You are currently viewing तोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

तोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

तोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

वाळू उपशाबाबत महिला व ग्रामस्थ आक्रमक :एस्टीमेट तयार करून काम मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन..

मालवण

तोडवळी-तळाशिल येथील वाळू उपसा बंद करणे, वाळू उपशामुळे गावाची झालेली धूप भरून काढणे, किनाऱ्यावर भराव टाकणे व बंधारा बांधणे अशा मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला १५ दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने तोंडवळी तळाशील येथील पुन्हा एकदा खाडी पात्रात उतरून उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तोंडवळी तळाशील येथे येत ग्रामस्थांची भेट घेत कालावल खाडी व समुद्रकिनारी भागाची पहाणी केली. यावेळी ग्रामस्थ, महिलांनी बेकायदेशीर वाळू उपसा व परप्रांतीय कामगार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, जिल्हा पतन अभियंता वीणा पुजारे, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, मालवणचे बंदर निरीक्षक श्री. गोसावी, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे,आचरा मंडल अधिकारी अजय परब, तोंडवळी तळाशिल, खोतजुवा, शेलटी मधील महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी वाळू उत्खनना विरोधात आक्रमक भूमिका घेत वाळू उपशा मुळे गावाच्या भुभागाची झालेली धूप व नुकसान जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खाडी किनारी भागाची पाहणी करून खाडीतील गाळ काढणे व किनाऱ्यालगत बंधारा बांधणे ही दोन्ही कामे एकाच वेळी होणे गरजेचे आहे, गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्ड व बंधाऱ्याचे काम पतन विभाग करणार आहे, त्यामुळे यासाठी आवश्यक ते एस्टीमेट तयार करून हे काम मार्गी लावणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच समुद्रकिनारी बंधारा नसलेल्या भागात एक किमीचा बंधारा मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम चालू होणार असल्याचे सांगितले.

यावेळी तळाशील येथील महिलांनी बेकायदेशीर होत असलेला वाळू उपसा थांबवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. उपस्थित महिलांनी अनधिकृतपणे राजरोस होत असलेला वाळू उपसा केव्हा थांबणार असा सवाल करत आपण यावर कारवाई करा अन्यथा ग्रामस्थ कायदा हातात घेऊन वाळू उपसा रोखतील असा इशारा यावेळी दिला. यावर जिल्हाधिकारी तावडे यांनी उद्यापासून यावर कारवाई सुरु करणार कारवाई होत नसल्यास मला संपर्क करा, असे ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी तळाशील येथील महिलांनी परप्रांतीय कामगारां विरोधात आक्रमक भूमिका घेत या भागात वाळू उपसा करण्यासाठी बहुसंख्य परप्रांतीय कामगार राहत असल्याचे सांगत काही दिवसापूर्वी एका परप्रांतीयाकडून गोमातेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला असून ते प्रकरण दबवले गेले आहे, असे सांगत असे प्रकार होत असतील तर आज आमच्या लहान मुली महिला सुरक्षित राहतील का? हाच प्रसंग आमच्यावर ओढवला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल महिलांनी जिल्हाधिकारी यांना केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना लक्ष घालण्यास सांगून परप्रांतीय भैय्यांवर कारवाई करण्याची सूचना केली.

आचरा मासळी मार्केट मध्ये तळाशील येथील मच्छिविक्रेत्या महिलांना बसू दिले जात नसून तेथील स्थानिक विक्रेत्या महिला अडवत असून विक्रीसाठी नेलेली मासळी नष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत स्थानिक प्रशासनही आम्हाला कोणतेही सहकार्य करत नसून उद्या कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही स्थानिक महिलांनी केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना मासळी विक्रेत्या व संबंधित प्रशासन यांची तातडीने मालवण तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेण्याची सूचना जिल्हाधिकारी तावडे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा