You are currently viewing नवरात्र पाचवी माळ…

नवरात्र पाचवी माळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र पाचवी माळ….*

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

*आजची पाचवी माळ/ पाचवे पुष्प…*

पतिव्रता उर्मिलेला समर्पित.

 

“या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

उर्मिला

 

रामायण मध्ये आपण श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान,रावण… या सर्वांना ओळखतो. जाणून घेतो..परंतु रामायण मध्ये सर्वात उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेली स्त्री म्हणजे लक्ष्मणाची पत्नी उर्मिला होय.

 

उर्मिला म्हणजे सीतेची धाकटी बहीण. मिथिला नरेश जनक राजाची कन्या. ज्यावेळी सीता स्वयंवर झाले त्यावेळी सीते बरोबरच तिच्या बहिणींचे ही रामाच्या भावांशी विवाह झाला होता. त्यातील ही उर्मिला दोन नंबरची बहीण. उर्मिला हीचा विवाह लक्ष्मणशी झाला होता.

 

उर्मिला ही खूप देखणी व सालस कन्या होती. ती पतिव्रता स्त्री म्हणून नावाजली जाते.

 

जसे लक्ष्मण याचे रामावर प्रेम होते, तसेच हिचे सीतेवर प्रेम होते. हिंदू धर्मात पतिव्रता मध्ये हिचे नाव अग्रस्थानी आहे . महान स्त्रियांमध्ये हीची गणना होते हे आपल्याला माहीत आहे .असे का?…याचे उत्तर शोधताना मला असे आढळले, की ज्यावेळी लक्ष्मण राम आणि सीतेसह वनवासाला निघाले, तेव्हा उर्मिला त्याच्याबरोबर येण्यास तयार होती. परंतु त्याने संकोच केला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तिला अयोध्येत थांबायला सांगितले. असे म्हणतात की मग जेंव्हा लक्ष्मण वनवासात जाताना तिचा निरोप घ्यायला आले, तेंव्हा ती राणी वेशात नटून थटून सामोरी आली.तेंव्हा लक्ष्मण प्रचंड संतापला व तिला कैकयीची उपमा देऊन अपमानित केले. पण उर्मिलेला तेच हवे होते, कारण आपला तिरस्कार केला, आपल्या पासून लक्ष विचलित झाले, तरच आपल्या भावाची आणि वहिनीची उत्तम काळजी हे घेऊ शकतील.

वनवासाला जाण्यापूर्वी लक्ष्मणाने आपली पत्नी उर्मिलाला आपल्या मातांची आणि राज्याची काळजी घेण्यासाठी अयोध्येस थांबण्यास सांगितले. वास्तविक नवीन लग्न झालेल्या मुलींना हे किती अवघड असेल याची कल्पना येते. परंतु या पतिव्रतेने नवऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानून 14 वर्षात दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचे विचार मनात न येऊ देता, आपल्याला दिलेले कार्य तिने व्यवस्थित पार पाडलेले दिसते. या काळात जनक राजाने अनेकवेळा तिला माहेरी बोलावले होते. जेणेकरून ती हे दुःख विसरेल. परंतु सासरचा धर्म आणि पतीने दिलेली आज्ञा पाळण्यासाठी ती 14 वर्षात कधीही माहेरी गेली नाही. केवढा हा त्याग.

 

उर्मिले ने अखंड पतिव्रता धर्माचे पालन केले. परंतु रामायण मध्ये उर्मिला अवर्णीय, अचर्चित, अघोषित आणि दुर्लक्षित राहिली. रामायण मध्ये उर्मिलेचे हे महान चरित्र अखंड पतिव्रता धर्म, स्नेह आणि त्याग याची चर्चा झालीच नाही.

 

 

ज्यावेळी वनवासात राम सीता आणि लक्ष्मण शिक्षा भोगत होते…त्या १४ वर्षाच्या काळात लक्ष्मण एक रात्र ही न झोपता भावाचे व वहिनीचे रक्षण करत होता. निद्रादेवी त्यावर प्रसन्न झाली होती . निद्रादेवीच्या वरा मुळे हे शक्य झाले होते ..पण ही झोप कुणाला तरी देणे क्रमप्राप्त होते म्हणून ती जबाबदारी उर्मिलेने स्वीकारली होती…म्हणून उर्मिला रात्री स्वतः ची झोप घ्यायची आणि दिवसभर लक्ष्मण याची रात्रीची झोप पूर्ण करायची .म्हणून उर्मिला या अतुलनीय बलिदानासाठी उल्लेखनीय आहे, ज्याला ‘उर्मिला निद्रा’ म्हणतात.किती तो त्याग…आणि नवरा असून नसल्यासारखे हे १४ वर्षाचे जगणे. माझ्यासाठी ती एक आदर्श पतिव्रता आहे.

 

उर्मिलाच्या बाबतीत अजून एक गोष्ट वाचनात आली, ती म्हणजे तिला कितीही संकट काळात डोळ्यातून अश्रू काढायचे नाही, असे वचन पती लक्ष्मणाने दिले होते. त्यामुळे कितीही संकट प्रसंगी तिने डोळ्यातून अश्रू काढले नाहीत. अगदी राजा दशरथाचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा तिने वचनाला जागून डोळ्यातून अश्रूचा थेंबही काढला नाही.

 

 

असे म्हणतात, की लक्ष्मणाने प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा बघितला नाही.याला कारण ही तसेच होते.खरतर निद्रादेवी ज्यावेळी लक्ष्मणाला प्रसन्न झाली होती ,त्यावेळी ती म्हणाली होती , की चौदा वर्ष मी तुला अजिबात त्रास देणार नाही.आणि उर्मिला त्याच्या ऐवजी झोपेल.आणि निद्रा देवीने एक अट पण घातली होती.ज्यावेळी तुम्ही आयोद्धेला परत याल, त्यावेळी उर्मिलेची झोप नष्ट होईल.आणि तुला झोपावे लागेल. म्हणजे माझे वरदान तुला फक्त वनवासात असतानाच मिळणार.ज्यावेळी हे सर्व जण १४ वर्षांचा वनवास भोगून आयोध्येला परत आले, त्यावेळी राज्याभिषेक सोहळा पार पडला…पण लक्ष्मणाला तो पहाता न आल्याने तो कारण समजून मनात हसल्याचे वाचायला मिळाले.त्याच्या ऐवजी उर्मिलेने हा सोहळा बघितला.

लक्ष्मणच्या विजयाचे कारणच सर्वस्वी ही पतिव्रता स्त्री उर्मिला होती असे म्हणले तर वावगे होणार नाही. त्यासाठी हे उदाहरण दिले जाते…….ज्यावेळी मेघनादचा लक्ष्मणाने वध केला, त्यावेळी त्याचे शव झोपडीत सन्मानाने आणले गेले..तेंव्हा त्याची पत्नी सुलोचना ते नेण्यासाठी आली होती. पति चे छिन्न भिन्न झालेले शरीर बघून ती रडत रडत लक्ष्मणाला बोलली,

” हे सुमित्रानंदन, तू चुकून सुद्धा या भ्रमात राहू नकोस की तू हा वध केला आहेस… अजिबात गर्व ही करू नकोस..मेघनादला मारण्याची शक्ती विश्वात कुणापाशी ही नव्हती.हे फक्त त्या पतिव्रता उर्मिला मुळेच शक्य झाले आहे.”

 

उर्मिलास सतत झोपून रहावे लागत होते, तर घरच्यांची म्हणजे सासू सासर्यांची सेवा ती कशी करत असेल? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो..कारण लक्ष्मणाने जाताना बजावले होते….म्हणजे लक्ष्मणाला दिलेल्या वचनाचे काय…ते कसे पूर्ण होणार..

पण माता सीता ने वनवासात जाताना उर्मिलेला एक वरदान दिलेले असते, ते म्हणजे ती (उर्मिला) एकाच वेळी तीन तीन कामे सहज करू शकेल…यामुळेच हे शक्य झाले.

 

आज समाजात आपण अशा अनेक स्त्रिया बघतो, ज्यांचे पती देशसेवेसाठी सीमेवर लढत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, कारण भविष्य माहित असताना सुद्धा या स्त्रिया त्यांना आपले पती म्हणून स्विकारतात… एवढेच नव्हे तर आपली मुले सुध्दा त्या देशसेवेसाठी तयार करतात. या सुद्धा उर्मिले पेक्षा कमी नाहीत. सलाम अशा स्त्रियांना.मला अशा स्त्रियांना सुध्दा सलाम करायचा आहे या निमित्ताने, की ज्यांचे पती संसार अर्ध्यावर सोडून कायमचे निघून गेलेत . काही वर गेले , तर काही घटस्फोट देऊन गेले…..पण या स्त्रिया न हारता परत समाजात ताठ मानेने उभ्या राहतात. आपल्या पायावर उभ्या राहतात. मुलांना चांगले संस्कार देत कुटुंबाला सावरतात… काही एकट्या राहतात आणि स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करतात….आज या समाजात स्वबळावर ठाम पणे सन्मानाने समाजात उभ्या आहेत.कष्ट करत आहेत.

त्यांच्या प्रती मला प्रचंड आदर आहे. सलाम या आधुनिक सर्व उर्मिलांना.

 

 

तर आज या पतिव्रता उर्मिलाने न कळत रामायणात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे..तिच्यामुळे लक्ष्मणाला वनवासात श्री राम व माता सीता ह्यांचे रक्षण करता आले.अशा या उर्मिलेचे आपल्याला माहीत नसलेले रुप आज या निमित्ताने आपल्यासमोर मांडले आहे.

अशा पतिव्रता उर्मिलाला माझा मानाचा मुजरा…🙏

 

………………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

7/10/2024

प्रतिक्रिया व्यक्त करा