You are currently viewing युवराजांच्या उपस्थितीत मळेवाड पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ

युवराजांच्या उपस्थितीत मळेवाड पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ

मळेवाड –

मळेवाड येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चा युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावाच्या विकासासाठी आपले योगदान असेल असे आश्वासन भोसले यांनी दिले.

मुळवार जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर 1 च्या पटांगणावर ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम राजे भोसले यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढून करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना युवराज लखम राजे भोसले यांनी मळेवाड गावाचे सावंतवाडी संस्थानशी पहिल्यापासून अतिशय चांगले संबंध असून हे गाव हे आपलेच गाव असल्याचं नेहमी आम्हाला जाणवते. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी जे काही सहकार्य राज घराण्याकडून करण्यात येईल तेवढे सहकार्य आपण नक्की करू असे आश्वासन भोसले यांनी दिले. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करत आपण असेच कार्य करून गाव आणखीन विकासाच्या पुढच्या शिखरावर नेऊन ठेवा असे आवाहनही भोसले यांनी केले.

यावेळी निवृत्त शिक्षक वसंत राणे यांच्या हस्ते युवराज लखम राजे भोसले यांचा ग्रामपंचायत व युवा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा मांजरेकर या सेवानिवृत्त होत असल्याने ग्रामपंचायतीच्या व मंडळाच्या वतीने त्यांचाही युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सरपंच मिलन पार्सेकर, केंद्रप्रमुख म ल देसाई, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,स्नेहल मुळीक, मधुकर जाधव, अर्जुन मुळीक, कविता शेगडे, सानिका शेवडे, प्रकाश राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, गायक युसुफ आवटी, गायिका कु.गोडकर, निवेदक शुभम धुरी, ठेकेदार शुभम वैद्य, काका मांजरेकर, गजानन शिरसाट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले. या शुभारंभ नंतर मळेवाड कोंडुरे गावातील मुलांनी एकापेक्षा एक वेशभूषा सांस्कृतिक कार्यक्रम करून रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी आपली अदाकारी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन निवेदक शुभम धुरी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा