You are currently viewing कोकणातील होळी….!

कोकणातील होळी….!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

 

*कोकणातील होळी….!*

 

होळी म्हणजे लोकोत्सव…रंगोत्सव…! हिंदू धर्मातील भारतभर साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी होळी हा महत्त्वाचा सण. कोकणातील होळी सण म्हणजे *शिमगा*… आजही शिमगा कोकणात मोठ्या उत्साहात पार पाडला जातो..परंतु काळानुसार पिढी सुधारली, शहरीकरण झाले आणि पद्धती बदलल्या…परंतु उत्साह आजही टिकून आहे. पहिल्या दिवशी फाग पौर्णिमेला होळी दहन केली जाते. होळीच्या अग्निमध्ये वाईट ते जाळलं जातं आणि वाईटाचा नाश करून दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे रंग उडवून आनंद साजरा केला जातो. हिवाळ्याला निरोप देताना येणाऱ्या वसंत ऋतुमधील विविधांगी फुलांच्या विविध रंगांचा आनंद घेण्यासाठी हा रंगोत्सव साजरा केला जातो असंही म्हटलं जातं.

कोकणात चांदा ते बांदा पर्यन्त होळीचा सण प्रत्येक गावातील चालिरीतीनुसार साजरा होत असतो आणि होळी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेली असते. कोकणातील लाल मातीच्या गाभ्यात पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या पोफळ, आंबा, सावर अशा निवडक झाडांची भली मोठी होळी तोडली जाते. होळी उभी करण्याच्या जागी म्हणजे देवालयांच्या परिसरात, माळरानावर शेतात, आंबा, काजू बागायतींमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी खड्डा खोदून गावभर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत आणलेली होळी उभी केली जाते. सभोवती सुकलेले गवत, पाने आदी गोलाकार पसरवून होळी पेटवली जाते. त्या त्या वेळी पिकणारे काजू, नारळ आदी नैवेद्य म्हणून होळीसमोर ठेवतात…होळीला गावातील एखादी जाणती, गावकर व्यक्ती सर्वांचे नवस बोलते. घाडी, गुरव लोक गाऱ्हाणी मांडली जातात…

गावात एखादी व्यक्ती गावकऱ्यांना सतावत असेल, चोरीमारी करत असेल तर पेटत्या होळी समक्ष देवाला सांगणे करतात….

“रे म्हाराजा, बारा ह्राटीच्या… बारा वहीवाटीच्या म्हाराजा …

आज तुका सांगणा करतंय…

चवाणाचो रवगो… गावाक आयकना नाय नि देवाक भीयाना नाय…

तू काय ता बघून घे…

वडाची साल पिंपळाक नि पिंपळाची साल वडाक लावन…

तेचे दात तेच्याच घशात घाल म्हाराजा.

वर्षाच्या आत तुझो गुण दाखय रे म्हाराजा…

होळयेच्या खुटार तेका नाक घाशीत हाड म्हाराजा…!”

 

सगळे गावकरी गाऱ्हाणे संपताच एकाच सुरात म्हणायचे..

….”होय म्हाराजा”.

 

होळीच्या समोर घातलेल्या गाऱ्हाण्यामुळे चवानांच्या रवग्याची पाचावर धारण बसायची, आणि तो देवाला शरण येत म्हणायचा…

 

“चुकलंय रे महाराजा, पुन्हा अशी चूक माझ्या हातून होवची नाय.

माझी एक चूक पदरात घे…

गावकी जा सांगीत आणि तू जो रस्ता दाखयशीत तसोच हेच्यापुढे वागान…”

गावकरी त्याला मोठ्या मनाने क्षमा करीत आणि देवासमोर त्याने ठेवलेल्या नारळ साखरेची खिरापत करून सर्वांचे तोंड गोड करीत.

अशा अनेक चालीरीती होळीकडे असायच्या. कोकणात गावकी सांगेल तशाप्रकरे वाद मिटायचे… दुसर्याबद्दल आकस, राग असा कायमचा नसायचा. कदाचित होळीच्या पवित्र अग्नीत माणसा माणसातील द्वेष, तिरस्कार जळून खाक व्हायचा. सोनार, चांभार, महार, कोळी, न्हावी, कुंभार, मांग, बुरुड, ब्राम्हण, आदी बाराबलुतेदार गावाच्या गरजा पूर्ण करीत त्यांना कामाचा मोबदला म्हणून गाव आश्रय देई, राहण्यासाठी जागा, थोडीफार शेती, बागायती आणि होळीला पॉस (देणगी) आदी मदत देई. सुखसमृद्धी नसली तरी त्यांचा दोन वेळच्या जेवणाची सोय होत होती. त्यामुळे गावात एकोपा, भाईचारा टिकून होता.

गावची होळी पेटली की मूठ आवळून तोंडावर नेऊन बो बो बोंब मारण्याची, विनाकारण त्रास देणाऱ्याचे तो समोर असतानाही नाव घेऊन शिमगा घालण्याचे प्रकार देखील खुलेआम होत होते…आणि यावेळी सबकुछ माफ असायचं.

*होळी रे होळी पुरणाची पोळी…*

*सायबाच्या **त बंदुकीची गोळी…*

 

*वयलाटकरांच्या बैलाचा ढोल*

*खायलाटकरांच्या नानाची टांग*

अशी बोंब ऐकू यायची…त्यात मज्जा असायची.

काही ठिकाणी भांग पिऊन *रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे*

गाण्याच्या तालात आणि भांगेच्या नशेत लाकडे चोरून होळीत टाकणे…कोणाच्या नावाने शिव्या घालणे, माडाचे नारळ, शहाळी चोरणे, असे उपद्व्याप देखील केले जायचे. काही गावांमध्ये शिमगा संपेपर्यंत गोमू नाचविणे, गोमू म्हणजे राधा… पुरुषाने साडी नेसून, स्त्रीचा वेष अन् ओठांवर लाली, गालावर पावडर लावून, मृदुंगाच्या तालावर फेर धरून नाच करणे… तेव्हा नाचताना राधा म्हणायची…

*सांगा मुकुंद कुणी हा पाहिला*

यात खेळे, नमन, सोंगे, असे कित्येक लोक सामील असायचे. ढोलकी, डफली आदी वाद्यांच्या तालावर अंगणात नाच व्हायचे, लोक आनंदाने तांदूळ, नारळ, पैसे द्यायचे.

*शबय शबय* अशी आरोळी देत अनेक छोटी मुले, माणसे चेहरा रंगवून, वेगवेगळा वेष परिधान करून घरोघरी फिरतात.

*”आयण्याचा बायना.. घेतल्याशिवाय जायना..”*

असं म्हणत आपल्या हक्काची शबय गोळा करायचे.

संकासुर मात्र मालवणी भाषेत धम्माल करायचा…

*तुमच्या आवशीच्या घोवाक खाल्ल्यानं वागान तो…*

*वाग काय खातलो बापाशिक म्हणा, बापाशिक खावन वागच स्वर्गात जायत*

*अरे मेल्यानो बघतास काय…? घरात जावन तांदूळ बिंदुळ, नारळ, पैसे कायतरी घेवन येवा…*

असं म्हणत संकासुर होळीची रंगत वाढवायचा.

तळ कोकणात प्रत्येक गावाच्या रंगपंचमीचा, (रोंबाट) एक वेगळा दिवस ठरलेला असतो. रोंबाट असते त्याच्या एक दिवस अगोदर गावात देवाचे न्हावन (तिर्थ) कलशातून गावात फिरवतात. प्रत्येक उंबऱ्यावर त्याची पूजा होते. प्रसाद म्हणून भाजलेल्या काजू किंवा गावात होणारे फळ पीक ठेवले जाते. घरातील दारिद्र्य, दुःख दूर होऊन सुखसमाधान प्राप्त व्हावे अशी त्यामागील संकल्पना असावी. देवाचे तीर्थ घरी आले म्हणजे आपला देव घरी आला अशीच समज असते. होळीचा शेवटचा दिवस म्हणजे रोंबाट. गावातील मानकरी, बारा बलुतेदार ढोल वाजवत गावभर प्रत्येक घरी फिरतात, वर्षाचे आपले मनाचे पॉस म्हणजे देणगी गोळा करतात. गावात रंगोत्सव साजरा होतो आणि होळीचा उत्सव संपतो. परंतु या पाच ते पंधरा दिवसांच्या शिमगोत्सवात रंगोत्सव रंगात रंगून जाणे.. जिथे मुबलक प्रमाणात पाणी आहे तिथे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मोठमोठ्या शहरात असलेले गावकरी, चाकरमानी या होळीच्या सणासाठी गावाकडे परततात.

दिवस बदलले… घराघरात… गावागावात समृद्धी आली. विपुल प्रमाणात पैसा आला… त्यामुळे गावांमध्ये देखील शहरीकरण झाले…*शबय शबय* अशी शिमग्यात कानावर पडणारी आरोळी आता क्वचितच गोरगरिबांच्या मुखात ऐकू येते. केवळ प्रथा पाळायची म्हणून गावात देवीचा वाघ…म्हणजे अंगावर वाघाचे कपडे घातलेला पुरुष गावभर फिरतो…परंतु त्याच्या मागून धावणारी किंवा त्याला पाहून घाबरून रडणारी मुले मात्र आज दिसत नाहीत.

*होली के दिन दिल खील जाते है रंगो मे रंग मिल जाते है…!*

 

*आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके जरा जपून जा तुझ्या घरी..*

अशी अनेक होळीची गाणी होळीच्या सणाच्या निमित्ताने अनेकांच्या मुखात रुळलेली असायची.

काही ठिकाणी…

*आबोलीचो वळेसार टाळयेर गो… घोव बोलयता माडयेर गो…*

अशा चावट गाण्यांची सुद्धा रेलचेल असायची… परंतु होळीच्या सणात आज ना सुरेल गाणी ऐकू येत… ना मुलांमध्ये होळीचा दांडगा उत्साह दिसून येत. होळी आजही पेटवतात.. भर रस्त्यात डांबरावर आजूबाजूची लाकडे पाला पाचोळा, माडाची झावळे, बाजारातील पुठ्ठे, आदी सर्व साहित्य पेटवून मुले होळीच्या भोवती नाचतात… परंतु त्यामध्ये आपल्यातील वाईट गुण, द्वेष, मत्सर जाळून टाकण्याची किंवा देवाकडून होळी सणाच्या निमित्ताने चांगले काहीतरी मागणे हे भावना नसते… तर केवळ होळी म्हणजे आग पेटवणे एवढेच त्यांना ज्ञात असते.

मुले होळीच्या निमित्त रंगपंचमी खेळतात… परंतु पूर्वी साधा रंग वापरून रंगोत्सवाचा जसा आनंद घेत होते… वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगत होते… अंगावर पाणी ओतून मजा घेत होते… तशी रंगपंचमी खेळताना मुले आज दिसत नाहीत..तर तरुणाई आज रस्तोरस्ती रंगोत्सव खेळताना दिसते. अनेकदा रसायन मिश्रित…कितीही काही केलं तरी आठ पंधरा दिवस न जाणारे रासायनिक रंग लावून स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या त्वचेला देखील इजा पोचवतात.

होळीचे बदलणारे हे स्वरूप नक्कीच निराशाजनक असून होळी सणाला घातक आहे… होळीचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईने सणाचे महत्त्व पटवून घेणे अत्यंत आवश्यक असून सण साजरे करताना सणाचा मूळ गाभा, मतितार्थ माहित करून घेऊन सण साजरा करण्यामागील धार्मिक प्रथा, परंपरा जोपासून होळीचा सण आनंदाने साजरा करावा…तरच सणाची खरी मजा चाखता येईल आणि उत्साहाने सण साजरा होईल…

 

*[दीपी]*

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा