10 हजार 531 नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सायबर सेल ला यश..

10 हजार 531 नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सायबर सेल ला यश..

एकशे पंचवीस बनावट वेबसाईट तयार करून पेट्रोल पंप डिलरशिप, बजाज फायनान्स लोन, रिलायन्स टॉवर, अशा जाहिराती करून देशभरात 10 हजार 531 नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यास मुंबई सायबर सेलला यश आले. या टोळीने सुमारे 10 कोटी 13 लाखाची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. यातील तीन संशयीत जयगड (ता. रत्नागिरी) परिसरात लपून बसले होते. त्यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई सायबर सेलच्या टीमने काल अटक केली. त्यामुळे या ऑनलाईन फसवणुकीचे रत्नागिरी कनेक्शन पुढे येत आहे.

विवेक अजयप्रसाद कुमार (वय 34), दीपक मधुसुदन प्रसाद सिंग (वय 45), सविता दीपक सिंग (वय 38 सर्व रा.वाटद-खंडाळा पूर्ण पत्ता माहित नाही) अशी जयगड येथे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.

देशभरातील 10 हजार नागरिकांना या टोळीने लुबाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयितांनी वेगवेगळ्या 125 वेबसाईटवरुन देश आणि वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. बिहार, पश्‍चिम बंगाल राज्यातून हे रॅकेट चालविण्यात येत होते. याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला मिळाली. मुंबई पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. पोलिसांना संशयितांची छायाचित्र हाती लागली. त्यानंतर पोलिसांची पथके त्या-त्या भागात पाठविण्यात आली. त्यानुसार जयगड येथे तीन संशयित आढळून आले. जयगड पोलिसांच्या मदतीने मुंबई सायबर सेलच्या पथकाने काल तिघांना जयगडमध्ये अटक केली. येथे मुंबई पोलिसांनी 2 तरूणांना दुर्गापूर (पश्‍चिम बंगाल ) येथून अटक केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा