You are currently viewing आचारसंहिता तथ्य आणि पथ्य

आचारसंहिता तथ्य आणि पथ्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आचारसंहिता तथ्य आणि पथ्य*

 

आचारसंहिता याची व्याख्या तशी भरगच्च आहे. आचार संहिता हा एक नीती तत्त्वांचा संच आहे. एक नियमावली आहे. आणि विविध क्षेत्रांमधील आचार संहिता ही वेगवेगळ्या रुपात अनुभवायला मिळते. पण पायाभूतपणे ती मूल्याधिष्ठित असते. तत्व, उद्दिष्ट, ध्येय, वातावरण, परिस्थिती, यानुसार ठरवलेली एक कार्यपद्धती म्हणजेच आचार संहिता.

 

अगदी विचार केलात तर निसर्गातच आपल्याला या आचार संहितेचा प्रथम प्रत्यय येतो. आकाशातले ग्रह, तारे, चंद्र —सूर्य, यांचे उगवणे, मावळणे, समुद्राची भरती —ओहोटी, बदलणारे ऋतू आणि ऋतुमानाप्रमाणे होणारे वातावरणीय बदल, थंडी, वारा, ऊन, पाऊस यांचे चढ-उतार हे सगळे निसर्गातल्या अदृश्य आचार संहितेप्रमाणेच घडत असतात. माझ्यामते निसर्गाची आचार संहिता ही मानवी जीवनातल्या प्रत्येक आघाडीवरचा मूलस्रोत आहे. जगताना ज्या ज्या ठिकाणी आचारसंहितेचा विचार येतो तिथे निसर्ग हा केंद्रस्थानी असतोच. खरं म्हणजे तोच खरा मार्गदर्शक असतो आणि कसे जगले म्हणजे ते सुखाचे ठरेल हे सांगणारा एक गुरु असतो.

 

थोडक्यात आपण असं म्हणूया आचार संहिता म्हणजे एक वेळापत्रक जे आपलं वर्तन, आचरण आपली आयुष्याची भूमिका ठरवते. आचारसंहिता आपल्या तत्त्वपूर्तीसाठी दिशादर्शक असते आणि ती ठरवताना प्रत्येकाच्या हातात एक गाळणी असते. आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट, काय स्वीकारायचं आणि काय सोडायचं, शक्यता, अशक्यता, महत्त्वाचे, बिन महत्वाचे, योग्य —अयोग्य, ध्येय गाठण्याच्या वाटा, सिद्धांत, साध्य यासाठी करावी लागणारी योग्य ती सिद्धता म्हणजे आचार संहिता, थोडक्यात एक शिस्तबद्ध कार्यक्रम आणि त्यातलं तथ्य जाणून काटेकोरपणे वर्तणुकीबाबतीतलं पथ्य सांभाळणं म्हणजे आचारसंहितेचा केलेला सन्मान असे मी म्हणेन.

 

आचार संहिता ही सामुदायिक असू शकते, वैयक्तिक असू शकते.

 

आपण आचार संहिता हा शब्दप्रयोग फक्त राजकीय परिघात अथवा निवडणुकीच्या संबंधात वापरतो आणि बहुतांशी त्याचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला ही पाहतो. त्यामुळे त्या संदर्भात आचारसंहिता म्हणजे एक विनोद, एक उपहास, एक डावलण्याची गोष्ट, अनेक पळवाटा शोधण्याचेही एक माध्यम म्हणूनच विचार केला जातो. कारण मुळातच तिथे तथ्य आणि पथ्य हे बासनात गुंडाळलेले असतात. पण ते तसे नसायला हवे आचारसंहितेचा अर्थ, तथ्य, पालन आणि पथ्य हे जाणणे सर्वत्र जरुरीचे आहे. ते भलेही वेगवेगळे असेल पण ते आवश्यक आहे.

 

आचारसंहिता एखाद्या परिवाराची ओळख असू शकते. परिवारात एक किंवा अनेक व्यक्ती असल्या तरी प्रत्येकाचे वैयक्तिक हक्क, स्वातंत्र्य व्यवहार यांचा सुवर्ण बिंदू गाठून एक मध्यवर्ती तात्विक नियमांचा संच बसवणे हे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, परस्परांतील नाती, संवाद, सुरक्षितता जपण्याचे एक तत्त्वनिष्ठ माध्यम असते. तसेच एक आदर्श संस्कृती ती जपत असते. मतभेद, विरोध असू शकतात पण पायाभूत रचनेला धक्का न पोहचता… ती खरी आचारसंहिता.

एक साधं उदाहरण देते जळगावला भंवरलाल जैन या उद्योगपतीचं संयुक्त कुटुंब आहे. नात्यागोत्यांची प्रचंड गुंतागुंत असलेलं. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे आपापले व्यवसाय, छंद जपू शकतात पण त्यांच्या कुटुंबाची एक महत्त्वाची आचार संहिता म्हणजे संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र येऊन देवाची आरती करणे आणि रात्रीचे ठराविक वेळेला भोजन एकत्र घेणे. आजतागायत हे निर्विघ्नपणे, अबाधितपणे चालू आहे. कुटुंबातील एकसूत्रता या आचारसंहितेतलं तथ्य आणि पथ्य पाळल्यामुळे जपली गेली आहे.

अर्थात काळाप्रमाणे आचारसंहितेत बदल होणं हे स्वाभाविक आहे.शंभर वर्षापूर्वीचा काळ आणि मानवी जीवन,आचरण, विचार प्रणाली,आणि त्यानुसार ठरलेली आचार संहिता आज संभवनीय नाही.”सातच्या आत घरात” हे त्यावेळच्या आचार संहितेतले कलम आज रद्दबातल आहे.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ची एक सुयोग्य, सुलभ, सुघड, सुनित कार्यक्रम पत्रिका म्हणजे आचार संहिता. स्थूल मानाने तरी असे आचरण अनुसरावे एवढीच अपेक्षा.

विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांची ही एक नियमावली असते.अभ्यासाच्या वेळा,खानपान,शाळा कॉलेजच्या वेळा,मनोरंजन, विश्रांती, झोप याचा एक निश्चीत आराखडा असतो.असायला हवा.

 

नियमावली कलाकारांसाठी असते जसे की एखादा गायक असेल तर त्याने त्याच्यातला संगीताचा प्रवाह आटू नये म्हणून रियाजाबद्दलची नेमकी आचार संहिता पाळलीच पाहिजे.

मनीषा साठे या सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना. त्यांचा दिवस पहाटे चारला सुरु होतो. त्या कलेशी बद्ध आणि समर्पित आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही.

बँकिंग इन्स्टिट्यूशन्स, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांची उद्दिष्टे, ध्येय पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांप्रती एक आचारसंहिता आखून दिलेली असते. .I AGREE THE TERMS AND CONDITIONS.यावर केलेली सही म्हणजे कबुली आणि कर्तव्यपालनाची शपथ असते.आचार संहिता हा एक करार असतो. त्यात व्यक्ती स्वतःशी आणि समाजातल्या इतर घटकांशी बांधलेली असते. हे एक नैतिक बंधन आहे ते जर सर्वत्र त्या त्या पद्धतीने पाळले गेले तर समाजाची घडी शांतता आणि स्थैर्य या पायाभूत कलमांवर सुरक्षित राहू शकते.

आचार संहिता ही वयोमानावरही अवलंबून असते.तरुणपणाची आचार संहिता आणि वृद्धत्वातील आचार संहिता वेगळी असते. ती व्यक्तीसापेक्ष असते.

 

मात्र आचार संहिता ही एक सवय झाली पाहिजे.

रस्त्यातून जाता असताना ज्यावेळी आपण रहदारीच्या प्रचंड गोंधळात सापडतो तेव्हा मनाला प्रश्न विचारा,” हे असं का झालं?”

तुम्ही कितीही उड्डाणपूल बांधा, भुयारी मार्ग खोदा, मेट्रोचा पुरस्कार करा पण जोपर्यंत आपली प्रिय जनता रस्ता संबंधीची आचार संहिता पाळत नाही तोपर्यंत या बाह्यस्वरूपी गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही

अमेरिकेसारख्या प्रगत देशात प्रत्येक महारस्त्याला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यावर *स्टॉप* असा इशारा देणारी पाटी असते आणि त्या थांब्याजवळ प्रत्येक वाहन चालक गाडी थांबवतोच कुठेही घुसाघुस, “अरे कोई कार नही है चल रे यार..” ही मानसिकता तिथे नसते म्हणूनच तिथे सुव्यवस्था जाणवते. थोडक्यात आचार संहिता रेखाटनेतले तथ्य समजून घेणे आणि पथ्यही पाळणे ही आज काळाची गरज आहे.

नैसर्गिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण सामुदायिकता, वैयक्तिकता यांचा सुरेख सांधा जोडण्यासाठी आचारसंहितेचे अनुकरण हे मौल्यवान आहे.

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =