पावसाळ्यात विजेपासून करा बचाव !
प्रशासनाचे आवाहन: दामिनी अॅप देते विजेची पूर्वसूचना*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस शक्यतो मेघगर्जनेसह कोसळत असतो. या पावसात ठिकठिकाणी वीज कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसते. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील परुळेकर यांच्या घरात विजेचा लोळ घुसल्याने इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर २०२२ साली सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गुरगुटवाडी येथे अंगणात गेलेल्या एका युवकाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी विजेपासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. शक्यतो विजेचा लखलखाट सुरू असताना घराबाहेर पडू नये आणि स्वतःला विजेपासून वाचवावे, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा लखलखाट होत असताना जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांचे विजांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरे सुरक्षित ठिकाणी गोठ्यामध्ये बांधावीत. विजांचा लखलखाट होत असताना शक्यतो जनावरे झाडाखाली बांधू नयेत. जास्त करून झाडावर वीज कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडाशेजारी जनावरांना ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत असते.
*वीज कुठे पडणार? १५ मिनिटे आधी कळणार*
भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. त्यामुळे या विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी अॅप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात पुढच्या १५ मिनिटात वीज पडणार की नाही, हे या अॅपच्या माध्यमातून कळू शकणार आहे. हे अॅप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून वीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे अॅप देते. वीज पडणार नसेल तर अॅपमध्ये बिजली की चेतावनी नही अशी सूचना त्या अॅपमध्ये दिसेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या पाच मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल तर पाच ते दहा मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते. आणि निळा रंग दिसत असेल तर दहा ते पंधरा मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते. येत्या जून-जुलैतील पावसाळा लक्षात घेता या अॅपचे वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. दामिनी अॅप विशेषकरून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कारण बहुतांश शेतकरी हे पावसाळ्यात शेतात असतात. त्यामुळे या अॅपचा वापर करून आपल्याला धोका टाळता येऊ शकतो.