सावंतवाडी :
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर- गोडकर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळ (रत्नागिरी) कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्यावर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. तर अलिकडेच महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या शिक्षक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सौ.मांजरेकर गेली दोन वर्ष राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीवर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार शिक्षण मंडळाने ही नियुक्ती मंगळवारी केली आहे. महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी मृणाली काटेगे यांनी १५ ऑक्टोबर रोजी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली २२ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. तसेच एम. एड व शालेय व्यवस्थापन पदवी अशा सात पदव्या संपादन केल्या आहेत.कोकण बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, कोकण बोर्ड मॉडरेटर, नवीन शिक्षण धोरण तज्ञ शिक्षक म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना, मराठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांकडून वापरण्यात येणाऱ्या अध्यापन कार्य नितींचा अभ्यास या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. या पूर्वी लेखक आपल्या दारी हा उपक्रमही त्यांनी राबविला आहे.कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यापनाचे व्हिडिओही यू – ट्यूबवर आहेत. कोरोना महामारी काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची १०, १२ वी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम त्यांनी केले आहे. सावंतवाडीत झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सांस्कृतिक समितीवर त्यांनी काम केले आहे. या निवडीबद्दल सौ मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर,शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षण अधिकारी रामचन्द्र आंगणे , गटशिक्षाधिकारी कल्पना बोडके, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, सचिव शांताराम गावडे, सहसचिव सिध्देश नाईक, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत , सर्व पदाधिकारी, संचालक , मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ,आजी.. माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.