You are currently viewing आजची पिढी’….!
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आजची पिढी’….!

*खर्मा फाऊंडेशन आणि मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सदस्या लेखिका कवयित्री लीना वालावलकर लिखित अप्रतिम लेख*

*‘आजची पिढी’….!*

आजची पिढी बेजबाबदार तर नाहीच पण असंवेदनशील ही नाही हे आजच्या तरुण पिढीच्या वागणुकीचा मागोवा घेतल्यास निश्चितपणे लक्षात येईल. हे मात्र सुर्याइतके स्पष्ट आहे की पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा एक पाऊल पुढेच असते. आपल्या पुढची पिढी ही बेजबाबदार व असंवेदनशील आहे असे प्रत्येक पुढच्या आधीच्या पिढीला वाटत असते. मानवी संवेदना मानव अस्तित्वात आहे तोपर्यंत सोबत असणारच. प्रेम, राग, लोभ, क्रोध, चिंता, तणाव, भिती, आनंद, काळजी निश्चित पुढच्या पिढीमध्ये सुध्दा आहेत. पण या भावना व्यक्त होण्याच्या व व्यक्त करण्याच्या पध्दती काळानुरुप बदलत असतील हे आधीची पिढी लक्षातच घेत नाही. दोनही पिढ्यांनी एकमेकांना गृहीत न धरता समजुन घेतले पाहिजे व आपले मत न लादता समजावून सांगितले पाहिजे. चांगुलपणा आणि सकारात्मकता जशी काल होती तशी आजही आहेच. मने संवेदनशील आहेच. या नाजुक मनाला मायेने समजून घेऊन खुलवण्याची गरज कालही होती आणि आजही आहे. आजचे मानवी जीवन पुर्विपेक्षा सुसह्य आहे, मानव प्रगत आहे. आजही तो अनेक शोध लावत आहे, ते एकाकी पडण्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानवी जीवनाचे व सृष्टीचे भले व्हावे म्हणुन.

पुढच्या पिढीकडे विचार करुन निर्णय घेण्याची व करण्याची क्रिया झटपट आहे. ते भावनेच्या आहारी जात नाहीत. एकदा रस्त्यावर दोन गाडयांची टक्कर झाली. दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या. तशी चुक कुणाचीच नव्हती. पुढची गाडी धीमी झाल्याने मागची त्यावर आपटली. दोनही बाईकस्वार व त्यांच्या मागे बसलेले पडले. चालवणार्यांना कमी तर मागे बसलेल्यांना बरेच लागून रक्त आले होते. तिथे बाजुलाच गप्पा मारत उभे असलेले विशीतले तरुण व तरुणी, बहुदा क्लासचे असावेत लगेच अपघात स्थळी धावले. जखमींना उचलले, गाड्या बाजुला घेतल्या. पाणी प्यायला दिले व जवळच्या दवाखाण्यात घेउन गेले. काही जणांनी तिथेच उभे राहुन जो वाहतूक खोळंबा झाला होता तो सुरळीत केला. तिथे वयस्कर लोक ही होते पण रक्त पाहुन तेच घाबरले. नेमके काय करावे, कुठून सुरवात करावी हेच त्यांना सुचले नाही ते तरुणांनी करून दाखवले. हे सारे कृत्य ज्यांनी पाहीले, अनुभवले ते आजची पिढी बेजबाबदार आहे, असंवेदनशील आहे असे कधीच म्हणु शकणार नाहीत.

आजच्या पिढीकडून नुसत्याच अपेक्षा ठेवू नका, त्यांच्यावर मायेने हात फिरवा, विश्वास ठेवा ते नक्कीच असामान्य कतृत्व गाजवून तुमचा विश्वास सार्थकी लावतील यात यतकिंचितही शंका नाही.

नाव : लीना वालावलकर.
पत्ता : कांदिवली, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा