You are currently viewing कौतुक सोहळे

कौतुक सोहळे

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे, समुहाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*कौतुक सोहळे*

 

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तसाच तो कौतुकप्रिय ही आहे. अगदी जन्मापासून त्याचे कौतुक सुरू होते. बाळ कुणासारखा दिसतो ,कसा हसतो, कसा बोलतो , रांगतो कसा आईला कसा ओळखतो , इथपासून तर प्रत्येक लहानसहान गोष्टीबद्दल त्याचे कौतुक होत असते !कौतुक कुणाला आवडत नाही? अगदी चतुष्पाद प्राण्यांनाही कौतुक आवडते,, संवेदनशील मनुष्य त्याला अपवाद कसा असणार? आपल्या प्रत्येक कृतीचे कुणीतरी कौतुक केले पाहिजे ,किती छान केलंस म्हटलं पाहिजे, ही सुप्त भावना प्रत्येकाच्या मनात असतेच असते. विशिष्ट प्रमाणात कौतुक , प्रशंसा केल्याने मनुष्याला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आवड निर्माण होते !प्रगतीसाठी कौतुक होणे अतिशय आवश्यक असते, आपल्या कामाची कुणी दखल घेतली आहे ही भावना मोठी सुखावह असते त्यामुळे उत्साह वाढतो,

परंतु आजकाल प्रत्येकच कृतीचे कौतुक करण्याची जणू चढाओढच लागली आहे। सर्वसामान्य जीवनात व सामाजिक जीवनातसुद्धा हे आपण पाहतच आहोत.

हम दो हमारे दो, आणि आता हमारा एक च्या काळात मुलाचे किती आणि काय कौतुक करू असे पालकांना झाल्याचे चित्र प्रत्येक घरात दिसते.

पूर्वीच्या काळी कुणी कुणाचे फारसे कौतुक करीत नसे . मुलाने केलेली एखादी कृती आवडल्याचे वडिलांच्या नजरेतच दिसत असे, त्यामुळे मुलांना चांगले वळण लागत असे, न बोलता कृतीतुन प्रेम , करण्याचे ते दिवस होते. आजची परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट दिसते वारंवार लहान सहान कृतीचेही कौतुक केले जाते मुलांना एकदा का ही सवय लागली की जराही त्यांच्या मनासारखे घडले नाही तर मुले अस्वस्थ होता मी करीन ते बरोबरच हा त्यांचास्वभाव बनतो उठबस कौतुक करून घेण्याची सवय मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य नाहीच!

जी गोष्ट घरात तीच बाहेरच्याही जगात आज आढळून येते

आपल्या मतलबासाठी संबंधित व्यक्तीचे वारेमाप कौतुक केले जाते हाजी हाजी केली जाते पुढे हीच रीत बनते,

सार्वजनिक क्षेत्रात ह्या कौतुक सोहळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत

एखादया चांगल्या कामाची प्रशंसा करतांना हार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि ह्या सगळ्यांचे फोटो,, त्या फोटोत आपण दिसू ही धडपड !

ह्या कौतुक सोहळ्याला सत्कार समारंभ असे गोंडस नाव आहे यात किती फुलांचा बळी पडतोकुस्करु नका ही सुमने हे विसरल्या जाते शाल श्रीफळ यांची गणतीच नाही, माझ्या मनाला नेहमी एक प्रश्न असतो, काय करीत असतील इतक्या शालींचे व नारळाचे? आपण नेहमी प्रॅक्टिकल असले पाहिजे असं म्हणतात त्या शब्दाचा अर्थ जो असेल तो असो पण हे सगळे टाळता नाही येणार का?

कौतुक जरूर करावे ते आवश्यकच आहे पण त्यातल्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ या तीन वस्तूं ऐवजी आपल्या ऐपतीप्रमाणे पाकिटात काही रक्कम दिली तर? Tokan of love म्हणून!ती नक्कीच कामात येईल ना?

विवाहसमारंभातही फक्त रोख रक्कम दिली तर?

हा झाला माझा विचार! आपण सहमत असलेच पाहिजे असं मी अजिबात म्हणणार नाही! अपनी अपनी सोच! खयाल अपना अपना!

प्रत्येकाने आपले काम प्रामाणिक पणे करावे चांगल्या कामाचे कौतुक करतांना शब्ददारिद्र्य असू नये. त्यांच्याप्रती

प्रेम व्यक्त करावे, ते आचरणातही आणावे कौतुकाचा एक शब्दही जीवन आनंदी करण्यासाठी पुरेसा होतो कौतुक सगळ्यांनाच हवेसे असते कौतुक केलेच पाहिजे पण ते डोळसपणे, सकारात्मक बदल होण्याचा दृष्टिकोन ठेवून! एव्हढेच मला म्हणायचे आहे

 

विचार करा

पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून!

 

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

 

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा