You are currently viewing मत्स्य पॅकेजचा लाभ केवळ कुटुंबप्रमुखाला देण्याबाबतची अट शिथिल

मत्स्य पॅकेजचा लाभ केवळ कुटुंबप्रमुखाला देण्याबाबतची अट शिथिल

कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील मच्छिमाराला मत्स्य पॅकेजचा मिळणार लाभ

मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या बैठकित निर्णय

मच्छिमारांना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ६५ कोटीच्या मत्स्य पॅकेजचा लाभ घेताना मच्छिमारांना येणाऱ्या अडचणींबाबत आज मंत्रालयात मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्यासमवेत पालकमंत्री ना.उदय सामंत ,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मत्स्य पॅकेज संदर्भातील अडचणीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मत्स्य पॅकेजचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्याबाबत असलेली अट शिथिल करून एका कुटुंबात जेवढे क्रियाशील मच्छिमार असतील त्या सर्वांना मत्स्य पॅकेजचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. लवकरात लवकर याबाबतचे परिपत्रक काढण्याचे आदेश ना.अस्लम शेख यांनी मत्स्य आयुक्त राजेंद्र जाधव यांना दिले आहेत.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, मच्छिमार नेते हरी खोबरेकर, बाबी जोगी यांनी पारंपारिक मच्छिमारांना उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.मत्स्य पॅकेजचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्याबाबत असलेली अट शिथिल केल्यामुळे गिलनेट धारक, रापण संघ,आउट बोट व इतर बोटींद्वारे मच्छिमारी करणाऱ्या क्रियाशील सर्व मच्छिमारांना व मत्स्यविक्रेत्यांना याचा लाभ मिळणार आहे. मत्स्य विक्रेत्या महिलांना पॅकेजचा लाभ देण्यासाठी नगरपंचायत अथवा ग्रामपंचायतची मत्स्य विक्रेता पावती ग्राह्य धरण्यात यावी.तसेच अलिकडच्या काळात ज्या मच्छिमारांच्या बोटीच्या परवान्यांची मुदत संपली आहे परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही अशा मच्छिमारांची तपासणी करून त्यांनाही मत्स्य पॅकेजचा लाभ देण्याबाबतच्या सूचना ना.अस्लम शेख यांच्याकडून मत्स्य आयुक्तांना देण्यात आल्या.
तसेच एलईडी लाईट द्वारे करण्यात येणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीवर कडक कारवाई करण्याचे आदेश ना.अस्लम शेख यांनी मत्स्य आयुक्त राजेंद्र जाधव यांना दिले. त्याचबरोबर मच्छिमारांच्या इतर प्रश्नांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही ना.अस्लम शेख यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 10 =