You are currently viewing “कामगारशक्ती एकात्मतेचे प्रतीक!” – प्रदीप गांधलीकर

“कामगारशक्ती एकात्मतेचे प्रतीक!” – प्रदीप गांधलीकर

*”कामगारशक्ती एकात्मतेचे प्रतीक!” – प्रदीप गांधलीकर*

पिंपरी

“पिंपरी – चिंचवड या औद्योगिक परिसरातील कामगारशक्ती हे एकात्मतेचे प्रतीक आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन – कामगार विभाग संचलित महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (पुणे गट – पुणे विभाग) आयोजित कौमी एकता सप्ताह २०२४ – २५ उपक्रमांतर्गत आयोजित कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रदीप गांधलीकर बोलत होते. ज्येष्ठ कवी आय. के. शेख, उद्यमनगर कामगार कल्याण केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कविसंमेलनात राष्ट्रीय एकतेवर प्रबोधनपर कविता सादर करण्यात आल्या.
सुरेश कंक यांच्या “काया झिजवू देशासाठी शपथ घेऊ या तिरंग्याची.. वंदे मातरम्” या देशभक्तिपर गीताने कविसंमेलनाची सुरुवात झाली. तानाजी एकोंडे यांनी स्री सशक्त आणि निर्भय झाली पाहिजे यावर भाष्य करणारी “द्रौपदी सीतेप्रमाणे तूही आता सज्ज हो सर्व अस्त्र घेऊन… ” ही कविता सादर केली. शोभा जोशी यांनी, “अंगणात भुंगा करतोय दंगा गुमगुम म्हणतो गाणी…” ही रूपकात्मक कविता सादर केली. सुहास घुमरे यांनी, “आजच्या भाकरीसाठी उद्याच्या चंद्रकोरीसाठी झपाझप पावले पडत होती कारखान्याच्या दिशेने…” ही ज्वलंत कामगार व्यथा मांडली. शामराव सरकाळे यांनी, “एकमेका साह्य करू मानवतेची गुढी उभारू…” हा आशावाद व्यक्त केला. मुरलीधर दळवी यांनी, “माझ्या भारत देशा…” ही कविता सादर केली. रेवती साळुंखे यांनी स्त्रियांची व्यथा मांडली. त्या आपल्या कवितेतून सांगतात, “स्वातंत्र्य द्या हो तिला ती अजूनही आहे बंदिस्त…”
फुलवती जगताप, हेमंत जोशी यांनी सामाजिक बांधिलकी, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द या विषयावरील वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.

प्रदीप गांधलीकर पुढे म्हणाले की, “देशातील विविध भागातून तसेच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या जात, धर्म, पंथाचे कामगार चरितार्थासाठी पिंपरी – चिंचवड या उद्योगनगरीत स्थायिक झाले. आपल्या श्रमातून अन् घामातून त्यांनी या परिसराला आणि पर्यायाने महाराष्ट्राला देशात अग्रेसर बनविले. अर्थातच त्यामुळे येथील समृद्धीत कामगारशक्तीचे मोठे योगदान आहे!” आय. के. शेख यांनी काव्यात्मक मनोगत व्यक्त केले. प्रदीप बोरसे यांनी प्रास्ताविकातून कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी दहिभाते यांनी आभार मानले.

वृत्तांकन –
*सुरेश कंक*
७५२२९०२७२७

प्रतिक्रिया व्यक्त करा