You are currently viewing माजी आमदार राजन तेली यांचा व्हाट्सअप स्टेटस..

माजी आमदार राजन तेली यांचा व्हाट्सअप स्टेटस..

संपादकीय…

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली, परंतु महायुती कडून अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपा कडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे येत आहे. पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शिवसेना (शिंदेगट) पक्षाकडून ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करून खासदारकी लढविण्यासाठी तयार आहेत. परंतु भाजपाने मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीमध्ये वरवर सर्व आलबेल असल्याचे भासले तरी आतून चढाओढ सुरू असलेली दिसत आहे. नारायण राणेंनी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कमिटी सदस्यांसह महायुतीच्या घटक पक्षांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी निवडणूक कार्यालयांचे मंडप देखील उभारले गेले परंतु उमेदवाराचाच पत्ता नसल्याने महायुतीमध्ये केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी एकवटलेले पक्ष जनतेच्या समोर येत आहेत.

नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये महायुतीच्या सभा घेतल्या आहेत, परंतु सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीची सभा कोणाच्यातरी हट्टामुळे होऊ शकलेली नाही अशी माहिती माजी आमदार राजन तेलींच्या व्हॉट्सॲप स्टेटस वरून समजते. त्यामुळे कोणाच्या हट्टामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सभा होऊ शकलेली नाही..? हा प्रश्न उपस्थित होत असला तरी जो कोणी नेता सावंतवाडी मतदारसंघातील सभेचा अडसर ठरतो तो नक्कीच निवडणुकीत चित्र पालटण्याची क्षमता असलेला नेता आहे. राजन तेली यांनी आपल्या कार्यकर्त्यांची माफी मागत असे म्हटले आहे की, *”सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित सभा कोणाच्यातरी हट्टामुळे दोन वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून सभेचे नियोजन केले होते. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो..”* राजन तेलींनी भावनिक होत कार्यकर्त्यांची मागितलेली माफी ही सावंतवाडी मतदारसंघात भविष्यातील विधानसभा निवडणुकीची रणनीती असू शकते परंतु ही रणनीती करताना अप्रत्यक्षपणे त्यांनी विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिस्पर्धी किंवा आपल्या उमेदवारीला अडसर ठरणाऱ्या आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ताकदवर, वजनदार नेते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार विनायक राऊत यांनी राजापूर मतदार संघातून दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका लढविल्या आणि या दोन्ही वेळी लाख दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विनायक राऊत हे नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या विरोधात निवडून आले आहेत. या दोन्ही वेळी भले भाजप युतीच्या धर्माप्रमाणे शिवसेनेच्या सोबत असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा असो वा रत्नागिरी, दोन्ही जिल्ह्यात भाजपची ताकद ही नगण्यच होती. त्यामुळे भाजपाच्या मदतीने विनायक राऊतांनी एवढे मोठे मताधिक्य घेतले नव्हते. या दोन्ही निवडणुकांच्या वेळी नारायण राणे यांची ताकद दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी होती. पहिल्या वेळी त्यांना काँग्रेसचा हात होता तर दुसऱ्या वेळी त्यांच्या स्वाभिमान पक्षाला अनेकांनी साथ दिली होती. परंतु चित्र पालटण्याची कुवत ज्यांच्यामध्ये आहे असे त्यावेळचे नारायण राणे यांचे कट्टर विरोधक दीपक केसरकर हे शिवसेनेत होते आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्या पारड्यात बहुमत टाकले होते. त्यामुळेच विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य घेणे शक्य झाले होते. त्या वेळेपासून दीपक केसरकर यांच्याकडे पाहण्याचा राजकीय धुरंधरांचा दृष्टिकोन बदललेला आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेचे किरण सामंत हे शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर आपला पारंपरिक मतदारसंघ लढविण्यासाठी इच्छुक असून भाजपा जास्तीतजास्त उमेदवार उभे करून मित्र पक्षांना दबावात ठेऊन अडचणीत आणत असल्याने शिवसेनेचे मंत्री असलेले दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित होईपर्यंत सभा घेण्यास तयार नसतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे. केसरकर म्हणा किंवा शिवसेना (शिंदेगट) यांच्या दृष्टीने विचार करता त्यांची भूमिका योग्यच आहे. कारण अजून उमेदवार निश्चित झालेला नसताना आणि शिवसेनेच्या किरण सामंत यांच्या रूपाने शिवसेनेने मतदारसंघावर दावा केला असताना नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणे म्हणजे आपला दावा आपणच सोडण्यासारखे किंवा आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळेच दीपक केसरकर मतदारसंघात सभा घेण्यात अडचण ठरत असल्याने राजन तेली यांनी प्रत्यक्ष टीका अथवा तक्रार न करता अप्रत्यक्षपणे आपली नाराजी स्टेटसच्या माध्यमातून मांडली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजेच पूर्वीचा राजापूर मतदार संघ हा गेले अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा पारंपारिक मतदार असून कोकणवासीयांनी शिवसेनेला नेहमीच पाठबळ दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या मतदारसंघाकडे पर्यायाने कोकणाकडे विशेष लक्ष दिले होते आणि म्हणूनच नारायण राणे यांना अल्पकाळासाठी का होईना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसविले होते. यातूनच बाळासाहेबांचे कोकणवर असलेले प्रेम दिसून आले होते. आजही कोकणातील मतदार शिवसेनेच्या अर्थात धनुष्यबाण निशाणीच्या मागे समर्थपणे उभे आहेत. त्यामुळेच देशातील विविध भागांमध्ये जरी लोकसभा उमेदवार निश्चित झाले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे घोंगडे आजही भिजत पडले आहे. भाजपा आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करते आहे आणि शिवसेना आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करते. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊन “अब की बार चार सौ पार” मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ अडसर ठरू नये म्हणजे मिळवलं..!

प्रतिक्रिया व्यक्त करा