You are currently viewing चिवला बीचवरील अजैविक कचरा हटविण्यासाठी तरुणांकडून स्वच्छता मोहीम

चिवला बीचवरील अजैविक कचरा हटविण्यासाठी तरुणांकडून स्वच्छता मोहीम

मालवण

गेल्या काही वर्षात मालवण समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे. यात मोठ्या प्रमाणावर तुटलेले जाळी, प्लॅस्टिक बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या यांचा समावेश आहे. हा कचरा समुद्री जिवांसाठी मृत्यूचा घातक असून बोटींच्या फॅनमध्ये हा कचरा अडकून अपघाताचे धोकेही वाढले आहेत. मालवण चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील हा कचरा सातत्याने किनाऱ्यावर वाहून येत होता. या पार्श्वभूमीवर चिवला बीच येथील तरुणांनी पुढाकार घेत समुद्रात स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणण्यात आला आहे. या मोहिमेत स्वीटन रोज, जॉन्सन रोड्रिक्स, शुभम मुळेकर, राकेश वेंगुर्लेकर, पार्थ परब, गणपत मयेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, जॉन्सन फर्नाडिस, मनोज मेतर व अन्य पर्यटन व्यवसाईक सहभागी झाले होते. मालवण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित बीच म्हणून चिवला बीच ओळखला जातो. याठिकाणी चालणाऱ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होतात. बोटिंग, पॅरासेलिंग दरम्यान बोटींच्या फॅनमध्ये जाळी अडकण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून समुद्री स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवणच्या येणारे पर्यटक पाणी व खाद्यपदार्थ खाऊन रिकाम्या बॉटल, प्लॅस्टिक कव्हर किनाऱ्यावर तसेच समुद्राच्या पाण्यात टाकतात. तर समुद्रात तुटलेल्या मासेमारी जाळीचे प्रमाणही वाढत आहे. सातत्याने येणाऱ्या या कचऱ्यातून समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटनशील नसलेल्या कचऱ्याचे साम्राज्य तयार होते. तरी समुद्रात व किनाऱ्यावर आपल्याकडून कचरा होणार नाही. याची काळजी पर्यटकांनी घ्यावी. असे आवाहन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा