You are currently viewing घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीत पडलेल्या दोन गव्यांची वनविभागाकडून यशस्वी सुटका.

घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीत पडलेल्या दोन गव्यांची वनविभागाकडून यशस्वी सुटका.

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील घावनळे (खुटवळवाडी) येथे श्री. पांडुरंग गोविंद नेवगी यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी दोन गवे पडल्याची माहिती सावंतवाडी वनविभागाला मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक गव्यांच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता दोन्ही गवे त्यापैकी एका नर गव्याचे अंदाजे वय वर्षे 4-5 तर दुसरा मादी गव्याचे अंदाजे वय वर्षे 2 असल्याचे निदर्शनास आले. विहिरीवर वाढलेल्या वेलीचा अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडले असावेत असे दिसून आले. हे दोनही गवे विहिरीतील पाण्यावर पोहत असल्याचे दिसून आले. या वन्यप्राणी गव्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने विहिरी मधून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर यशस्वीरित्या त्यांची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.

वन्यप्राणी गवा हा आपल्या जैवविविधतेतील एक मोठा तृणभक्षी प्राणी असून तो आपल्या जीवसृष्टीतील एक महत्वाचा घटक आहेे. म्हणुन या आपल्या कोकणातील गव्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिंधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.

 

हे बचाव कार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी व सहायक वनसंरक्षक श्री. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री.संदिप कुंभार, नेरूर तर्फ हवेली वन परिमंडळचे वनपाल श्री. दिनेश टिपूगडे, नेरूर तर्फ हवेली नियतक्षेत्राचे वनरक्षक श्री सचिन पाटील, वनरक्षक श्री. बदाम राठोड, श्री शिवाजी पाटील, श्री. किरण गोसावी, पशुधन पर्यवेक्षक श्री कामटेकर, वनसेवक श्री. यशवंत कदम, सिंधुदुर्ग वाईल्डलाईफ इमर्जन्सी रेस्क्यू श्री. अनिल गावडे तसेच घावनळे (खुटवळवाडी) गावचे सर्व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांचे सहकार्य मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा