You are currently viewing आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे – मा. कविराज विजय सातपुते

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे – मा. कविराज विजय सातपुते

*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला*

 

*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे-:मा. कविराज विजय सातपुते*

 

माझे बँकेचे तरूण डी जीएम साहेब श्री. वेंकटेश जे पूर्वी माझे सिनियर मॅनेजर होते त्यांना मी विनंती केली होती की, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला पुणे मिळावे. ते प्रमोशन वर पुण्यात आले. त्यांच्यामुळेच मला बँकेचे पुणे मंडल कार्यालय मिळाले. मी मुंबईहून पुण्यात बदलून आल्यावर बँकेच्या सदाशिव पेठेतील शाखेच्या वरच्या मजल्यावर माझे कार्यालय होते.

शनिवारी, रविवारी त्यामुळे साहित्यिक कार्यक्रम मी अटेंड करू शकलो. अनेक नवीन ओळखी झाल्या.

सन १९९२ मध्ये राज्य स्तरावरील काव्य स्पर्धेत ‘मोरपीस ‘या त्यांच्या कवितेला प्रथम पारितोषिक व कै. वसंत बापट यांच्या हस्ते ‘”कविराज'” ही पदवी बहाल करण्यात आली. तेव्हापासून ते कविराज म्हणून महाराष्ट्रातील साहित्यिक विश्वात ओळखले जातात.

माझे मेव्हणे श्री दीपक देगावकर हे सदाशिव पेठ मध्ये रहात होते. कवी स्व. दीपक करंदीकर आणि विजय सातपुते हे जुने मित्र होते. त्यामुळे आपोआप जवळीक घडत गेली. या दिग्गजांपुढे मी बच्चा होतो. दोघांविषयी मला अतीव आदर होता. कुठे ना कुठे भेट होत राही.

भिलार या पुस्तकांच्या गावात अनपेक्षितपणे आमची भेट झाली. म सा प च्या कार्यक्रमात ते आले होते. आम्ही पिंपरी चिंचवड कर निघालो होतो. थांबून त्यांनी विचारपूस केली.

सर्व साहित्याचा त्यांचा अभ्यास सखोल आहे. काव्यात त्यांना विशेष रूची आहे. एक चालता बोलता संदर्भ ग्रंथ म्हणता येईल. नव्या काव्य प्रकारांविषयी देखील त्यांना आस्था आहे. नवे असेल त्याचे ते स्वागत करतात. सामाजिक माध्यमांवर त्यांचे बारीक लक्ष असते.

माझे सन्मित्र कविराज विजय यशवंत सातपुते म्हणून ते आजतागायत साहित्यिक जगतात विख्यात आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. ते व्यवसायाने अकौंट लेखन करतात. डिफेन्स अकौं. को ऑप. कन्झ्युमर सोसा. लि. टिळक रोड,पुणे येथे १९९३ ते २००९ पर्यंत ते कार्यरत होते.सध्या अकौंट रायटिंग फक्त करतात. वाचन,लेखन,निवेदन,सूत्रसंचालन,कथा,कविता, साहित्य लेखन, मानपत्र,वृत्तपत्र स्तंभलेखन, प्रवास, फोटोग्राफी, साहित्यिक,सामाजिक,सांस्कृतिक स्पर्धा ,उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग आणि संयोजन कार्यात तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यरत रहाणे हे त्यांचे छंद ते जोपासत असतात.

१९८८ पासून अनेक दिवाळी अंक, नियतकालिके, दैनिक वृत्तपत्रांतून कथा,कविता, स्तंभलेखन, ललित साहित्य सातत्याने विविध विषयांवर प्रकाशित होत आहेत.

महाराष्ट्रातील साहित्यिक, सांस्कृतिक,सामाजिक व्यासपीठांवर प्रत्यक्ष सहभाग,कथा,काव्य सादरीकरण आणि काव्य परीक्षण अशा विविध भूमिकांमधून असतो. तसेच, कवितेविषयक, साहित्यविषयक, तालुका, जिल्हा, राज्य,देश पातळीवरील अनेकविध उपक्रमात ते कायम

सहभागी असतात.

आजवर सुमारे २३० कथा संग्रह, कादंबरी, चारोळी संग्रह, कविता संग्रहांसाठी त्यांनी प्रस्तावना लेखन केले आहे .अनेक साहित्यिक त्यांचे ऋणी आहेत.

अनेक राज्यस्तरीय स्पर्धा , उपक्रमांचे यशस्वी आयोजन, नियोजन,सूत्रसंचालन केले आहे.

कवी, लेखक, निवेदक, संपादक, वृत्तपत्र स्तंभलेखक, प्रवासी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकाभिमुख साहित्यिक म्हणून कार्यरत,

अक्षरलेणीकार, प्रस्तावनाकार, सूत्रसंवादक, सन्मानपत्र लेखक म्हणून त्यांची विशेष प्रसिद्धी आहे.

लोकाभिमुख साहित्यिक आणि उत्कृष्ठ सूत्रसंवादक

म्हणून विशेष नावलौकिक प्राप्त आहे. एक बहुगुणी, बहु आयामी कंगोरे असलेले हे विनम्र व्यक्तीमत्व कोणालाही आपलेसे एका भेटीत करते.

नवोदित साहित्यिक जर काही शंका, समस्या, अडचणी विचारायला गेले तर ते त्यांना नक्की मार्गदर्शन करतात.सविस्तर समजावून सांगतात. ते सहसा चिडत नाहीत त्यांचा संयम, सबूरी स्वभाव भावतो .

पुण्यातील प्रसिद्ध काव्य शिल्प संस्थेचे ते माजी सचिव २०१२ व माजी अध्यक्ष २०१४ मध्ये होते.

सुखकर्ता प्रतिष्ठान,नक्षत्रांचे देणे,ग्रामीण साहित्य कलाप्रेमी संस्था,संवेदना कला मंच,स्नेह दीप कला मंच,साहित्य संस्कृती कला मंच,अखिल भारतीय मराठी‌ साहित्य महामंडळ, पर्वती नागरिक कृती समिती,साहित्य संघ पुणे,दक्षिण,समरसता साहित्य परीषद पुणे महानगर, महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारीणी, साहित्य सम्राट,साहित्य प्रकाश, आदि संस्थांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष,सचिव,आजिव सभासद,कार्याध्यक्ष,सक्रिय कार्यकारी सभासद म्हणून कार्यरत आहेत

पुणे आकाशवाणी वरून त्यांचे कथाकथनाचे अनेक कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत.

समरसता साहित्य परिषद पुणे महानगर. २०१३ ते२०२० विविध उपक्रमांचे संयोजन आयोजन दरमहा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन,दरवर्षी‌ स्मरणिका प्रकाशन, विविध साहित्यिक सांस्कृतिक स्पर्धांचे गटनिहाय आयोजन आणि साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत.

पुण्याच्या वैभवात भर घालणारी व्यक्ती, व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती म्हणून महापौर पुणे यांच्या हस्ते 2014, 2015, 2016, सलग तीन वर्षे सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आहे. ही पुणे नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या अभिमानाची गोष्ट आहे.

अनेक राज्यस्तरीय कविता स्पर्धांचे, कविसंमेलनाचे, आयोजन, नियोजन, परिक्षण त्यांनी केले आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर वैयक्तिक व सामुहिक कवितांचे सादरीकरण, लेखन आणि परीक्षण या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत.

त्यांना इतके विविध सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत की त्यांची जंत्री वाचूनच आपली छाती दडपते.

दैनिक म. टा. ,लोकमत, सकाळ, प्रभात कडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत

अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

अनेक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन सातत्याने गेली तीस वर्षे करीत आहेत.

“संविधान.. काही रोचक पैलू” या विषयावर ते चित्राधारीत व्याख्याने देतात.

“शब्दसेतू साहित्य मंच पुणे”या वाॅटस अप समुहाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत

समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रांत निहाय कार्यकारिणीत पश्चिम महाराष्ट्र कार्यकारीणी प्रांत अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड नुकतीच मार्च २०२४ ते मार्च २०२७ साठी झाली आहे.

राज्यातील अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना वेळोवेळी मिळाले आहेत.त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार

काव्यरत्न, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई , अरण्येश्वर सांस्कृतिक पुरस्कार , कुसुमाग्रज सांस्कृतिक पुरस्कार,केशवसूत जन्मशताब्दी पुरस्कार , कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार २००६,

संगमनेरकर इतिहास संशोधक मंडळ उत्कृष्ट साहित्यिक,कालिदास साहित्य उपासक पुरस्कार , रंगदास‌स्वामी,शैक्षणिक,सामाजिक,संस्था,पिरंगुट

चा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार .

दैनिक सकाळ कडून ‘खरा पुणेकर ‘ किताब बहाल करण्यात येऊन पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, देऊन शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार झाला.

कलर टिव्ही वरील ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन ‘ या कार्यक्रमात प्रेक्षक परिक्षक म्हणून सहभाग होता.

दूरदर्शन वरील अनेक चॅनेल वरून, आकाशवाणी वरून काव्य सादरीकरण, काव्य वाचन झाले आहे.

2020ंमध्ये समर्थ प्रतिष्ठान तर्फे “महाराष्ट्र आयकॉन” या राज्य स्तरीय पुरस्काराने त्यांना पुरस्कृत केले गेले.

“कोविड योद्धा” म्हणून समाजात ते सध्या कार्यरत आहेत.

 

मा.विजय सातपुते यांचे प्रकाशित साहित्यामध्ये

त्यांचा “अक्षरलेणी ” हा कविता संग्रह असून “अक्षरलेणीकार” म्हणून विशेष प्रसिद्धी त्यांना मिळाली .

“अक्षर लेणी” ची द्वितीय आवृत्तीने त्यांना राज्यस्तरीय महाकवी दर्जा मिळाला.

झरा खळाळे जीवंत, काव्यशिल्प, यासह अनेक प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे काव्य स्पंदन एकदिवसीय साहित्य संमेलन २०१९ मध्ये २२ पुस्तकांना‌ त्यांनी संपादन‌ सहाय्य केले आहे.

“प्रकाशपर्व” हा तिसरा कविता संग्रह डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे.

मा. विजय सातपुते यांच्याबद्दल संक्षेपात बोलायचे तर आपलेपणाने “माणूस वाचणारा, माणूस जोडणारा,जपणारा, माणसात रहाणारा आणि कवितेतून माणूस पण जोपासणारा व्रतस्थ कार्यकर्ता म्हणून जनमानसात लोकप्रिय असा आहे”.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा