You are currently viewing आ.दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात तालुका प्रमुखाची प्रतिष्ठा पणाला

आ.दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात तालुका प्रमुखाची प्रतिष्ठा पणाला

इतिहास घडतो की इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

संपादकीय…

सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग मतदार संघाचे आमदार माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या शिंदेगटात सामील होत उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेल्याने सावंतवाडी मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. आमदार केसरकर समर्थकांनी खुद्द मुंबईत जात शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदेसहित तब्बल चाळीस आमदारांनी उठाव करून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना अस्तित्वाची लढाई लढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना कोणाची? असा वाद उभा राहिल्याने शिवसेनेला पुन्हा एकदा जुने दिवस आणून देण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उचलत राज्यभर दौरे सुरू केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्यात निष्ठा यात्रा या नावाखाली जिथे जिथे शिवसेनेचे आमदारांनी उठाव करून वेगळा गट स्थापन केला तिथे जात निष्ठावान शिवसेनिकांना एकत्र आणण्यासाठी सभा घेण्याचे सत्र सुरू केले आहे. सावंतवाडी मतदारसंघ हा आमदार केसरकर यांचा बालेकिल्ला. याच बालेकिल्लात शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी खुद्द आ. दीपक केसरकर यांनाच आव्हान देत आपली ताकद दाखविण्याची तयारी केली आहे. उद्या सावंतवाडी येथे होणारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा न भूतो न भविष्यती अशी होणार असा विश्वासही तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला आहे. रुपेश राऊळ यांनी निर्माण केलेल्या या आभासामुळे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत रुपेश राऊळ यांची ताकद उद्या दिसून येणार आहे.
सावंतवाडीच्या गांधी चौकातील सभांचा आजपर्यंतचा इतिहास पाहता, इथे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणून नारायण राणे यांनी देखील दीपक केसरकर यांच्या विरोधात नगरपालिका निवडणुकीच्या वेळी सभा घेतली होती. परंतु खुद्द मुख्यमंत्री येऊनही दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेवर त्यावेळी सतरा विरुद्ध शून्य असा धडाकेबाज विजय मिळवत आपल्या कार्यातूनच आपली ताकद दाखवून दिली होती. सावंतवाडीकर जनता ही दीपक केसरकर यांच्यावर प्रेम करणारी जनता असे दीपक केसरकर वारंवार सांगतात, आणि बऱ्याच वेळा दीपक केसरकर यांना मिळालेला सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा पाहता ते सत्य असल्याचेही दिसून आले आहे. सावंतवाडीच्या गांधी चौकात जिल्हाभरातून शिवसैनिक आणून ताकद दाखविली तरी बाहेरून आलेली गर्दी आणि सावंतवाडीकर जनतेने स्वखुशीने केलेली गर्दी यातील फरक मतदानाच्या वेळी नक्कीच दिसून येईल. केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांच्या विरोधात सावंतवाडीत शिवसेनेने मोर्चा काढला होता, परंतु या मोर्चामध्ये देखील सावंतवाडीतील मतदार, नागरिक हे अभावानेच दिसत होते, तर कुडाळ, कणकवली, मालवण,देवगड येथील कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा भरणा असलेला तो मोर्चा निघाला होता हे सर्वांनीच पाहिलेले आहे.
आ. दीपक केसरकर यांच्या घरासमोर मिरवणूक नेण्यास पोलिसांनी विरोध केल्याने चिटणीस नाका येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले जाणार आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून शिवसेनेवर निष्ठा असलेले शिवसैनिक येणार, त्यामुळे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील सभा न भूतो न भविष्यती होणार असा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना ठाम विश्वास आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले असून आदित्य ठाकरे यांच्यासाठी जमणाऱ्या गर्दीचे परिवर्तन भविष्यात मतपेटीत होणार की नाही? हे देखील पाहणे सावंतवाडी वासियांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. सावंतवाडी गांधी चौक येथे जमणारी सभेसाठीची गर्दी आणि त्यातून मिळणारे फलित आधीचा विचार केला असता, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासाठी मात्र हे कसोटीचे ठरणार असून भविष्याची सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेनेची घोडदौड कशी असेल याचा ट्रेलरही या सभेच्या निमित्ताने नक्कीच सर्वांना पाहायला मिळणार यात तिळमात्र शंका नाही. आमदार दीपक केसरकर विरुद्ध रुपेश राऊळ यांच्यात रंगणाऱ्या सामन्यात कोण विजेता ठरणार? हे येणारा काळच ठरवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =