You are currently viewing ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित व्यक्तीविशेष

ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित व्यक्तीविशेष

*कवी मनाचे डॉक्टर… श्री.दिलीप कुलकर्णी*

 

आज मला विशेष आनंद होतो आहे कारण एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख करून देते आहे १५, २० दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणी ने मला एक व्हीडीओ पाठविला माझा मित्र परिवार व कुटूंब परिवार खूप मोठा! नेहमीच अनेक व्हिडिओ कुणीतरी पाठवीत असतं वेळेच्या अभावी काय काय पाहणार? अन विनाकारण माझ्या इवल्याश्या फोनने किती ओझं पेलायचं? फोन हँग होऊ नये म्हणून अनेक वेळा मी more अँड डिलीट ही करते. तुम्ही सुद्धा हेच करत असणार! माझी ही सवय मैत्रिणीला माहीत असल्याने तिने खास नोट लिहिली होती की ,डिलीट करण्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा !तिच्या आग्रही विनंतीमुळे मी व्हीडीओ पाहायला सुरवात केलीआणि स्तब्ध झाले असं काय होतं त्यात ?-

नमस्कार, मी डॉक्टर दिलीप कुलकर्णी ; कुरुंदवाड

ऐ मेरे वतन के लोगो ह्या सर्व दूर लोकमान्यता पावलेल्या हिंदी गीताचा मी केलेला अनुवाद — गायला आहे गौरी पाटील ह्यांनी , असं डॉक्टर बोलले आणि गीताला सुरवात झाली .शब्द होते हे माझ्या देशजनांनो,द्या खूप तुम्ही द्या नारा …या शब्दांनी गाणे सुरू झाले ;मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते

जे शहीद जाहले त्यांची–

स्मरणात असो कुर्बानी

या ओळीने मी थोडीशी भानावर आले गाणं संपलं तरी समाधान झालं नाही म्हणून पुन्हा पुन्हा ऐकत राहिले.

गौरी ताईचा आवाज व डॉक्टर दिलीप कुलकर्णी ह्याची शब्दरचना!

खूप उत्सुकता वाढली डॉक्टराबद्दल! माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की कुणाच्याही चांगल्या कामाचे नेहमी कौतुक करायलाच हवे. मग ते काहीही असो -एखाद्याचा लेख कुणाची रांगोळी कुणाची राहणी तर कुणाचे पाक कौशल्य ! नीट डोळे व हृदय उघडे ठेवून पाहिलं तर जगात किती छान लोक आहेत त्यांच्या कला ;त्यांचे राहणे वागणे ह्याचे कौतुक केलेच पाहिजे. ते करतांना शब्ददारिद्र्य नको! मला काय त्याचे ?असा भाव नको !या बाबतीत अमरावतीचे श्री विनायक खोलकुटे ह्यांचे मी उदाहरण देईन कोणाचा लेख, कुणाचे एखादे चांगले काम आवडले की ते लगेच त्या व्यक्तीला फोन करतात! त्याचे कौतुक करतात तीच माझीही सवय आहे !असो!

मी डॉक्टर कुलकर्णीना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्याबद्दलची माहिती ऐकून मी चकित झाले त्यांच्या काव्यरचना ऐकून , वाचून मला आधी वाटत होतं की त्यांनी साहित्यात डॉक्टर ही पदवी मिळवली असणार!.ते साहित्याचे डॉक्टर नाहीत तर पेशानेच डॉक्टर आहेत हे ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला! मानवी शरीराचा डॉक्टर! त्याची शब्दसंपत्ती किती समृद्ध! आणि व्यक्त करण्याची शैली किती छान!! किती सुंदर पध्दत व्यक्त होण्याची!

सारेच अतर्क्य माझ्यादृष्टीने! एम बी बी एस असलेले डॉक्टर कुरुंदवाड येथे फॅमिली फिजिशियन म्हणून रुग्णांना सेवा देतात उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना१) श्री दत्त देव संस्थान नृसिंहवाडी येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तसेच२) डॉ एस के पाटील मंच ज.पुर,३) संस्कार केंद्र सांगली, येथेही त्यांचा गौरवपूर्ण सत्कार झाला आहे त्यांना ४) कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन यांचेकडून धन्वंतरी व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे डॉक्टर म्हणजे रोग्यासाठी जीवनदान देणारे धन्वंतरी अशी त्यांची सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारावरून लक्ष्यात येतेच! याशिवाय यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू पाहिली तर ते अतिशय हळव्या, मनाचे कवी आहेत लेखक आहेत

कवि मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठान, कुरुंदवाड चे ते संस्थापक, विश्वस्त आहेत तसेच भुगंधर्व रहिमत खां व प.विष्णु दिगंबर पलुसकर स्मृती समिती चे डॉक्टर संस्थापक व विश्वस्त आहेत तसेंचशिक्षणप्रसारक मंडळ कुरुंदवाड ते माजी संचालक आहेत.

भावकविता, गीत, गझल, विडंबन काव्य बालकविता अशा विविध साहित्याप्रकाराची त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत *एका अस्वस्थ वळणावर:* या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला तर खुद्द कुसुमाग्रजांनी चांगला अभिप्राय दिला आहे तर *चिंचा आणि बोरं* या विडंबन गीत संग्रहाला अभिप्राय देतांना पू.ल देशपांडे म्हणतात– फार दिवसांनी इतक्या चांगल्या कविता वाचायला मिळाल्या. कुसुमाग्रज किंवा पु.ल यांचे कडून एखादया कवीचे कौतुक होणे ही बाब खरंच अभिनंदनीय आहे.

कवी कुसुमाग्रज,यशवंत, सुधांशु इत्यादी पुरस्कार मिळविणाऱ्या डॉक्टर साहेबाबद्दल विचार केला तर दोन विरुद्ध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे डॉक्टर म्हणजे अजब गजब रसायन आहे मनुष्याच्या शारीरिक आजारावर उपाययोजना करतांना ते ज्या शिताफीने रोग्याला गुंगी देतात , भूल टाकतात ,त्याच सहजतेने ते त्यांच्या हृदयावर आपल्या साहित्याने मोहिनी टाकतांना यशस्वी होतात ह्याचे मला स्वतःला तरी खूप नवल वाटते.

आकाशवाणी, दूरदर्शन यावर त्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रम सुरूच असतात.

शिवाजी विद्यापीठ व कर्नाटक राज्यात माध्यमिक पाठयपुस्तकात त्यांच्या कविता अभ्यासाला असतात.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून डॉक्टर साहेब खूप दुःखी झाले अस्वस्थ मनस्थितीत लता दीदीच्या आठवणी मनात असतांना अचानक त्यांना कवी पी सावळाराम ह्यांनी लिहिलेले व वसंत प्रभुनी संगीत दिलेले ,लता मंगेशकरांनी गायलेले एक आर्त गीत आठवले ते गीत होते… कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे गीत गुणगुणताना डॉक्टर गाऊ लागले भेटण्या पित्याला स्वर्गी, गानगुणी कन्या गेली, –आदराने असतील जमले देवही ते बघायासी …

डॉक्टरांचीही सगळी गाणी आपण डॉ दिलीप पां कुलकर्णी, कुरुंदवाड या त्यांच्या यु ट्यूब चॅनेलवर ऐकू शकतो.

गाण्यातला प्रत्येक शब्द मूळ गाण्याच्या तोलाचा असून गाण्याची चाल मूळ चालीला अजिबात धक्का लागू देत नाही हे विशेष!

वैद्यकीय क्षेत्रात कीर्ती मिळविलेल्या ह्या डॉक्टरांना शारीरिक व्याधी दूर करण्याची जी हातोटी गवसली आहे तेव्हड्याच ताकदीने त्यांनी रसिकांच्या मनावर आपले राज्य स्थापन केले आहे मला स्वतः ला तर त्यांची ही गाणी दिवसभरात एकदा तरी ऐकल्याशिवाय चैन पडत नाही माझ्यावर इतकी जबरदस्त मोहिनी या गाण्यांनी पाडली आहे.

प्रसिद्धीची त्यांना बिलकुल लालसा नाही आपण काही मोठं काम करतोय हा भाव नाही त्यांच्याशी बोलतांना जाणवलं की ते स्वतःच्या विश्वात आनंदी आहे कौटूंबिक अडचणी सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात असतेच ! पण डॉक्टर विचारूनही कधी सांगत नाहीत हे मला विशेष जाणवले.

त्यांची गाणीच त्यांचे जीवन आहे!

तुम्हालाही त्याचा अनुभव येईल यात शंका नाही तर आता विचार कसला करताय? यूट्यूब वर ऐका ही गाणी! तुमचाही अनुभव माझ्यासारखाच असेल याची मला खात्री आहे.

डॉक्टर दिलीप कुलकर्णी सरांना भावी काळासाठी शुभेच्छा!

आणि हो मला त्यांचा व्हिडिओ पाठविणाऱ्या माझ्या मैत्रिणीला धन्यवाद..

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा