*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम लघुकथा*
*दिल्या ! घरी तू सुखी रहा*
तालुक्याच्या ठिकाणाला लागून असलेलं एक गाव!त्या गावातील दिलीप नावाचा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा.नाव जरी दिलीप होतं तरी प्रेमापोटी दिल्या दिल्या असाच नामोल्लेख व्हायचा.
गावातील प्रमुख व्यवसाय शेती. शेतीला पुरक असणारे जोडधंदे,शेतमजूर,हमाली कामे,इतर मजूरी हीच उत्पन्नाची साधणं होती.
गावात सातवीपर्यंत शाळा होती. बहुतांश मुलं सातवी पर्यंत कसतरी शिकायचे.पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागायचं,त्यामुळे मुलं शिक्षणाकडे पाठ फिरवून उद्योगधंदे करायला लागायचे.दिल्या पण सातवी पर्यंत शिकलेला व घरच्या शेतीकडे लक्ष घालून काम करायला लागलेला.आईवडिलांची इच्छा होती कि दिल्यानी खुप शिकावं पण नाईलाज झालेला.
दिल्याचा मुळ स्वभाव उनाडपणा,उचापती करणारा असाच होता.त्यामुळे सवंगडी तशाच स्वभावाचे होते.मौज,दंगामस्ती,करणे,वगैरे वगैरे. चित्रपटाचा शौक. पहिल्या दिवशी पहिला शो हे त्याच्या मित्रमंडळीच धोरण. गावात एक फिरते सिनेमागृह होते. दिल्याचा दरारा होता.त्यामुळे जेव्हा हवे तेव्हा तिकिटं मिळत असे. दिल्याचे आणखी स्वभाव वैशिष्ट्ये म्हणजे बसमध्ये ,रेल्वेगाडीत कितीही गर्दी असू दे कसही करुन जागा मिळवून देणे.
,दिल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरात लाडका होता आणि अति लाड होत असलल्यामुळे आळशी होत चाललेला होता. शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचे. मित्रमंडळींच्या सोबत राहून घराबाहेरच जादा वेळ असायचा.
एकदा दिल्या आणि मित्रमंडळींनी योजना आखलेली. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दिवस मजेत घालवायचा. सिनेमा वगैरे बघून बाहेरच जेवण करुन गावाकडे परत यायच.
त्याप्रमाणे दिल्या घरातून बाहेर पडला सकाळच्या वेळेला. तालुक्याला जातोय अस सांगून निघून गेला.
दुपारच्या जेवणाची वेळ झालेली पण दिल्या घरी आलेला नव्हता. आई सारखी वाट बघत होती.शेवटी आईवडिलांनी जेवून घेतलेलं.ऐन दुपारी दिल्या घरी आलेला होता.आईनी जेवणासाठी विचारलेलं.दिल्या म्हणाला नको मला भूक नाही.आईला काळजी वाटली.उन्हाचे दिवस होते. ऊन वगैरे लागलं असावं म्हणून आईनं लिंबाचं सरबत करुन दिलेल. दिल्यानं तालुक्याला मौज मजा केल्यामुळं त्याची काही खायची इच्छा होत नव्हती. मौजमजेखातर आलेल्या खर्चाचा भार दिल्यानं उचलेला होता. दिल्या म्हणजे अर्थमंत्री.हे सर्व बापकमाईवर चाललेलं होत. घरात आईवडिल पैसे कुठे कुठे ठेवतात हे दिल्याला पक्के ठाऊक होते.आजच्या भाषेत सांगायचं तर ते दिल्यासाठी ए.टी.एम च होतं.
दिल्याच्या आईला मात्र काळजी वाटायला लागली.दिवसेंदिवस दिल्याच्या विचित्र वागण्याचा त्रास वाटू लागला. जुगार,दारु पिणे इ.सवयी जडलेल्या होत्या. दिवसरात्र आईच्या मनात एकच विचार रुंजी घालत असायचा कि दिल्याला वाईट सवयीपासून दूर करायचं.
दिल्याच्या आईवडिलांनी एक दिवस विचारलेलं कि तूझं लग्न करुन द्यायचं.त्यासाठी तू आपल्या शेतीकडे लक्ष द्यावे. प्रपंच करण्याइतपत उत्पन्न वाढवावं.वडिल आता थकायला आलेत.तू जर लक्ष घातलं नाही तर कस होणार आपलं. दिल्या म्हणाला माझ्या लग्नाची काळजी करु नकोस,अस म्हणून आईला चुप बसवायचा.
आईला काही केल्या दिल्याच्या विचित्र स्वभावामुळे रात्र रात्र झोप येत नव्हती आणि यावर काय उपाय करावेत याचा सतत विचार करत बसायची.आईच्या लक्षात आलेलं कि दिल्या वाईट मुलांच्या सोबत राहून शेतीकडे,घराकडे दुर्लक्ष करायला लागलेला.दिल्याच्या भविष्याच्या दृष्टीनं हे घातक आहे. यावर तोडगा म्हणून मार्ग शोधायला सुरुवात केली.
शहरासारखं गावात समुपदेशन केंद्रासारख्या सोयी उपलब्ध नसतात,पण काही सामंजस्य दाखवणारे लोकं,वयस्कर लोकं उत्तम मार्गदर्शन करणारे असतात.त्यापैकीच एक शाळेचे हेडमास्तर. लगेच दिल्याची आई दिल्याला हेडमास्तरांकडे घेऊन गेली,आणि दिल्याच्या वाईट सवयी, व वागणुकीविषयी चिंता व्यक्त केली.मास्तर तुम्ही माझ्या दिल्याला समजावून सांगा.हल्ली तो चांगल्या मुलांच्या सोबत नसतो.वाईट सवयीच्या आहारी गेलेला आहे.हेडमास्तर सर्व ऐकून घेतात. दिल्यालाही काय सांगायच आहे ते ही ऐकून घेतात.मास्तर त्यावर विचार करुन एक निर्णय देतात.तो निर्णय म्हणजे दररोज दिल्याला माझेकडे संध्याकाळी एक तासभर पाठवत जावे.बघू या काही सुधारणा होती काय ते!
दिल्याच्या आईला ताण हलका झाल्यामुळे समाधान वाटलं आणि दिल्या दररोज मास्तरांकडे जायला लागला.दिल्याची मानसिकता मास्तरांनी जाणलेली होती व त्यानुसार त्याच्या कलेनं मास्तर वागवत होते. वाईट सवयी कशा कमी करत आणायच्या याच तंत्र मास्तरांना माहिती होतं,त्यानुसार मास्तर दिल्यावर तसे संस्कार करत होते.कधी कधी विनोदी संवाद करुन दिल्याला बोलतं करायचे,काही धार्मिक गोष्टीतील दाखले देऊन स्वतःमध्ये कसा चांगला बदल घडवून आणायचा याचे धडे देत असायचे. एखादेवेळी दिल्याला बोलायला लावायचे .हळूहळू दिल्यामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागला.म्हणतात ना पावसाळ्यात धरतीवर पडलेल्या पावसाच पाणि सुरुवातीला जरी गढूळ वाटत असलं तरी पाच सहा महिन्यानंतर तेच पाणि स्वच्छ दिसायला लागतं. दिल्याच्या बाबतीत असाच चांगला बदल दिसू लागलेला.
आता दिल्या शेतीकडे लक्ष देऊन शेतातील कामे करणे, आईवडिलांकडे काळजीपुर्वक लक्ष देणे , समाजामध्ये आपली पत चांगली राहील याकडे लक्ष देणे, असं व्यक्तिमत्त्व दिल्याचं अनुभवायला येऊ लागलं.
कालांतराने दिल्याचं लग्न झालं.प्रपंचाला सुरुवात झाली.दिल्याला बायको पण सुस्वभावी,तडजोड करणारी,घरातील मंडळींना सांभाळून घेणारी मिळालेली.दिल्याच्या संसारवेलीवर एक छानसं फुल उमलेलं.मुलगा झाला. सर्वत्र आनंदी आऩंद झाला.दिल्याच्या आईवडिलांना तर आकाश ठेंगणे झाल्याचे वाटले.
दिल्याच्या घरात सुखावणाऱे वारे वाहू वागलेत. सारं कसं छान सुरळीत चाललेलं होत.एकदिवस अचानक दिल्याच्या आईची तब्येत बिघडली.गंभीर आजाराने तीला ग्रासलेलं होतं.तीला कळून चुकलेलं होतं कि आयुष्याची अखेर जवळ आलेली आहे.दिल्याला जवळ बसवून आईनं स्वतःचं मन मोकळं केलय.म्हणाली भुतकाळ विसरुन जा.भविष्याची चिंता करु नकोस.वर्तमानाचं भान ठेवून जग.जे काही आपल्या पदरी पडलेलं आहे त्यात समाधानी व आनंदी रहा.
माझे जगण्याचे दिवस थोडे राहिलेत.प्रापंचिक जबाबदारी समर्थपणे सांभाळावी.उचापत्या करायची गरज नाही.तस केल्यास आहे ते ही गमावून बसशील.काही नाही केलं तरी चालेल फक्त एवढच कर,दिल्या! घरी तू सुखी रहा!
असा संदेश देऊन दिल्याच्या आईनं इहलोकाची यात्रा संपवली.
चंद्रशेखर द. धर्माधिकारी
पुणे©️