टीआरपी घोटाळा प्रकरणात अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे

टीआरपी घोटाळा प्रकरणात अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे

टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक व पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत, असा दावा मुंबई पोलिसांनी आज उच्च न्यायालयात केला आहे. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे विशेष संरक्षण देण्यात येवू नये, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे. परंतु, उच्च न्यायालयाने दिवसभर कोणताही युक्तिवाद न ऐकता हे प्रकरण तहकूब करत याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारी निश्­चित केली. तसेच कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले.टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी यांचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे.

या घोटाळ्यात अर्णब यांचा समावेश असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच अर्णब यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली असून, तसे स्पष्ट संकेतच पोलिसांकडून कोर्टात देण्यात आले आहेत. आज याप्रकरणी सुनावणी झाली असता, अर्णब यांच्यावरील कठोर कारवाई फार काळ थांबवता येणार नाही, असेच सांगण्याचा प्रयत्न पोलिसांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. मात्र, या म्हणण्यावर आज कोर्टात कोणताही युक्तिवाद होऊ शकला नाही.

अर्णब गोस्वामी यांच्यातर्फे कोर्टात बाजू मांडणार असणारे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी काही अपरिहार्य कौटुंबिक कारणामुळे आज युक्तिवाद करण्यास उपलब्ध नव्हते. ती बाब कोर्टापुढे ठेवत पुढची तारीख द्यावी आणि तोपर्यंत अर्णब यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती अर्णबच्या वकिलाने केली आहे़

प्रतिक्रिया व्यक्त करा