण हॉलीवूड इंडस्ट्री या खेळाची चाहती आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये हा खेळ लोकप्रिय होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झपाट्याने याचा विस्तार होईल, अशी अपेक्षा श्री. दत्त यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान या खेळाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी यावेळी सचिव व उद्योजक संतोष राणे यांनी घोषित केली. यात अध्यक्षपदी युवराज लखमराजे भोंसले यांची निवड करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, उपाध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, सचिव संतोष राणे, सहसचिव देवेन ढोलम, खजिनदार अमित वळंजू, सहखजिनदार प्रमोद भोगटे व सदस्य डॉ. श्रीकृष्ण परब अशी कार्यकारिणी असल्याचे सचिव राणे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले.