You are currently viewing अमरावतीचे माजी विभागीय आयुक्त स्व श्री. ह. रा. कुलकर्णी

अमरावतीचे माजी विभागीय आयुक्त स्व श्री. ह. रा. कुलकर्णी

अमरावती :

 

मुंबईचा आणि मराठवाड्याचा दौरा आटोपून मी अमरावतीला पोहोचलो. घरी पोहोचत नाही तोच आमचे पत्रकार मित्र श्री अशोकभाई जोशी यांचा फोन आला .त्या फोनमध्ये त्यांनी अमरावतीचे माजी विभागीय आयुक्त श्री ह. रा. कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाल्याचे सांगितले .श्री ह रा कुलकर्णी यांची माझी पहिली भेट मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या बंगल्यावर झाली. साधारणपणे १९९७-९८ हे जते वर्ष असेल. खेडेकर साहेबांची नुकतीच अमरावतीला सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली होते. ते गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलच्या चौकात दयासागरच्या बाजूला राहत होते .एक वेळ सकाळची गोष्ट आहे. मी व खेडेकर साहेब बाहेर लॉनवर गप्पा मारीत बसलो होतो .तेवढ्यात एक कार पोर्च मध्ये येऊन थांबली. त्यातून एक व्यक्तिमत्व उतरले. आणि सरळ खेडेकर साहेबांकडे वळले .खेडेकर साहेबांनी माझी ओळख करून दिली .ह रा कुलकर्णी विभागीय आयुक्त म्हणून अमरावतीला रुजू होण्यास आले होते .विश्राम भवनात न जाता ते खेडेकरांच्या बंगल्यावर आले होते .खेडेकरांचे त्यांचे सुरुवातीपासून ऋणानुबंध होते. मी लगेच माझ्या चालकाला घरी पाठवून माझी पुस्तके बोलावली आणि त्यांना पुस्तक देऊन अमरावती शहरात त्यांचे पहिले स्वागत करण्याचा बहुमान पटकावला. हे ऋणानुबंध तेव्हाही होते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. मी नांदेडला गेलो की आवर्जून ह. रा. कुलकर्णी सरांच्या घरी जात असे.त्यांना व सौ वहिनी साहेबांना माझे खूपच नवल वाटायचे .सर सेवा निवृत्त होऊन कितीतरी वर्ष झालीत . पण त्यानंतर सर अमरावतीला यायचे आणि आमचे मित्र नगरसेवक श्री प्रणय कुलकर्णी त्यांना आमच्या अकादमीत अमरावतीला घेऊन. तसेच आमचे नांदेडला जाणे व सरांना भेटणे सुरू होते .मी गेलो म्हणजे सर माझ्या डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीला पुस्तकांचा एक गठ्ठा माझ्या हवाली करायचे आणि म्हणायचे काठोळे माझी पुस्तके तुमच्या ग्रंथालयामध्ये खऱ्या अर्थाने कामास येतील .ह रा कुलकर्णी अमरावतीला असताना आम्ही भरपूर उपक्रम राबविले. सरांनी आम्हाला समर्थ साथ दिली .आमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ते वडीलधाऱ्या मंडळी सारखे पितृतुल्य वृत्तीने माझ्या मागे उभे राहिले. ते वर्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते .संपूर्ण भारतात जन्मशताब्दी साजरी केल्या जात होती.आम्ही पण डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या वतीने नियोजन करण्याचे ठरविले. त्यामध्ये पंजाबराव यांच्या जीवनावरील “युग निर्माता” हे नाटक .त्यांच्या जीवनावर किमान २५ पुस्तके त्यांच्या जीवनावर संगीतमय लोक महर्षी कार्यक्रम आणि त्यांच्या जीवनावर भाषणे .मी हे सर्व कुलकर्णी सरांसमोर मांडले.सरांनी मंजूरात दिली .ते म्हणाले काठोळे तुमचे सगळे कार्यकर्ते कामाला लावा .माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी तन-मन धनाने करेल आणि त्यांनी हा शब्द पाळला .डॉ. पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी वर्षात आम्ही जेवढे कार्यक्रम घेतले,नाटक बसवले त्याचे ठिकठिकाणी प्रयोग केले आणि जेवढी पुस्तके प्रकाशित केली तेवढी महाराष्ट्रात कोणत्याही संस्थेने एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनानेही प्रकाशित केली नाही .कुलकर्णी सरांची समर्थ साथ असल्यामुळेच आम्ही हे करू शकलो . युगं निर्माता नाटकाच्या वेळची गोष्ट .सतीश पावडे यांनी हे नाटक लिहिलं .नाटकाच्या तालीम सुरू झाल्या .तेव्हा अमरावतीला चांगले सभागृह नव्हते .श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाची निर्मिती व्हायची होती. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहाची निर्मिती सुरू होती .परंतु पूर्ण व्हायची होती .पण तिथे नाटकाचा प्रयोग होऊ शकत होता. पंजाबरावा वरील नाटक म्हणजे खूप लोक येणार. मी संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहाची पाहणी केली. माझ्याबरोबर नाटकाच्या क्षेत्रातील तज्ञ लोक घेतले. आणि त्यांनी अभिप्राय दिला की येथे नाटक होऊ शकते .कारण नाट्यगृहाचे जवळपास ७६ टक्के काम झालेले होते .ज्या सभागृहाचे उद्घाटन झाले नाही ते कसे मिळवायचे .मी ह. रा. कुलकर्णी सरांना शब्द टाकला. त्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री अजित सगणे जे पुढे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव झाले त्यांना फोन केला आणि सांगितले की काठोळे सरांच्या नाटकासाठी ते सभागृह द्यायचे आणि त्यांच्याकडून भाडे म्हणून एक रुपया देखील घ्यायचा नाही. झाले .संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहाचे उद्घाटन होण्यापूर्वी आम्ही जिथे युग निर्माता या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला .पहिल्या प्रयोगाला रसिकांनी एवढी गर्दी केली की सभागृहामध्ये बसायला जागा नव्हती .अर्थात ह.रा कुलकर्णी सरांनी शब्द टाकला नसता तर कदाचित हा नाट्य प्रयोग झाला नसता. विदर्भात आम्ही ठीक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग केले . त्यासाठी आम्हाला कुळकर्णी सरांची भरीव मदत झाली. ७ सप्टेंबर ह. रा. कुलकर्णी सरांचा वाढदिवस. तो आम्ही त्यांच्या बंगल्यावर साजरा करायचा .तत्कालीन मनपा आयुक्त मनीषा म्हैसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर आता जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुणकुमार डोंगरे ही सगळी मंडळी वाढदिवसाला एकत्र यायचे. वाढदिवस आम्ही धुमधडाक्यात साजरा करीत होतो . प्रशासनातील भ्रष्टाचार दूर करावा यासाठी त्यांनी एक वेळ साध्या शेतकऱ्याचा पोशाख घालून राठी नगरातील एका शासकीय कार्यालयात जाऊन तलाठ्याला लाच घेताना पकडले. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक श्री पुरुषोत्तम बोरकर यांनी ह.रा. कुलकर्णी यांच्या जीवनावर “माझ्या आयुष्याचा सातबारा” हे पुस्तक लिहिले .त्या पुस्तकावर आम्ही अमरावतीच्या टाऊन हॉलमध्ये चर्चा घडवून आणली. स्वतः ह. रा. कुलकर्णी सर या चर्चेमध्ये सहभागी झाले. १९९८ सालीं जेव्हा दूरदर्शन लोकप्रिय नव्हते त्यावेळेस आमचे मित्र श्री अशोक भाई जोशी हे अमरावती केबल नेटवर्क चालवत होते .त्यांनी मला सांगितले .आपल्याला कुलकर्णी सरांची अमरावती केबल नेटवर्कसाठी मुलाखत घ्यायची आहे. सरांनी लगेच त्यांना होकार दिला. मी ती मुलाखत घेतली .पण स्टुडिओमध्ये नाही. आम्ही अमरावती विभागीय आयुक्त बंगला त्यासाठी निवडला .त्या इंद्रप्रस्थ बंगल्यामध्ये माझ्या आयुष्यातील पहिली केबल नेटवर्कसाठी मी मुलाखत घेतली .आणि ती शेकडो लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम अशोक भाईंनी केले . आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ह.रा. कुलकर्णी सर आवर्जून यायचे .मग ते नाटक असो, पुस्तक प्रकाशन असो की संगीताचा कार्यक्रम असो.अनेक कार्यक्रमाला ते मला सोबत घेऊन जायचे. एक विभागीय आयुक्त काठोळे सरांच्या एवढ्या कार्यक्रमाला येतो ते लोकांना नवलच वाटायचे .तेव्हा आयएएस अधिकाऱ्यांचा फार मोठा दरारा होता .त्यात तर विभागीय आयुक्त म्हणजे फारच मोठी पोस्ट. पण सरांनी ती कधी जाणवू दिली नाही.

सर नसले तरी आम्ही बंगल्यावर जायचो. वहिनी साहेबांशी गप्पागोष्टी व्हायच्या. चहापाणी व्हायचे. आम्हाला कुळकणी सर आणि वहिनी कधीच परक्या वाटल्या नाहीत आणि त्यांनाही आम्ही कधी परके वाटलो नाही .मला आठवते तेव्हा अमरावती पोलीस आयुक्तालयाची नुकतीच निर्मिती झाली होती. श्री रामराव घाडगे हे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यांनी महेश भवन मध्ये एक कार्यक्रम ठेवला होता .कुलकर्णी सरांचा मला फोन आला. काठोळे बंगल्यावर या .आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे. मी गेलो तिथे कुलकर्णी सरांनी माझी रामराव घाडगे यांची पहिली भेट करून दिली .पुढे कुलकर्णी सर अमरावती सोडून गेले तरी रामराव घाडगे यांच्याबरोबर मला काम करता आले .पण त्या कामाची सुरुवात देखील ह रा. कुलकर्णी यांनीच करून दिली.असा हा तन-मन-धनाने चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहिलेला माणूस आज आमच्यातून निघून गेला. पण रहे ना रहे हम. महका करेंगे. या न्यायाने ते जरी आमच्यातून निघून गेले तरी ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले .विशेषतः त्यांचा बराचसा कालखंड हा अमरावती शहरात गेला .मनपा आयुक्त म्हणून व पुढे विभागीय आयुक्त म्हणून .त्यामुळे अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.

=============

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 11 =