You are currently viewing चिपी विमानतळावरील अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी बरोबर आज बैठक

चिपी विमानतळावरील अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी बरोबर आज बैठक

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची माहिती

चिपी विमानतळावरील जी काही अपूर्ण कामे आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी विमानतळाला भेट दिली. येथील विज, पाणी आणि विमानतळापासून पिंगुळी मार्गे हायवे पर्यंत रस्ता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी मंगळवारी मी बैठक घेऊन चर्चा करणार, तसेच केंद्राकडून आवश्यक असणारे परवाने संबंधित मंत्र्यांशी भेटून आणणार, अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी दिली. चिपी येथील विमानतळावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्ण क्षमतेने लागणारा पाणीपुरवठा नाही, आवश्यक ती विजेची यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही, बीएसएनएल ची सेवा चांगली मिळत नाही आणि मुंबई-गोवा महामार्गापासून विमानतळापर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता झालेला नाही. असे असताना सत्ताधाऱ्यांकडून केवळ विमान सेवा सुरु करण्याच्या वल्गना होत आहेत. तसेच २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल असे सांगितले जात आहे. याबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारले असता राणे यांनी या वृत्ताची खिल्ली उडविली. मुळात ग्रामस्थांचे जे काही पाणी आणि वीज संदर्भात प्रश्न आहेत ते सोडऊन ग्रामस्थांना समाधानी करून विमान सेवा सुरू केली जाईल. आरबीआय कंपनीचे अधिकारी लोणकर यांनी सद्यस्थितीत या चिपी विमानतळावरील प्रलंबित कामे राणे यांच्या समोर मांडली. सध्या असणारा विजेचा पुरवठा कमी असून पूर्ण क्षमतेने विमानसेवा सुरू करण्यासाठी येथे स्वतंत्र वीज पुरवठा असणे गरजेचे आहे. याबाबत एम एस सी बी ने सहकार्य केले पाहिजे. तसेच येथील इंटरनेट सेवा चांगली बसण्यासाठी बीएसएनएल स्वतंत्र लाईन विमानतळासाठी दिली पाहिजे. सध्या विमानतळावर कुडाळ येथील भंगसाळ नदीमधून पाणीपुरवठा घेतला आहे. परंतु भविष्यात विमान सेवा वाढवायचे असल्यास स्वतंत्र पाणी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातून गोव्याला जाण्यासाठी हायवेवरून जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ चिपी विमानतळाकडे यायला लागला पाहिजे. यासाठी कुडाळ पिंगळी मार्गे चिपी येते येण्यासाठी महामार्गाच्या धर्तीवर रस्ता झाला पाहिजे, समस्या लोणकर यांनी मांडल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी सदस्य नीलेश सामंत यांनी ग्रामस्थांच्यावतीने गावातील पाणी पाणी वीज पुरवठा बाबत राणे यांच्याकडे समस्या मांडल्या. या सर्व समस्या जाणून घेऊन नारायण राणे यांनी आपण मंगळवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून ज्या काही परवानग्या आवश्यक आहेत, त्याबाबत संबंधित खात्यांच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करून लवकरच विमानतळावरून विमानसेवा सुरू करू व प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊ असे त्यांनी सांगितले. नावापेक्षा विमान सेवा दर्जेदार हवी आमदार नितेश राणे यांनी या विमानतळाला स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले की, कोकण ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्याला साजेसे असे नाव विमानतळाला दिले जावे असे माझे म्हणणे आहे. मात्र नावापेक्षा येथून सुरू होणारी विमानसेवा दर्जेदार असावी असे आपले प्रामाणिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मार्चनंतर हे सरकार नसणार आर आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार हे टेम्परवारी आहेत. त्यांच्या वल्गना मनावर घेऊ नका. आपल्याला विमानतळा बरोबरच जिल्ह्याचाही विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही विकास कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावू मात्र हे सरकार मार्चनंतर दिसणार नाही, असे सांगत नारायण राणे यांनी यापुढे केंद्र व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. चिपी विमानतळावर नारायण राणे यांच्यासोबत माजी जि.प. सदस्य नीलेश सामंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, मनीष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती सारिका काळसेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, तसेच नाथा मडवळ, प्रशांत आपटे, समीर चिंदरकर, प्रसाद पाटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =