You are currently viewing “कविता हा अंतर्मनातील भावनेचा आविष्कार असतो” ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते

“कविता हा अंतर्मनातील भावनेचा आविष्कार असतो” ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते

निगडी प्राधिकरण – प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

सावरकर सदन येथे काव्यानंद प्रतिष्ठान आयोजित स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार २०२३ वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री. वि. ग. सातपुते बोलत होते.

“कविता लिहिता येणं ही साक्षात भगवंताची कृपा आहे आपल्या घरातील ज्येष्ठांनी घडवलेले संस्कार, आपल्याला लाभलेला सहवास कवितेतून व्यक्त होत असतो” असे ते म्हणाले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे श्री. राजेंद्र घावटे हे लाभले होते. राजेंद्र घावटे यांनी मराठी भाषा कशी समृध्द आहे यावर भाष्य केले. ते म्हणाले “जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत मराठी भाषा राहील. भारतात चौथ्या क्रमांकावर बोलली जाणारी आपली माय मराठी आहे.”

प्रमुख पाहुणे म्हणून नवयुग साहित्य व शिक्षण मंडळाचे श्री. राज अहेरराव हे उपस्थित होते.

राज अहेरराव यांनी नव कवींना अनमोल मार्गदर्शन केले.” कविता जगायला शिकवते. आपली कविता नुसती लिहिली जात नाही तर ती आपल्याकडून घडवून घेतली जाते. कवींनी बदलत्या काळानुसार बदल आत्मसात केले पाहिजे” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तिन्ही मान्यवरांनी सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका सौ.वंदना ताम्हाणे यांनी केले. काव्यानंदचे सचिव श्री. विवेकानंद पोटे यांनी गणेश वंदना तर कु. भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली.

स्व. चिंतामराव पोटे काव्यमित्र पुरस्कार २०२३ हा पुणे येथील कवयित्री सौ. आरुशी दाते यांना प्रदान करण्यात आला.

काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. कविवर्य सुभाष धाराशिवकर यांच्या शब्द दिंडीतला वारकरी व अक्षर बंध या दोन्ही काव्यसंग्रहाचे आणि कवयित्री भाग्यश्री मोडक यांच्या भावशिल्प या काव्य संग्रहाचे प्रकाशन यावेळी संपन्न झाले.

कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शेळके, समीर मुल्ला व वंश खंडेलवाल या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =