कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा
भक्तिमय वातावरणात दिंडीसह पालखी मिरवणुकीत भाविक दंग
विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
कणकवली (प्रतिनिधी)
‘स्वामी राज गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी’, स्वामी स्वामी बोला हो, दत्त नामे डोला ओ, दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,’श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’ असा श्री स्वामी समर्थांचा जयघोष करीत टाळ-मृदंगांच्या साथीने वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कळसुली पुनर्वसन ते हर्डी येथे श्री स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक आणि दिंडी काढण्यात आली. यावेळी भाविक भक्त आणि स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या नामात दंग झाले होते.सकाळ पासून सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्त आणि स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
ही पालखी मिरवणूक आणि दिंडी कळसुली हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्तिमय वातावरणात आणण्यात आली. यावेळी स्वामी समर्थ मठाच्या पहिल्या वर्धापनदिनसोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने कळसुली गावात भक्तिमय वातावरणात तयार झाले होते. तर भक्तांची मांदियाळीच तिथे पाहायला मिळाली.
श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीत आणि दिंडीत प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्षा हर्षाली सावंत, ट्रस्टी , संतोष सावंत, किरण सावंत, किशोर घाडीगांवकर, दिलीप सावंत कळसुली पंचक्रोशीतील वारकरी, स्वामी भक्त आणि ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.
प्रेमदया प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मठ, कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त बुधवारी पहाटे साडेचार वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता स्वामींची नित्य पूजा, सकाळी साडेआठ वाजता लघुरुद्र, महारुद्र, दुपारी बारा वाजता महाआरती, दुपारी साडेतीन वाजता गुरुचरित्र वाचन,सायंकाळी पाच वाजता भजने, सायंकाळी सहा वाजता दिंडी,सात वाजता हरीपाठ, रात्री आठ वाजता किर्तन, रात्री कळसुली पंचक्रोशीतील भजनीबुवांनी सुस्वर भजने सादर केलीत. विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात स्वामी समर्थ मठात पहिला वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून स्वामी भक्तांची मांदियाळी पसरली होती.