दोडामार्ग तालुक्याला महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसून द्या – अर्चना घारे
जयंत पाटील यांची भेट घेत केली मागणी..
सावंतवाडी
महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी केली.
याबाबत श्री पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती केली.
दोडामार्ग शहर आणि तालुका परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने तालुक्यातील नागरीक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कोनाळकट्टा येथे महालक्ष्मी विद्युत प्रा.लि.ही खाजगी कंपनी व राज्य शासनाचे महावितरण विभाग यांच्यात जो करार झाला होता तो संपुष्ठात आल्याने त्याचा विपरीत परिणाम वीज वितरणावर होत आहे. सासोली व कोनाळकट्टा या दोन्ही उपकेंद्राचे अंतर 55 ते 60 कि.मी. असल्याने विद्युत पुरवठा कमी दाबाचा होत आहे. तसेच बरीचशी विद्युत लाईन ही जंगल भागातून येत असल्याने अनेकदा काही कारणाने बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करता येत नाही. वाढती लोकसंख्या व मागणी लक्षात घेऊन महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला दिल्यास ग्रामस्थांना सोयीचे होणार आहेत तसेच सर्व अडचणीही मार्गी लागणार आहेत.
याबाबत सौ घारें यांनी माजी मंत्री आमदार पाटील यांचे लक्ष वेधले होते. यानंतर सौ. घारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपले स्तरावरुन संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ केली आहे. तसेच निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कोकण विभाग अधीक्षक अभियंता यांनाही आमदार जयंत पाटील यांनी दिले आहे.