You are currently viewing कबुलायतदार गावकर व्यवस्था – गावकी जपणारे चौकुळ गाव

कबुलायतदार गावकर व्यवस्था – गावकी जपणारे चौकुळ गाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावगाड्याचा आणि माणूसकेंद्रित दरडोई सुबत्तेचा निखळ निर्झर झरा. प्रत्येक कुटुंबातील एक-दोघांची पावले दर मंगळवारी दुपारी गावातील सातेरी मंदिराकडे आपोआप वळतात, त्यात महिलांचाही समावेश असतो. तेथे गावकी भरून गावाच्या समृद्ध विकासाचे तरंग उमटतात. त्यातील न्यायाचे झंकार आणि भविष्याच्या विकासाचा नाद व गुंजन शेकडो वर्षे नुसता सुरु नसून तो समृद्धही होत आहे.

राजेशाही गेली, संस्थानिक गेले, आता सरकार आले; पण सिंधुदुर्गातील चौकुळ गावचा गावगाडा तिथले लोकच चालवतात. पिढ्यानपिढ्या जपलेल्या त्यांच्या स्वतःच्या या व्यवस्थेवर आजही गावकऱ्यांची तेवढीच गाढ श्रद्धा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चौकुळ गावाने जपलेली ही ‘कबुलायतदार गावकर व्यवस्था’ आजही या गावाला एकतेच्या घट्ट बंधनात गुंफून आहे.

सह्याद्रीच्या रांगेत, आंबोलीच्या शेजारी असलेले चौकुळ हे देखणे गाव. या गावाला ‘सैनिकांचे गाव’ अशी ओळखही आहे. पण त्याहीपलीकडे शेकडो वर्षापासून या गावाने स्वतःची ही व्यवस्था योजली आहे. येथील प्रत्येक निर्णय हा गावकरी एकत्र येऊन घेतात. त्यासाठी दर आठवड्याला गाव बैठक होते. या बैठकीत औताचे दर, चराई शेत्र, शेतीचे क्षेत्रविकास कामाचे निर्णय, तंटे सोडविण्याबरोबरच शेतमजुरीचे दर, इतकच काय तर कोणी कुठे घर बांधायचे याचे निर्णयही सर्वसंमत्तीपूर्वक घेतले जातात. ‘गावकी’ या नावाने ओळखली जाणारी ही सभा दर मंगळवारी भरते. त्यामुळे या सर्व व्यवस्थेला कबुलायतदार गावकर म्हणून ओळखले जाते.

गावडे घराण्यातील तिघे भाऊ मूळचे गाव भिरवंडे (ता. कणकवली) येथून चौकुळ येथे स्थायिक झाले. त्यांनी गाव वसविले आणि शेतसारा जमा करण्यासाठी येथे खोती पद्धत रूढ केली. त्यांना शेतसारा जमा करण्याची कबुली इतरांनी दिली म्हणून ते कबुलायतदार गावकर झाले. यातूनच पुढे गाव चालवण्याची व्यवस्था ठरवली गेली.

दरवर्षी आळीपाळीने ही गाव चालवण्याची पद्धत तिघांकडे सोपवली आहे. हे तिघे गावडे घराण्याच्या मूळ तीन कुटुंबातील वंशज असतात. दरवर्षी प्रमुख बदलत असल्याने एकाधिकारशाही राहत नाही. दर मंगळवारी भरणारी गावसभा अर्थात गावकी हा या व्यवस्थेचा आत्मा आहे. मंगळवार ही साप्ताहिक सुट्टी असून या दिवशी गावच्या सातेरी मंदिरात गावकी भरते. इथला जमाव कायम भरपूर असतो. एक गावठाण आणि बारा वाड्या मिळून वसलेल्या दहा किलोमीटर विस्ताराच्या या गावविषयाचा प्रत्येक निर्णय येथे होतो.

ही गाव सभा केवळ न्यायसभा नसून येथे गावाच्या प्रगतीविषयक धोरणे, कामाविषयीची मांडणी ठरवली जाते. कबुलायतदार गावकर प्रमुख असले तरी निर्णय गावातील प्रमुख ग्रामस्थ व ज्येष्ठ यांच्या एकमताने घेतात. एखादा तंटा उद्भवला तर तो सोडविला जातो. या करिता दोन्ही पक्षांना त्यांचे म्हणणे मांडण्याची समान संधी दिली जाते.

इतक्यावरच न थांबता लग्नासाठीचे विविध कामांचे दर, शेतमजुरीचे दर, शेती कोणी कुठे करायची, तसेच घरबांधणी किंवा एखादे विकासकार्य कसे करायचे, असे गावासंबंधितअसलेले सर्व निर्णय येथे घेण्यात येतात. विशेष म्हणजे यात प्रत्येकाच्या मतमांडणीचा आदरपूर्वक विचार केला जातो.

‘चराईबंदी क्षेत्र’ अनेक वर्ष येथे राखले जाते. चारा यायला लागला की, कबुलायतदार गावकर चराईबंदीचा क्षेत्र निश्चित करतात, त्याला आराखडा म्हणतात. येथील चराईबंदी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत उठवली जाते. अनेक पिढ्यांपासून येथे कुऱ्हाडबंदी ही आहे. त्याचे क्षेत्र निश्चित केले जाते. दरवर्षी ‘नाचणी शेतीचे’ ठिकाण ठरवून तेथे कुऱ्हाड बंदी उठवली जाते. याबाबतचे निर्णयही गावकी घेते. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या या व्यवस्थेमुळे गावाची रचना शिस्तबद्ध आहे. इतर गावांच्या तुलनेत या गावात कित्येक पटीने एकजूट आहे. या घट्ट एकीमुळेच हे चौकुळ गाव आता ग्राम पर्यटनात वेगाने आपली प्रगती करीत आहे.

या गावचे माजी सरपंच गुलाबराव गावडे यांचे म्हणणे आहे की, ‘अनेक वर्षापासून चौकुळ गावाने आपली शिस्त व ऐक्य जोपासले आहे. नवी पिढीने ही या कबुलायतदार गावकर व्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. याचे एकमेव कारण हेच आहे की, येथे सर्वांना विचारात घेऊन सर्वसमावेशक धोरणे ठरवली जातात व गाव विकासाच्या अंदाज पत्रकाचाही समावेश केला जातो. या सर्व बाबींचा आम्हाला अभिमान आहे, असे ही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − four =