You are currently viewing डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत 4 बॉयलरचे स्फोट

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत 4 बॉयलरचे स्फोट

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत 4 बॉयलरचे स्फोट

तिघांचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीमधील फेज 2 मधील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ एका वाहनाच्या कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. सहा ते सात कामगार या आगीत जखमी झाले आहेत. आगीची भीषणाता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे.

स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटानंतर कंपनीत किती जण अडकले होते, याबाबत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या स्फोटाबाबत माहिती दिली आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा