जिल्ह्यातील २७,८०६ बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गनगरी :
“पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,” असा संदेश देत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेला प्रारंभ केला.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळविला असला तरी तो कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच विशेष बूथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार, २८ जून २०२६ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
यंदाच्या मोहिमेत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत असून २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
याशिवाय दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या व बांधकामस्थळांवरील बालकांपर्यंत विशेष पथकांद्वारे लसीकरण सेवा पोहोचविण्यात येणार असून, आरोग्य विभागाने सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
