You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

     *माझे गाव कापडणे…*

 

नमस्कार मंडळी,

लहानपणी सगळीच मुले ढाराढूर झोपतात.

चुकून कधीतरी पहाटे जाग आली की, मला

घुरू घुरू असा भरडकीचा आवाज यायचा.डोळे उघडून पाहिले की, आई लांब पाय करून भरडकीवर हरभरे भरडत असलेली

दिसायची.दिवसाच्या कामांमध्ये ह्या कामांना

वेळ नसायचा. मग अशी रात्र पहाट करून जागून ती अशी कामे करायची.

 

मला आता जात्यावर भरडकीवर काही काम

करायला सांगितले नि मी जाते ओढले तर मला

(लहानपणी मी जात्यावर दळू लागले आहे.मसाले ही दळले आहेत.)

आता कळते की जाते ओढायला कष्ट लागतात. ते काही १/२ मिनिटे ओढायचे नसते.

पायली दोन पायली गहू दळायला तास दोन तास सहज लागायचे.म्हणजे तास दोन तास जाते ओढायला आईला किती श्रम करावे लागायचे? बाप रे! आता आठवले की अंगावर

काटा येतो! दळून उठल्या की दोन्ही बायका

घामाघूम झालेल्या असायच्या. मला आठवते,

सारे चित्र डोळ्यासमोर दिसते. खूऽऽऽ प वाईट

वाटते ते याचे की, हे जे आज वाटते ते तेव्हा काहीच कळत नव्हते याचे वाईट वाटते.

 

किती श्रम हो? ते ही विना तक्रार .. ते जीवन

त्यांनी अपरिहार्य म्हणून मनापासून स्वीकारलेले असले, त्यांची काही तक्रार नव्हती तरी आज वाटते, बाप रे! केवढे कष्टांचे जीवन होते या सर्वच महिलांचे! कुटुंबासाठी त्यांनी ते कर्तव्य व प्रेमातून अंगिकारलेले होते. मी कधी कधी आई दळत असतांनाही मांडीवर डोके ठेवून झोपल्याचे मला आठवते. तिचे ते जाते ओढतांनाची पायाची लयबद्ध होणारी हालचाल मला मांडीतला झोका वाटत असावा

म्हणून तर दळतांनाही मांडीवर डोके ठेवून मी

झोपत असे.

 

आता वाटते, तिच्या ह्या कष्टांची जाणिव तेव्हाच का नाही झाली? रात्री उशिरा पर्यंत

किंवा पहाटे लवकर उठून तिला ही कामे करावी लागत. (हीच स्थिती घरोघर होती.)कारण दिवसाची भरपूर कामे

असायचीच! भरडून झाले की ते पाखडणे, गाळून चांगली डाळ बाजूला व कण्या वेगळ्या

करणे. तत्पूर्वी हे हरभरे मोठ्या पातेल्यात रात्री

भिजवावे लागत. ते भिजून टम्म फुगले की त्यांना मोठ्या कापडावर पसरवून तेल लावायचे. मग सकाळी ते उन्हात पसरवायचे.

खडखडीत झाले की मग भरडायचे. म्हणजे

चांगल्या प्रतिची डाळ मिळते असे ती सांगे.

हे भिजलेले हरभरे घरोघर थोडे थोडे वाटायची

पध्दत होती. घुगऱ्या म्हणत त्याला. मग घरोघर

घुगऱ्या शिजत असत.

 

हरभरा, तूर, मूग, मठ ही कडधान्ये शेतातच

कडेकडेने पेरलेली असत. हरभरा(हिवाळ्यात) थोडा जास्त असे. बाकी घरापुरते असे. वर्षभर पुरतील अशा अंदाजाने पेरत असत.खरिपात तीळ भगर, राळा देखिल पेरलेला असे.एकूणच फार कष्टांचे जीवन असले तरी त्या काळच्या बायकांनी ते विना तक्रार स्वीकारलेले होते.

आई म्हणायची, पहाटे उठून रोज दळण्याचा

इतका धसका असे मनात की दळून झाल्यावर

आमची एक झोप होत असे. म्हणजे पहा रोजचे दळण अधिक ह्या डाळी साळी करणे.

ह्या डाळींचा चुरा वेगळा भरलेला असे डब्यात.

आई तो चुरा भिजवायची, मला वाटायला लावायची, व त्याची तिखट मीठ कांदा घालून

मस्त थालिपिठे बनवायची. आम्ही त्याला कोंडाये म्हणायचो.

 

आजचे सुखासीन जीवन बघता आता वाटते की किती कष्टमय जीवन होते ह्या स्त्रियांचे.

बरे हेच असेच असते असे म्हणत त्यांनी ते स्वीकारलेले होते. बराच मोठा समाज असा

होता की,घरची ही सारी कामे निपटून त्यांना

१० वाजता इतरांच्या शेतात रोजगारासाठी

जावे लागे. म्हणजे घरातली कामे, पोरवडा

सांभाळून रोजगाराला जायचे व येतांना रात्री

साठी चुलीला सरपण गोळाकरत यायचे. आल्या आल्या मोळी दारात टाकली की,चुल

पेटवायची व भाकऱ्या भाजायच्या वाढायचे

ही सारी कामे असतंच. हातावर पोट असणाऱ्यांचे जीवन मोठे कठीण होते.पण नावालाही तक्रार नव्हती. जे जे नशिबी आले

ते ते प्राक्तन म्हणून स्त्रियांनी मुकाटपणे स्वीकारले व ते च ते रूढी बनून त्यांच्या बोकांडी बसले. पुरूष प्रधान समाज पान चघळत ऐश करत त्याकडे फक्त बघत राहिला. “ना त्याला त्याचे सोयर होते ना सुतक होते.”२४ तास सारी सुखे फुकट देणारी शिवाय त्याच्यावर प्रेम करणारी, तो कसा का असेना

त्याच्या नावाचे कुंकू मंगळसूत्र मिरवणारी व त्याचा अभिमान बाळगणारी बावळट मोलकरीण सदैव त्याच्या सेवेला सज्ज होती.

वाटते, किती नशिबवान आहेत ना पुरूष! अहो,

तो राबतो त्याच्या दुपटीने आज ही ती राबतेच आहे. जरा एकच पोर वागवून वाढवून अनुभव

घेतला की कळते, तळहाताचा पाळणा म्हणजे

काय असते ते! अर्थात प्रत्येक गोष्टीला काही

अपवाद असतातच! तसे चांगले समजुतदार पुरूषही असतात पण अपवादानेच!

 

हिवाळ्यात अजून एक मोठा इव्हेंट असे. वडे

पापडांचे दिवस.वा..! आमची काय मज्जा असे! आमची ५/६ घरे गोलाकृती वाड्यात आहेत. आम्ही असतांनाचे वाड्याचे वैभव आता

नाही राहिले.भंगले, चिरफळ्या झाल्या आहेत

त्याच्या.ह्या गोलाकृती वाड्यात एका वेळी १५/२० बायका खाटेवरच्या पाटावर शेवया

वळायला (करायला) बसू शकत असत.

पापड (पान्यापापड म्हणजे गव्हाची पिठी एका

मोठ्या डेगेत पाण्यात कालवून मीठ पापडखार

घालून, अढी खणून त्यात मोठमोठी लाकडे टाकून ती डेग त्या चुलीवर ठेवायची व मोठ्या पळीने सालदाराने ती ढवळायची. चुलाणावर

गदागदा ते पिठ शिजायचे.

 

ते शिजले रे शिजले की आम्ही ताटल्या भरून

सालदाराकडून घरात आणायचो. त्या गरमागरम पिठात गुळ व म्हशीचे दूध घालायचे

व ते चमच्याने ओरपायचे. वाह रे ! वा..! आताही तीअढी, ती चूल,मोठ्या वाढीने बादल्यांमध्ये काढलेले ते दाटसर पिठ व गुळ

दूध टाकून घरातल्या दारात बसून खाणारी परकरातली मी मला दिसते आहे. मनसोक्त

ते चविष्ट पिठ खाऊन ड्युटी लागायची ती

धाब्यावर बसायची. हो, सालदार ते पिठ धाब्यावर बादल्या भरून शिडीने चढवायचा व

२/३ बायका धोतरे धाब्यावर अंथरून पळीने ते

पापड घालायच्या.पूर्ण धाब्यावर पापडच पापड!

 

ह्या पापडांना घारी कावळे टोचे मारायच्या म्हणून एका खाटेला तिरपी काठी लावून, सावलीला

वर गोधडी टाकून खाटेखाली राखायला आमची स्वारी बसत असे. घारी कावळे आले की हाकलायचे व पुन्हा खाटेखाली बसायचे.

जमले तर अभ्यास करायचा.असे ते पापड दिवसभर वाळले की ती धोतरे तशीच संध्याकाळी खाली आणून खाटेवर पालथी

घालायची. सकाळी पुन्हा पाठीमागच्या बाजूला पाणी शिंपडून अलगद ते पापड

काढायचे व उन्हात वाळवायचे. ते वाकडेतिकडे

पापड मोठे मजेदार दिसत व ओले ओले खायलाही मोठे मजेदार लागत. आणि खडखडीत वाळल्यावर तापल्या तेलात असे

काही फराफरा उठत की बस्स बघतच रहावे.

असा हा पापडाचा मोठा घाट असे. बाबा रे !

तेच लोक करू जाणेत हे! आणि मग हे वाळले पापड ठेवणीच्या खोलीत एकावर एक ठेवलेल्या मोठमोठ्या माठात, रांजणात वर्षभरासाठी विराजमान होत असत.

 

सणासुदीला, खिचडीबरोबर हे कुडूमकुडूम पापड मोठे चवदार लागत व बायकांच्या मेहनतीचे चिज होत असे.(त्या पिठात टाकलेले

तीळही दिसत असत.) तेव्हा हिशोबच पायलीचा असे, आजच्या सारखा किलो दोन किलोचा नसे. खाणे ही दमदार व जगणे ही

दमदार होते.आजचा जमानाच किलो दोन किलोचा आहे, आहे कुठे वेळ कुणाला?

धन्यवाद मंडळी…बाय बाय …

 

जयहिंद .. जय महाराष्ट्र

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा