You are currently viewing द शो मस्ट गो ऑन

द शो मस्ट गो ऑन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*द शो मस्ट गो ऑन*

पुष्प दुसरे

 

 

एक राजा जातो, दुसरा सिंहासनावर बसतो. ही जगरहाटीच आहे. प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात गेले,राजा दशरथाचे पुत्रशोकामुळे निधन झाले पण राज्यकारभार बंद पडला का? सिंहासनावर रामचंद्रांच्या पादुका ठेवून भरताने राज्यकारभार पाहिलाच ना?

*सूर्य तळपतील चंद्र झळकतील*

*तारे अपुला क्रम आचरतील*

हा निसर्गाचा नियमच आहे. कार्यालयात एक पदाधिकारी सेवानिवृत्त होतो,म्हणून ते पद रिक्त राहत नाही. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसास किंवा त्या रिक्त पदाची भूमिका पार पाडण्यास योग्य व्यक्तीस बढती मिळते आणि काम पुढे चालूच राहते नाही का? १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं.जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. आज देश स्वतंत्र होऊन ७७ वर्ष्ये पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या संविधानाचे श्री.नरेंद्र मोदी हे चौदावे पंतप्रधान आहेत. याचा अर्थ वेगळा सांगायची काय गरज आहे?कोण कोणासाठी थांबत नाही,काळ पुढे जातच असतो,*द शो मस्ट गो ऑन.*

एखादी प्रिय व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली, तर तो धक्का पचविणे नक्कीच अवघड आहे, त्या व्यक्तीच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघण्यास निश्चितच काही काळ जावा लागतो,पण काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्याही परिस्थितीशी प्रत्येकाला जुळवून घ्यावेच लागते.सकाळ संध्याकाळ पोटाला भूक लागतेच,मग दुःख गोंजारत बसून उपाशी राहणे कोणालातरी शक्य आहे का? मांडलेला संसार पुढे चालू ठेवावाच लागतो.

माझ्यापुढे तर माझ्या सख्ख्या आजीचे उदाहरण आहे.माझे वडील केवळ सहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी आजीचे वय फक्त सोळा वर्षांचे होते.काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल तिच्यावर? पण लोकमान्य टिळकांनी त्यांना जेव्हा काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली गेली, त्यावेळी म्हटले होते,

” There are higher powers who rule the men & Nation”

याच कोणत्यातरी दैवी शक्तीने माझ्या आजीला आधार दिला,बळ दिले,आत्मविश्वास दिला आणि तिने

तिच्या बाळाला अनेक कष्ट सोसून एक अत्यंत सुसंस्कृत असा देशाचा नागरिक बनविले.ती थांबली नाही की पळूनही गेली नाही.तिने मुलाचा आनंदी आणि समृद्ध असा संसार पाहिला.

मागील लेखात मी मदर टेरेसाने

जीवनाच्या ज्या विविध व्याख्या सांगितल्या आहेत त्या नमूद केल्या होत्या. त्यातील *Life is a challenge, meet it* – जीवन हे एक आव्हान आहे, ते आनंदाने स्वीकारा या व्याख्येनुसार माझ्या आजीने तिला मिळालेले आव्हान स्वीकारले आणि नशिबाला दोष देत न बसता तिच्या मुलाचे जीवन समृद्ध केले.

अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. सिंधुताई सपकाळ! जिचे उभे तारुण्य नवऱ्याचा छळ सोसण्यात गेला,तिने गर्भार अवस्थेत घर सोडले आणि वेळेला स्मशानातील जळत्या चितेवर भाकरी भाजून तिचे व मुलीचे पोट भरले,पण जगणे सोडले नाही. मिळालेल्या कठीण आव्हानांना स्वीकारून पुढे हीच सिंधुताई अनाथांची माय झाली.

वृक्षाची पाने आज गळून पडली तरी उद्या नवी पालवी फुटतेच आणि पुन्हा सर्वत्र हिरवळ दाटतेच. निसर्गातील सकारात्मकता जाणून घेऊन माणसानेही या सुंदर जीवनाचा आनंद घ्यावा आणि सतत पुढे जात रहावे…..

( क्रमशः)

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन.

प्रतिक्रिया व्यक्त करा