You are currently viewing सहज मनांत आलं…

सहज मनांत आलं…

*काव्य निनाद साहित्य मंचाचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*सहज मनांत आलं …*

 

(अनिल देशपांडे )

 

आमचा एक वयस्कर लोकांचा ,छानसा ग्रुप आहे . वेगवेगळ्या गावांतिल ,वेगवेगळ्या क्षेत्रात कामकरणारी ,वेगवेगळी मत -मतांतर असणारी आम्ही, सकाळी थोडेफार फिरुन ,एका अड्यावर जमत असतो . अनेक विषयांवर गप्पा मारत असतो , आपापल्या व्याधिंबद्दल तर कधी राजकीय व आंतर राष्ट्रीय घडामोडींवर विनाकारण वादविवाद वा चर्चा करत असतो . हसी मजाक करत असतो घरातिल सुख दु:खही शेअर करित असतो .

असेच एक दिवस माझे एक मित्र ,सगळ्या मित्रांची पांगापांग झाल्यावर ,विमनस्क मनाने बाकाच्या एका कोपऱ्यात बसले होते .मनातून त्यांना काहि दु:ख असाव हे स्पष्ट जाणवत होतं ,थोडं मन हलकं करावं असं वाटलं व तसा प्रयत्न केला . लवकरच त्यांच्या मनाचा बांध फुटला व ते भडाभडा सांगु लागले . त्यांनी सांगितलेल थोडक्यात असं होतं ……त्यांच व त्यांच्या मुलाच अजिबात जमत नव्हतं ,ते अनेक महिन्यांपासून मुलाशी अजिबात बोलत नव्हते व तो ताण त्यांना आज असह्य झाला होता …..

मी त्यांना माझ्या परी समजावले व परत मुलाशी वार्तालाप करा असा सल्ला दि ला ( मी फुकट वा नाहक सल्ले देतो अशी आमच्या मंडळींची तक्रार असायची !) व जमेल तेवढी मन:शांति देण्याचा प्रयत्न केला .

हे सर्व आपणांस सांगण्याचे कारण असे की त्यांच्या नाते – संबंधांतील दरी कमी व्हावी व ती परत प्रेमाने जोडली जावी . असे मला मनोमन वाटले …..

तसा माणूस वय परत्वे भूतकाळात रमण्यात आनंद मानत असतो .आणि ते बऱ्याच अंशी खरंहि असावं …

एकतर पूर्वी बहुतेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धत होती हे सर्वश्रुतच आहे .त्यामुळं आई ,वडिल ,भाऊ बहिणी ,आते ,मावस ,चुलत भावंडातहि सतत येणं जाण असायच ,सुख दु:खात सर्वात आधि ते सामोरे होत असत . त्या मुळे नाते जास्त दृढहि होत असे .बरीचशी नाते संबंध गावांच्या परिसरांत हि असल्याने नाते संबंध चांगली असत !

काळानुसार बदल होत गेला विभक्त कुटुंब पद्धत आली व अनेक बदल झाले

व साहजिक कमी जास्त दुरावा होत गेला . आजहि काहि कुटुंबात अनेक नाते संबंध चांगली आहे व असायलाच पाहिजे नाहि कां ? येथे मला अमुक कुटुंब पद्धति चांगली वा तमुक वाईट असे अजिबात म्हणावयाचे नाही .

तर वरील प्रसंगात मी थोडं सुई धाग्याच काम केलं !पण तो हल्ली कोणी मागतहि नाही व सहसा कोणी देतहि नाही ,कारण आजकाल फाटलेली/ किंवा उसवलेली नाती व वस्तू शिवायची अथवा जोडायची गरज कोणाला वाटत नाही ….

प्राप्त परिस्थितीने उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदी राहून शिवायचा असतो . आयुष्याच्या वाटेवर हसत कष्ट झेलावे व ध्येय साध्य करुन आनंद पेरत रहावे …

ते तोडण्यासाठी अजिबात कष्ट पडत नाही पण जोडण्यासाठी विशेष प्रयत्न मात्र करावे लागतात . ..म्हणून

जोडून घेण्यासाठी सुई -दोऱ्या सारखे प्रयत्न करावे लागतात .

थोडा रफू केला तरी चालतो . …

आयुष्य खरंच एक न उलगडणारं कोड आहे त्याची विस्तिर्ण आकाशाशी वा समुद्राच्या खोलीशी तुलना करुन चालणार नाही तर माझ्या मते आयुष्य हे गदिमा नी सांगितल्या प्रमाणे सुख -दु:खाच्या धाग्यांनी विणलेल वस्त्र आहे .

पण कधी कधी आयुष्यातल्या मार्गावरून जातांना हे पांघरलेलं वस्त्र कोणत्यातरी छोट्या मोठ्या दु:खाने किंवा नाते संबंधांतील तणावाने जीर्ण होउन फाटू लागते ….

तेंव्हा आपण आयुष्य रुपी वस्त्राला छेद गेला म्हणून टाकून द्यायचे असते कां? अर्थातच नाही .

तर रफू करायचे व पुन्हा नव्याने वापरायचे …..

आयुष्य फक्त एकदाच मिळेल पण वापरणारी वस्त्रे पाहिजे तेवढी बदलू शकतो . नाही कां?

आयुष्याचे वा संकटाचे अवडंबर माजवण्याचे कारण नाही ते अगदि साधं आणि सहज आहे .

थोडक्यात काय तर सुई -दोऱ्याचा वापर करुन आयुष्य रुपी वस्त्र रफू करून (भले आवश्यकते नुसार अंगुली स्तान चा उपयोग करुन )सहज आनंदाने जगू शकतो ……

पहा पटतंय का?

थोडे मनांत आले ……

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा