*सावंतवाडीत २२ मार्चला दमदार साहित्य संमेलन; अनेक दिग्गजांची उपस्थिती*
*कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची सावंतवाडी पत्रकार परिषद*
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या शेजारी असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून या संमेलनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकणातील साहित्यप्रेमी, वाचक, विद्यार्थी वर्ग तसेच नवोदित लेखक व साहित्य क्षेत्रातील मंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जी. ए. बुवा, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या लेखिका उषा परब, सावंतवाडी शाखाध्यक्ष संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, कुडाळ तालुका अध्यक्षा तथा कादंबरीकार वृंदा कांबळी, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, प्रा.रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, विनायक गावस आदि उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रदीप ढवळ पुढे म्हणाले, सावंतवाडी शहराला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लेखक आणि कवींची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. यंदाच्या संमेलनाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शाखेला मिळाला हे सौभाग्य आहे. येथील साहित्य क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मंडळींनाकडून योग्य ते सहकार्य मिळेल आणि संमेलन यशस्वी होईल. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर असून या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर असतील. या संमेलना दरम्यान ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, चर्चासत्र /परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत कसे बहुविध कार्यक्रम करणार असल्यामुळे हे संमेलन प्रत्येकासाठी ऐतिहासिक साहित्य मेजवानी ठरेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी शाखा अध्यक्ष संतोष सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रुपेश पाटील यांनी मानले. यावेळी सावंतवाडीसह परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.